मुंबई: राज्यात सत्तास्थापनेवरून वादळ सुरू असतानाच शिवसेनेचा ‘तोफखाना’ सांभाळणारे खासदार संजय राऊत सोमवारी राज्यपालांची भेट घेणार आहेत.उद्या सायंकाळी पाच वाजता ते राज्यपालांना भेटणार आहेत. खासदार राऊत हे सत्तास्थापनेचा दावा करणार नाहीत मात्र घटनेनुसार सर्वात मोठ्या पक्षाला आमंत्रण द्या अशी मागणी ते करणार आहेत. राज्यातील सत्तास्थापनेच्या प्रक्रीयेला सुरुवात करावी या मागणीसाठी राज्यापालांशी ते भेटणार असल्याचं सांगितलं जातेय. गेले काही दिवस शिवसेनेकडून भाजपवर डागण्यात येणाऱ्या तोफगोळ्यांची जबाबदारी राऊत हे सांभाळत आहेत. त्यांच्या अनेक वक्तव्यांनी भाजपला घायाळ केलं असून राऊत दररोज नवनवीन दावे करत असल्याने मोठी कोंडी निर्माण झालीय. शिवसेनेकडे 170 आमदारांच बहुमत असून शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथ घेईल असं वक्तव्य त्यांनी रविवारी केलं होतं त्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी राज्यपालांची भेट घेणं महत्त्वाचं मानलं जातंय.
शिवसेनेकडे 170 आमदारांचं संख्याबळ
धमक असेल तर भाजपने सत्तास्थापनेचा दावा करावा आणि बहुमत सिद्ध करावं, नंतर काय करायचं ते बघू. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात आज 170 पेक्षा जास्त आमदारांची यादी आहे असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. राऊत यांच्या या दाव्यामुळे भाजपचं टेंशन वाढण्याची शक्यता आहे. आम्ही जास्तिचं काहीही मागत नाही. जे आमच्या हक्काचं आहे तेच आम्ही मागत असल्याचंही ते म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले, मुख्यमंत्री जर म्हणत असतील की भाजपचं सरकार येणार आहे तर त्यांनी राज्यपालांकडे दावा करावा आणि राज्यपालांनी त्यांना आठ, पंधरा नाहीतर एक महिन्यांची मुदत बहुमत सिद्ध करण्यासाठी द्यावी. ते बहुमत सिद्ध करू शकले नाहीत तर इतर सर्व पर्याय खुले आहेत असंही त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं.
‘सामना’मधूनही संजय राऊत भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार प्रहार करत आहेत. ‘सत्तेचं गणित जमलं की आम्ही माध्यमांसमोर मांडणार आहोत. पण आता अंतिम निर्णयापर्यंत उद्धव ठाकरे आले आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल. ऑपरेशन कमळ महाराष्ट्रात चालणार नाही. काही दिवसांत शिवतीर्थावर शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल,’ असा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.