राहुल गांधी यांनी आपल्या द्वेषभावनेने प्रेरित वक्तव्यातून उत्तर तसेच दक्षिण भारतातील जनतेत फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्याचा सर्वांनी एकमुखाने निषेध करायला पाहिजे, या शब्दांत केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. मी 15 वर्षे उत्तर भारताचा खासदार होतो. या काळात मला वेगळ्या पद्धतीच्या राजकारणाची सवय लागली. मात्र, केरळमध्ये आल्यावर मला वेगळा अनुभव आला. येथील लोक मुद्यांवर विश्वास ठेवतात, मुळापर्यंत जाऊन कोणत्याही गोष्टींचा विचार करतात. केरळचे लोक अतिशय बुद्धिमान राजकारण करतात, त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी तिरुवनंतपूरम् येथील जाहीर सभेत केले होते.
राहुल गांधी यांच्या या विधानावरून वातावरण तापले आहे. उत्तर भारतातील जनतेचा, मतरांचा त्यांनी अपमान केल्याचा आरोप करीत भाजपा नेते त्यांच्यावर तुटून पडले. आपल्या द्वेषमूलक अशा वक्तव्यातून आणि बदला घेण्याच्या राजकीय प्रवृत्तीतून राहुल गांधी यांनी अमेठीच्या मतदारांचाच अपमान केला नाही, तर देशात उत्तर भारत आणि दक्षिण भारत अशी फूट पाडण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या अशा वक्तव्याचा सर्वांनीच निषेध करायला हवा. राहुल गांधी कृतघ्न आहेत, असेही त्या म्हणाल्या. फूट पाडण्याचे राजकारण करायची राहुल गांधी यांची पहिलीच वेळ नाही. याआधी त्यांनी आसाममध्ये जाऊन गुजरातच्या जनतेवर टीका केली होती. त्याचा परिणाम म्हणून गुजरातमधील मनपा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला, याकडे इराणी यांनी लक्ष वेधले. राहुल गांधी देशातील जनतेशी कधीपर्यंत खोटे बोलणार आहेत, अशी विचारणाही त्यांनी केली.