सिकलसेल असोसिएशन नागपूर: सिकल सेल जनजागृती सप्ताह सुरु

सिकलसेल असोसिएशन नागपूर: सिकल सेल जनजागृती सप्ताह सुरु

नागपूर: अत्यंत दुर्धर व अनुवांशिक आजार म्हणून ओळख जाणार्‍या सिकलसेलग्रस्त रुग्णांना नियमित रक्ताची आवश्यकता भासते. त्यांना वेळोवेळी रक्त द्यावे लागते. रक्ताचे प्रमाण कमी राहत असल्याने रुग्ण वारंवार आजारी पडतो. तसेच मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. या गंभीर आजाराविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी, यासाठी सिकलसेल असोसिएशन नागपूरच्यावतीने 28 फेब्रुवारी ते 6 मार्चंपर्यंत जनजागृती सप्ताह पाळण्यात येणार आहे.

सिकलसेल हा आजार गर्भधारणेच्या वेळी जेनेटीक बदलामुळे होतो. तसेच रक्तदोषामुळे उद्भवणारा दुर्धर आजार असून जन्मापासून मनुष्याच्या अंतापर्यंत सोबत राहतो. रक्तात लाल व पांढर्‍या अशा दोन प्रकारच्या पेशी असतात. सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरात लाल रक्तपेशींचा आकार गोल असतो. परंतु सिकलसेल रुग्णात पेशीचा आकार ऑक्सिजन पुरवठ्याअभावी विळ्यासारखा होतो. आई आणि वडील दोघेही सिकलसेलग्रस्त किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होतो. त्यामुळे समाजातील सिकलसेल वाहक-ग्रस्त व्यक्तीने आपापसात विवाह टाळावे. सिकलसेल वाहक-पीडित व्यक्तीने एकमेकांशी विवाह करू नये, असा हितोपदेश सिकलसेल असोसिएशनचे अध्यक्ष माजी आ. डॉ. मिलिंद माने यांनी दिला.

सिकलसेल जनजागृती सप्ताहानिमित्त आजपासून पाच दिवसाचे आभासी वेबिनार आयोजित करण्यात आले. या वेबिनारचे उद्घाटन डॉ. मोहंती यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अतिथी म्हणून पद्मश्री एस. एल. काटे उपस्थित होते. 1 मार्च रोजी होणार्‍या चर्चासत्रात गुजरातचे डॉ. जे. पटेल, डॉ. डी. जैन, छत्तीसगडचे डॉ. नरलावार सहभागी होणार आहेत. 3 मार्चला डॉ. एन. धकाते, डॉ. ए. पुगलिया, डॉ. अनुराधा श्रीखंडे मार्गदर्शन करतील.5 मार्चला डॉ. ए. खांडेकर, डॉ. एन. निंबाळकर हे मार्गदर्शन करतील. 6 मार्चला डॉ. एम. बी. अग्रवाल यांचे मार्गदर्शन होईल. 7 मार्चला आरोग्य शिबिर होईल.

विशेष म्हणजे नागपूरच महापौर दयाशंकर तिवारी हे 1 मार्च रोजी दुपारी 4 वाजता अधिवेशनात उपस्थिती दर्शविणार आहेत. त्यांनी डे केअरचा विकास करण्यास उत्सुकता दर्शविली असल्याचे आयोजन सचिव डॉ. अनुराधा श्रीखंडे यांनी सांगितले आहे.

नितीन गडकरी यांचे 6 मार्चला उद्बोधन
या चर्चासत्रात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे 6 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता सहभागी होणार आहेत. सिकलसेल रूग्णांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी ते उद्बोधन करणार आहेत.

विविध विषयावर चर्चा
सिकलसेल रुग्णांचे हळूहळू वय वाढत गेल्यानंतर त्यांचा परिणाम शरीरातील अवयवाला होत असतो. विशेषतः मूत्रपिंड, फुफ्फुसे, मेंदू, डोळे, मोठे सांध्यावर होत असतो. भविष्यात अवयवाचे नुकसान कसे टाळावे, यावर वेबीनारमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.