नागपूर : मध्यरात्री अनियंत्रित कार तलावात पडली. या कारमध्ये असलेल्या महिलेला जिवंत बाहेर काढण्याची प्रशंसनीय कामगिरी तेथील नागरिक आणि अंबाझरी पोलिसांनी बजावली. एखाद्या सिनेमातील वाटावी अशी ही थरारक घटना शुक्रवारी मध्यरात्री फुटाळा तलावावर घडली. मनी नजिंदरसिंग बुटालिया (वय ४०) असे या घटनेतून सुखरूप बचावलेल्या महिलेचे नाव आहे. ती राज नगरातील रहिवासी असल्याचे समजते.
शुक्रवारी मध्यरात्री मनी स्वतःच्या कारमधून वेगात फुटाळा तलावाच्या पुलावरून जात होती. कारचा वेग मर्यादेपेक्षा जास्त होता. तलावाच्या पुलावर अनियंत्रित झालेली ही कार पुलाचा कठडा तोडून तलावात पडली. यावेळी त्या भागात असलेल्या नागरिकांनी आरडाओरड करून अंबाझरी पोलिस आणि नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाने अग्निशमन दलाला सांगितले. क्षणाचाही वेळ न दवडता तलावाजवळ असलेल्या काही तरुणांनी मध्यरात्रीची वेळ असूनही अत्यंत धाडसीपणे तलावात उड्या घेतल्या. कारचे दार कसे बसे उघडून मनी यांना जिवंत बाहेर काढले. दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी फुटाळा तलावावर धाव घेतली. मनीच्या कुटुंबियांनाही बोलवून घेण्यात आले. मनी या प्रकारामुळे काहीशी घाबरली असली तरी तिची प्रकृती सुखरूप असल्याचे घटनास्थळी असलेले ठाणेदार विजय करे यांनी लोकमत’ला सांगितले
मध्यरात्रीची वेळ असूनही तेथील काही तरुणांनी ज्या धाडसाचा परिचय दिला, त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच असल्याची प्रतिक्रिया उपस्थित मंडळीकडून व्यक्त होत होती. या तरुणांवर कौतुकाचा वर्षाव होत होता. कारही बाहेर काढली घटनास्थळी पोहोचलेल्या ठाणेदार विजय करे आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी विशेष परिश्रम घेऊन या महिलेची अल्टो कारही तलावाचे पाण्यातून मध्यरात्री बाहेर काढली