नागपूर : अंबाझरी तलाव परिसराच्या बाजूने असलेल्या ‘बायोडायव्हर्सिटी पार्क’चे रविवारी उद्घाटन

नागपूर : अंबाझरी तलाव परिसराच्या आजूबाजूने असलेल्या राखीव जंगलात जैवविविधता उद्यान उभारण्यात आले असून, आता शहराच्या मध्यभागी पर्यटन व निसर्गभ्रमंतीच्या दृष्टीने एक आगळेवेगळ निसर्गरम्य ठिकाण पयर्टकांना उपबल्ध होणार आहे. या जैवविविधता उद्यानाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते येत्या रविवारी, २८ जुलैला दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या उद्यानाबद्दल माहिती देताना राज्यमंत्री डॉ. परिणय फुके म्हणाले, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे उद्यान नागरिकांसाठी पर्यटनाची उत्तम पर्वणी ठरणार आहे. सुमारे ७५८.७४ हेक्टर क्षेत्रात हे उद्याान तयार करण्यात आले आहे. निसर्ग पायवाटेसह सायकल ट्रॅक, वॉच टॉवर, ई-रिक्षा आदी सुविधा याठिकाणी करण्यात आल्या आहेत. या परिसरात १५ प्रकारच्या गवती प्रजाती असून, ४५० प्रजातीच्या वनस्पती, ७० प्रजातीच्या वृक्षप्रजाती तसेच १०५ निवासी, तर ४० स्थलांतरित पक्षी प्रजाती आहेत. फुलपाखरांच्या १०५ प्रजाती आहेत. २० वनतलाव याठिकाणी करण्यात आले असून, या तलावालगतचा परिसर स्वच्छ करून पर्यटकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. साहसी खेळदेखील याठिकाणी सुरू करण्यात येणार आहेत. जैवविविधता उद्यानात ११ किलोमीटरचा सायकल ट्रॅक करण्यात आला असून, सात बॅटरी पॉवर्ड सायकलींसह एकूण २५ सायकली आहेत. पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी गाईड असून, प्रवेश फी २० रुपये ठेवण्यात येईल. याशिवाय सायकलिंग, ई-रिक्शा, बायनॉकुलर, पक्षीनिरीक्षण आदीसाठी मोघम शुल्क आकारण्यात येईल, असेही डॉ. फुके यांनी स्पष्ट केले.

या लोकार्पण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील, अशी माहितीही डॉ. फुके यांनी दिली.

‘इंडियन सफारी’चे काम १० ऑगस्टपर्यंत !

गोरेवाड्यातील इंडियन सफारीचे काम दहा ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. येत्या १५ ऑगस्टला गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातील भारतीय सफारीचे उद्घाटन प्रस्तावित आहे. यातील बिबट सफारीकरिता बचाव केंद्रातील बिबट याठिकाणी सोडण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधीकरणाची मंजुरी अजून मिळायची आहे, असे राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी सांगितले.

अधिक वाचा : “Alia Bhatt is my style icon” – Srishti Jain