नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ७ वाजता पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. या वेळी त्यांच्या मंत्रिमंडळात कोण-कोण असेल याबाबत २३ मेपासूनच चर्चा सुरू झालीय. निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा जवळ जवळ रोजच या विषयावर चर्चा करत आले आहेत. नव्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि त्यांची खाती याबाबत सर्वकाही निश्चित झाले असून त्याबाबत गुप्तता पाळली जात आहे. मात्र, आजच्या शपथविधीवेळीच हे गूढ उघड होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोदी मंत्रिमंडळातील चेहऱ्यांबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. अमित शहा सरकारचा भाग बनतील, की ते संघटनेतच राहतील, अरुण जेटलींचा जागा कोण घेणार…. अशा अनेक प्रश्नांवर चर्चा रंगली आहे.
शहा मंत्री होणार की पक्षाध्यक्षच राहणार ?
या वेळी मोदी पुन्हा सत्तेत आल्यास अमित शहा मंत्रिमंडळात सहभागी होतील अशी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. शहा यांना कोणते खाते दिले जाईल, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शहा यांना अर्थमंत्रीपद किंवा गृह मंत्रालय दिले जाईल अशीही चर्चा आहे. शहा मंत्रिपद न स्वीकारता ते पक्षाध्यक्षच राहतील, अशीही समांतर चर्चा रंगली आहे. जर शहांना मंत्रिपद दिले गेले, तर भाजपच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ या सिद्धांतानुसार त्यांना पक्षाचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे.
जेटलींची जागा कोण घेणार ?
आपल्या आजारपणामुळे आपण मंत्रिपद स्वीकारू शकणार नाही असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून कळवले आहे. या मुळे जेटली यांचे मंत्रिपद कुणाला मिळणार, अशी चर्चा रंगली आहे. जेटली यांच्या अनुपस्थितीत हे पद पीयूष गोयल यांनी सांभाळले होते. हे लक्षात घेता गोयल या पदाचे दावेदार असू शकतील. तर, अर्थमंत्रिपदासाठी शहांचे नावही घेतले जात आहे.
स्मृती इराणींना कोणते मंत्रिपद मिळणार ?
स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव करत काँग्रेसचा पारंपरिक गड जिंकला. या मुळे स्मृतींना महत्वाचे खाते मिळेल असे म्हटले जात आहे. म्हणून स्मृती इराणी यांच्या मंत्रिपदाबाबत सर्वांनाच उस्तुकता आहे.
सुषमांची जागा कोण घेणार ?
आरोग्याच्या कारणामुळे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी यंदाची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. म्हणूनच, सुषमा स्वराज मंत्रिमंडळात असतील की नाही, याबाबतही उत्सुकता आहे. जर सुषमा स्वराज यांनी मंत्रिपद स्वीकारले नाही, तर परराष्ट्र मंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत उस्तुकता आहे.
जेडीयूला दोन मंत्रिपदे ?
भाजपव्यतिरिक्त एनडीएच्या घटकपक्षांना कोणती मंत्रिपदे मिळणार याबावरही लोकांच्या नजरा खिळल्या आहेत. या वेळी जेडीयू देखील सरकारचा भाग असणार आहे. जेडीयूला दोन मंत्रिपदे दिली जातील अशी चर्चा आहे. जेडीयूचे राज्यसभा खासदार आरपीसी सिंग आणि मुंगेरचे लोकसभा खासदार राजीव रंजन सिंग उर्फ लल्लन सिंग मंत्री बनू शकतात.
शिवसेनेकडून यावेळी कोण ?
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचे नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. ते अनंत गीतेंची जागा घेतील अशी चर्चा आहे.
सुखबीर घेणार पत्नीची जागा ?
अकाली दलाकडून या वेळी सुखबीर सिंग बाद यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. गेल्या सरकारमध्ये त्यांच्या पत्नी हरसिमरत कौर कॅबिनेट मंत्री होत्या.
रामविलास पासवान की चिराग पासवान ?
या वेळी निवडणूक न लढलेले रामविलास पासवान यांच्याबाबतही उत्सुकता कायम आहे. पासवान यांनी त्यांचे पुत्र चिराग पासवान यांना मंत्री बनवले जाण्याचे संकेत दिले होते. परंतु, एलजेपीच्या बैठकीत पासवान यांना मंत्री, तर चिराग यांना पक्षाच्या संसदीय पक्षाचा नेता बनवण्याबाबचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.
बंगालमधील मंत्र्यांची संख्या वाढणार ?
या वेळी पश्चिम बंगालमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली. याच कारणामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात पश्चिम बंगालचे प्रतिनिधीत्व वाढण्याची शक्यता आहे. बगालमधून २०१४ च्या निवडणुकीत भाजपला केवळ २ जागा जिंकता आल्या होत्या. आता मात्र हा आक़ा १८ वर पोहोचला आहे.
मनोज सिन्हांचे काय होणार ?
मनोज सिन्हा यांचा गाजीपूरमधून पराभव झाला आहे. मात्र त्यांना राज्यसभेच्या मार्गे मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल अशी चर्चा आहे.
दरम्यान, संतोष गंगवार यांना हंगामी लोकसभा सभापती बनवले जाणार आहे. ते नव्या खासदारांना शपथ देतील. ते बरेलीहून आठव्यांदा लोकसभेत पोहोचले आहेत.
अधिक वाचा : दोन पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला