यवतमाळ : मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये एकाच नावाचे तब्बल सहा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसचे उमेदवार सुभाष बापूराव वानखेडे हे आहे. तर सुभाष वानखेडे याच नावाचे अन्य पाच उमेदवारही मैदानात आहेत. उमेदवारांच्या नावामुळे मतदारांचा गोंधळ उडावा म्हणून गेल्या वेळेस काँग्रेसने ही खेळी खेळली होती. तर यावेळेस शिवसेनेने अशी खेळी केल्याची चर्चा आहे.
मराठवाड्यातील हिंगोली लोकसभा मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात १८ एप्रिल रोजी होत मतदान होत असून मंगळवारी १६ एप्रिलला सायंकाळी प्रचार थांबणार होणार आहे. रणरणत्या उन्हात काँग्रेस, शिवसेनेसह इतर पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार अंतिम टप्प्यात जोरात सुरु आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे आणि शिवसेनेचे उमेदवार आमदार हेमंत पाटील यांच्यात दुहेरी लढत होत असल्याचे दिसत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शेवटच्या फेरीत काँग्रेसचे राजीव सातव १६३२ मतांनी विजयी झाले होते.
उमरखेड मतदारसंघात सातव यांना १४७९ चे मताधिक्य होते. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष बापूराव वानखेडे यांचा पराभव केला होता. तेच सुभाष वानखेडे यावेळी शिवसेना सोडून काँग्रेसचे उमेदवार आहे. विशेष म्हणजे सुभाष वानखेडे याच नावाचे अन्य पाच उमेदवार निवडणुकीत उभे आहे. सुभाष काशिबा वानखेडे, सुभाष मारोती वानखेडे, सुभाष विठ्ठल वानखेडे हे अपक्ष उमेदवार आहेत. तर सुभाष परशराम वानखेडे हे बहुजन महापार्टी, तर सुभाष नागोराव वानखेडे हे हम भारतीय पार्टीकडून निवडणुकीच्या मैदानात उभे आहे. या पाच सुभाष वानखेडे पैकी दोघे उमरखेड मतदारसंघातील आहे. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांच्यासह अन्य दोन सुभाष वानखेडे होते. या दोन उमेदवारांनी १२ हजार ५४४ मते घेतली होती.
उमरखेड मतदारसंघात २ लाख ८६ हजार १५० मतदार आहेत. त्यात १ लाख ५० हजार ४९२ पुरुष तर १ लाख ३५ हजार ६५६ महिला व इतर २ असे मतदार आहे. उमरखेड मतदारसंघात ३४१ मतदान केंद्र आहे.
अधिक वाचा : प्रियकराच्या मदतीने आईवडिलांचा खून