वायू प्रदूषणात भर पडत असलेल्या देशभरातील शहरांमध्ये नागपूरचा समावेश

Air Pollution

नागपूर: वायू प्रदूषणात भर पडत असलेल्या देशभरातील शहरांमध्ये विदर्भातील चंद्रपूर आणि नागपूर या शहरांचा समावेश झाला आहे. मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या सल्फर डायऑक्साइड या घटकाचे प्रमाण या शहरांत वाढले आहे. पर्यावरण क्षेत्रात कार्यरत ग्रीनपीस या संस्थेतर्फे हा अहवाल जाहीर करण्यात आला आहे.

देशभरातील काही महत्त्वपूर्ण शहरांतील वायू प्रदूषणाचा अभ्यास ग्रीनपीस या संस्थेतर्फे करण्यात आला असून ‘ग्लोबल SO2 इमिशन हॉटस्पॉट डेटाबेस’ या अहवालाद्वारे तो प्रसिद्ध करण्यात आला आहे. संस्थेचे सुनील दहिया आणि लॉरी मॅलॅविर्ता यांनी अलीकडेच हा अहवाल प्रसिद्ध केला. नासा (नॅशनल एरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन) या संस्थेच्या उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारावर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. सल्फर डायऑक्साइडच्या उत्सर्जनात ६० टक्के उत्सर्जन हे मानवी हस्तक्षेपामुळे झाल्याचे लक्षात आले आहे.

मुख्यत्वे कोळसा जाळणे, तेल जाळणे यामुळे हवेतील सल्फर डायऑक्साइडचे प्रमाण वाढते. जगभरात सल्फर डायऑक्साइडचे सर्वाधिक उत्सर्जन हे रशिया येथील नॉरिल्स्क स्मेल्टर कॉम्प्लेक्स येथून होत असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. देशपातळ‌ीवर सल्फर डायऑक्साइडचे सर्वाधिक उत्सर्जन करणारे राज्य हे तामिळनाडू आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर येथे सल्फर डायऑक्साइडचे सर्वाधिक उत्सर्जन होते. देशात ही क्रमावारी १२ इतकी आहे. तर त्या खालोखाल नागपुरातील कोराडीचा १३वा क्रमांक लागतो. या अहवालानुसार देशातील अनेक उर्जा प्रकल्पांमध्ये ‘फ्ल्यू गॅस डीसल्फरायझेशन’चे तंत्रज्ञान नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान असल्यास अद्यावत नसल्याचाही आरोप या अहवालाद्वारे करण्यात आला आहे.