स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांचे निर्देश : शेवटच्या टप्प्यात अधिक जोमाने कार्य करा ,नदी, नाले स्वच्छता अभियानाचा घेतला आढावा

नागपूर : शहरात सर्वत्र सुरू असलेले नदी, नाले स्वच्छता अभियान शेवटच्या टप्प्यात आले आहे. मात्र अद्यापही अनेक भागात काम शिल्लक असल्याच्या तक्रारी येत आहेत. प्रशासनाकडून प्रत्येक स्तरावर योग्य तयारी करण्यात येत असली तरी अनेक भागात येत असलेले अडथळे प्राधान्याने दूर करा व शेवटच्या टप्प्यात अधिक जोमाने काम करून अभियान शंभर टक्के यशस्वी व्हावे यासाठी पूर्ण योगदान द्या, असे निर्देश स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिले.

पाच मे पासून शहरातील नदी व नाले स्वच्छता अभियानाला सुरूवात झाली असून शहरातील विविध भागात सुरू असलेल्या कामाची दररोज स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांच्याकडून पाहणी करण्यात येत आहे. संपूर्ण कार्याच्या पाहणीदरम्यान गुरुवारी (ता.६) स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी अभियानासंदर्भात आढावा बैठक घेतली. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीत आरोग्य समिती सभापती मनोज चापले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक गोपीचंद कुमरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, नदी स्वच्छता अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, कार्यकारी अभियंता सर्वश्री गिरीश वासनिक, एम.जी.कुकरेजा, आसाराम बोदेले, राजेश भूतकर, अनिरुद्ध चौगंजकर, राजेंद्र रहाटे, अविनाश बारहाते, अनिल नागदिवे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे आदी उपस्थित होते.

यावेळी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी नदी व नाले स्वच्छता अभियानाच्या कार्याचा झोननिहाय आढावा घेतला. नदी व नाले स्वच्छतेसाठी निर्धारित कालावधी जवळ येत असूनही अनेक भागात काम पूर्ण न झाल्याने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. नदी स्वच्छतेबाबत बहुतांशी काम पूर्ण झाले असून शहरातील छोट्या नाल्यांच्या सफाईकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अनेक भागात नाल्याच्या शेजारी झोपडपट्ट्या वसलेल्या असल्याने पावसाळ्यामध्ये या वस्त्यांसाठी मोठी समस्या उभी राहू शकते. त्यामुळे अशा ठिकाणी तातडीने पाहणी करून स्वच्छता कार्य सुरू करण्याचे निर्देश स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिले.

नदी व नाले स्वच्छता अभियानासाठी ३१ पोकलेन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र यापैकी केवळ २२ सुरू असल्याचे दिसून येते त्यामुळे उर्वरित पोकलेनची तपासणी करून त्यांना तातडीने कामात लावणे आवश्यक आहे. अनेक मशीनमध्ये बिघाड येत असल्याचे कारण दाखवून कामात हलगर्जीपणा करणाऱ्या मशीन मालकांवर कारवाई करण्याचेही त्यांनी निर्देशित केले. अशोक चौकातील नाग नदीच्या पात्रातील गाळ उपसण्यात आला असून या ठिकाणची सुमारे २५० टिप्पर माती हटविण्यासाठी आवश्यक ते मशीन उपलब्ध करून देऊन त्वरित काम पूर्ण करणे. तसेच संतोषी नगर भागामधील नाल्यामध्ये हिरव्या वनस्पतीचे साम्राज्य आहे. याभागातील वनस्पती काढून नाल्याचा प्रवाह मोकळा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचेही निर्देश स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिले.

संबंधित भागामधील समस्या लक्षात घेता शुक्रवारी (ता.७) स्थायी समिती सभापती संबंधित प्रभागाचे नगरसेवक व अधिकाऱ्यांसोबत दौरा करून पाहणी करणार आहे. नदी व नाले स्वच्छतेचे काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. या अभियानाला प्राधान्य देऊन अधिक जोमाने काम करा व १० जूनला होणाऱ्या शेवटच्या आढावा बैठकीत कोणतीही तक्रार राहु नये यासाठी गांभीर्याने दखल घेऊन काम करा, असेही निर्देश स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिले.

अधिक वाचा : नागपुर पुलिस ने मध्यप्रदेश से शातिर चोर को धरदबोचा