नागपुरात पहिल्याच दिवशी मिळाला एसटी ला ‘रिस्पॉन्स’

एसटी

नागपूर : कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. त्यानंतर एसटीने प्रवासी वाहतूक सुरू केली. सुरुवातीला केवळ २२ प्रवाशांची वाहतूक करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले होते. त्यानंतर शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याचे आदेश मध्यवर्ती कार्र्यालयाने दिले. त्यानुसार पहिल्याच दिवशी एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी झाली. एका बसमध्ये ४४ च्या वर प्रवासी बसले. त्यामुळे एसटीचे उत्पन्न वाढून कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून एसटी बसेस ठप्प झाल्या होत्या. उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून एसटीने बसेसचे ट्रकमध्ये रूपांतर करून माल वाहतुकीस सुरुवात केली. त्यानंतर खासगी वाहनांचे टायर रिमोल्ड करून देण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र शासनाने आदेश दिल्यानंतर एसटीने प्रवासी वाहतुकीस सुरुवात केली. त्यानुसार केवळ २२ प्रवाशांची वाहतूक सुरू होती. काही दिवस एसटीला नुकसान सोसावे लागले. त्यानंतर शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने बसेस चालविण्याचे आदेश एसटीच्या नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार सकाळपासून पूर्ण क्षमतेने बसेस चालविण्यात येत आहेत. पहिल्याच दिवशी एसटीला चांगला प्रतिसाद मिळाला. बहुतांश मार्गावरील बसेसमध्ये ४४ प्रवासी बसले. ४४ प्रवाशांशिवाय ११ प्रवाशांना बसमध्ये उभे राहण्याचे परवानगी असते. परंतु एसटीमध्ये प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. परंतु अजून नागपुरातील चालक-वाहकांना सॅनिटायझर, मास्क पुरविण्यात आले नसल्यामुळे असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.

पहिल्याच दिवशी प्रतिसाद
‘पुर्ण क्षमतेने बसेस चालविण्याचे आदेश मिळाल्यानंतर आम्ही बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या. पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानुसार एसटीला चांगले उत्पन्न होईल.’
अनिल आमनेरकर, आगार व्यवस्थापक, गणेशपेठ आगार

वाहकांना सुरक्षा पुरवावी
एसटी बसेस पुर्ण क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय आहे. परंतु त्यामुळे बसमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. वाहकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मास्क, सॅनिटायझर पुरविण्याची गरज आहे.’
अजय हट्टेवार, प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटना

वाहकांना सॅनिटायझर, मास्क द्यावेत
‘ पुर्ण क्षमतेने बसेस सुरु करण्याचा निर्णय चांगला आहे. बसेसमध्ये प्रवाशांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी वाहकांना सॅनिटायझर, मास्क पुरविण्यात यावे.’
शालीनी जामनीक, वाहक, नागपूर