नागपूर : ‘उपराजधानीत निव्वळ अत्यंत देखणी वास्तूच नव्हे, तर शैक्षणिक दर्जा आणि संशोधनामुळे ‘सिम्बॉयसिस’चे नागपूर कॅम्पस अल्पावधीत जागतिक दर्जाचे होईल,’ असा विश्वास सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर यांनी व्यक्त केला.
सिम्बॉयसिस नागपूर कॅम्पसचे रविवारी सकाळी ११ वाजता केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या उद्घाटन समारंभाची माहिती देताना डॉ. विद्या येरवडेकर म्हणाल्या, ‘नागपुरातदेखील सिम्बॉयसिसचे कॅम्पस स्थापन करण्याचा आग्रह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. राज्य सरकारच्या सहकार्याने वाठोडा येथे संस्थेला ७५ एकर जमीन मिळाली. तिथे १३ ऑगस्ट २०१८ रोजी भूमिपूजन करण्यात आले, तर अवघ्या १३ महिन्यांत सुमारे १३ लाख चौरस मीटरचे बांधकाम करण्यात आले. येथील इमारतींमध्ये अत्याधुनिक शैक्षणिक सोयी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागपूर कॅम्पस हे आजवरचे सर्वांत आधुनिक व पर्यावरणपूरक कॅम्पस झाले आहे.’
सिम्बॉयसिस नागपूरच्या कॅम्पसमध्ये चार प्रमुख कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. त्यात सिम्बॉयसिस इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट मध्ये दोन वर्षांचा एमबीए कोर्स सुरू करण्यात आला आहे. सदर अभ्यासक्रम हा सिम्बॉयसिस स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या अंतर्गत राबवण्यात येणार आहे, तर ‘सिम्बॉयसिस सेंटर फॉर मॅनजमेंट स्टडीज’ ही दुसरी शाखा असून तिथे तीन वर्षीय बीबीए अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे. नागपूर व परिसरातील राज्यांतून या कोर्ससाठी अधिक मागणी होती. याशिवाय सिम्बॉयसिस लॉ स्कूल ही विधी क्षेत्रातील शाखाही येथे सुरू करण्यात आली आहे. या लॉ स्कूलमध्ये बीए एलएलबी, बीबीए एलएलबी आणि एलएलएम असे तीन अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहे. यातील एलएलएल हा कोर्स आंतरविद्याशाखा राहणार आहेत. हा कोर्स एक वर्षाचा राहणार आहे.
याशिवाय ‘सिम्बॉयसिस स्कूल ऑफ प्लानिंग अॅण्ड डिझाइन’ ही नवीन शाखा येथे सुरू करण्यात येत आहे. येथे. बॅचलर ऑफ डिझाइन, मास्टर्स इन डिझाइन आणि बॅचलर ऑफ आर्किटेक्चर तसेच मास्टर्स इन आर्किटेक्चर असे चार अभ्यासक्रम राहणार आहेत. त्यापैकी ‘मास्टर्स इन डिझाइन’ हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम राहणार आहे, तर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हा कोर्स पाच वर्षांचा राहणार आहे. या कोर्ससाठी १४ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल.
आगामी काळात सिम्बॉयसिसच्या नागपूर शाखेत आरोग्य, माहिती व तंत्रज्ञान आणि जनसंवाद या तीन क्षेत्रातील कोर्सेसही सुरू होणार आहे. या नागपूर कॅम्पसमधील प्रत्येक अभ्यासक्रमात २५ टक्के जागा स्थानिक विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. त्यांना शिक्षणशुल्कात १५ टक्के सवलतदेखील देण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. येरवडेकर यांनी दिली. पत्रपरिषदेला विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. भामा व्यंकटरमाणी, कॅम्पस संचालक डॉ. अमय येरवडेकर, डिझाइन व प्लानिंग कोर्सचे संचालक प्रो. पी. स. सिंधू, मॅनेजमेंट संचालक डॉ. श्रीरंग अलतेकर आणि डॉ. सुखविंदरसिंग दारी उपस्थित होते.
ग्लोबल प्लेसमेंट
सिम्बॉयसिसचा शैक्षणिक दर्जा आणि येथील कुशल मनुष्यबळ हे स्थानिकांसोबतच देश व विदेशातील कंपन्यांसाठीही तयार करण्यात येते. त्यामुळे येथील विद्यार्थी हा जागतिक स्पर्धेत टिकणारा आहे. नव्या कॅम्पसमध्ये कौशल्य विकासावर अधिक भर राहील. त्यासाठी स्वतंत्र विभागदेखील राहतील. केंद्र सरकारचे स्वयम, कौशल्य विकास आणि स्वयंरोजगारचे सगळ्या योजना राबवण्यात येणार आहे. सिम्बॉयसिसचे विद्यार्थी नोकरी मागणे नाही तर रोजगार निर्माण करणारे व्हावेत,यासाठी इन्क्युबेशन सेंटरही सुरू करण्यात येणार आहे. तिथे स्टार्ट अप आणि बिझनेस प्लान तयार करण्यासाठीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
अधिक वाचा : संघमित्रा एक्स्प्रेसचे कपलिंग तुटले; इंजिन गेले पुढे अन् गाडी राहिली मागे!