नागपूरकरांची मेमूची मागणी लवकरच पूर्ण होण्याची चिन्हे

MEMU

नागपूर: नागपूर परिसरातील गावांना ये-जा करण्यासाठी मेमू (मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट) गाडी सुरू करण्याची नागपूरकरांची मागणी लवकरच पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. कारण अशी एक गाडी गेल्या काही दिवसांपासून नागपूर स्थानकावर उभी आहे.

देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपूर शहरात कामाच्या शोधात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नागपुरात राहून आजुबाजूच्या शहरामध्ये नोकरीसाठी रोज हजारो लोक ये-जा करतात. त्यामुळे नागपुरातून मेमू सुरू करावी, अशी शहरवासीयांची जुनी मागणी आहे. अलिकडेच चार डब्यांची मेमू रेल्वे नागपूर रेल्वे स्थानकावर आली आहे. या गाडीची चाचणी कधी घेणार याविषयी कुठल्याच सूचना नाहीत. मात्र, मेमू आल्याने नागपूरकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. लवकरच नागपूर ते आमला चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

नागपुरातून बुटीबोरी, सेवाग्राम, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, कामठी, गोंदिया, रामटेक आदी ठिकाणी ये-जा करणारे बरेच प्रवासी आहेत. उपराजधानीत मिहान, कार्गो हब, कळमनामध्ये धान्य भांडार व इतर व्यापार प्रतिष्ठान यांचा विकास होत आहे. अशा वेळी कन्हान-कामठी-कळमना-इतवारी-नागपूर-अजनी- खापरी-मिहान-बुटीबोरी दरम्यान विशेष ट्रेन, मेमू किंवा फास्ट पॅसेंजर चालविण्याची जुनी मागणी होती. यामुळे कन्हान व बुटीबोरी दरम्यान ये-जा करणाऱ्या प्रवाशांना एक चांगले साधन उपलब्ध होईल.

शहरात ब्रॉडगेज मेट्रो चालविण्याकरिता गेल्यावर्षी महामेट्रो आणि मध्य आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्यात करार करण्यात आला होता. मात्र, एक वर्ष होऊनही ब्रॉडग्रेज मेट्रोची गाडी अद्यापही रूळावर आली नाही. कदाचित ब्राडगेज ऐवजी मेमू ट्रेन आणली असावी, अशी चर्चा आहे.