नागपूर : शहरात गुरुवारी उत्साहात मतदान झाल्यानंतर, शुक्रवारला मनपात गर्दी होईल, ही अपेक्षा फोल ठरली. मनपात शुक्रवारी नगरसेवक तर भटकले नाहीतच, कर्मचारीही निवडणुकीच्या कामामुळे आले नाहीत. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाटाचे वातावरण होते. १३ एप्रिलला दुसरा शनिवार आणि १४ एप्रिलला रविवार यामुळे आता थेट सोमवारी मनपात गर्दी झाल्यानंतर मतदानाच्या चर्चांना ऊत येईल.
मनपात सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांची रेलचेल असते. त्यामुळे गुरुवारी मतदान झाल्यानंतर शुक्रवारी मनपात गर्दी होईल, ही अपेक्षा होती. परंतु, शुक्रवारी नगरसेवकही न आल्याने हजर असलेल्या काही कर्मचाऱ्यांमध्येही चलबिचल होती. गेल्या काही दिवसांपासून प्रचारात व्यस्त असल्याने अनेकांनी घरी राहणेच पसंत केले. तर, अनेक नगरसेवक पक्षातर्फे बुथ आराखडे बांधण्यात व्यस्त असल्याने मनपाकडे फिरकले नाहीत. साधारणत: निवडणुकीनंतर मनपात सर्वपक्षीय कार्यकर्ते व नगरसेवकांची गर्दी होते. त्यानंतर वेगवेगळ्या पक्षांचे नगरसेवक आपापल्या पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाचे गणित मांडतात. यावेळी तशीच अपेक्षा होती. मात्र, कडक उन्ह आणि प्रचारातून आलेला थकवा शांत करण्यासाठी नगरसेवकांनी घरीच राहणे पसंत केले. निवडणुकीच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांनीही शनिवार व रविवार सुटी असल्याचे पाहून शुक्रवारी बुट्टी मारली. त्यामुळे मनपातील विविध विभाग ओस पडले होते. केवळ शिपाई व चपराशीच तेवढे मनपात फिरकत होते.
भाजपचे नगरसेवक त्यांच्या उमेदवारांचे तर, काँग्रेसचे नगरसेवक त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांच्या विजयाचे गणित मांडणार आहे. त्यामुळे पुढील आठवडाभरात ‘कोण जिंकणार’, यावर मनपात चर्चेला उधाण येईल.
अधिक वाचा : तोट्यातील एक्स्चेंज करणार बंद