नागपूर : विम्बल्डन या अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेत अधिकारी (पंच) म्हणून नागपूरकर सुप्रिया चॅटर्जी हिची निवड झाली आहे. यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेत सुप्रिया लाइन अंपायर व चेअर अंपायर अशा भूमिकेत दिसेल. या स्पर्धेकरिता पंच म्हणून निवड होणारी सुप्रिया ही पहिलीच नागपूरकर ठरली आहे.
आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या (आयटीएफ) व्हाइट बॅच या श्रेणीतील पंच असलेल्या सुप्रियाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. सुप्रियाने अखिल भारतीय टेनिस महासंघातर्फे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत अनेकदा पंचाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. तसेच चीनमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या प्राथमिक स्पर्धांमध्येही तिने पंच म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
नागपूर जिल्हा हार्डकोर्ट टेनिस संघटनेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार सुप्रिया यंदाच्या विम्बल्डनमध्ये सुरुवातीला लाइन अंपायर, तसेच त्यानंतरच्या स्पर्धेत काही सामन्यांमध्ये चेअर अंपायर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. शहरातील टेनिसचे ज्येष्ठ प्रशिक्षक संतोष चॅटर्जी यांची कन्या असून सुप्रिया ही नामवंत आयटी कंपनी पर्सिस्टंट सिस्टीम्समध्ये एचआर मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.
अधिक वाचा : लष्करात प्रथमच महिला जवान; ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू