आज माझ्यासाठी आनंदाचाही दिवस आहे आणि दु:खाचाही: सचिन अहिर

Sachin Ahir Confirms His ShivSena Joining
Sachin Ahir Confirms His ShivSena Joining

नागपूर: ‘काही वेळा कठोर निर्णय घ्यावे लागतात, ते निर्णय योग्य की अयोग्य ते काळच ठरवेल, आज माझ्यासाठी आनंदाचाही दिवस आहे आणि दु:खाचाही’, असे सांगत आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याच्या वृत्तावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिक्कामोर्तब केला. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी जाण्यासाठी निघत असताना प्रसारमाध्यमांशी बोलताना अहिर यांनी हे मनोगत व्यक्त केले. पक्षप्रवेशाबाबत आपण आता पत्रकार परिषदेतच बोलू असे म्हणत त्यांनी अधिक प्रश्नांची उत्तरे टाळली.

अहिर यांचा प्रभाव असलेल्या वरळी या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सचिन अहिर यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशामुळे वरळी मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढणार आहे. वरळीमधून आदित्य ठाकरे यांच्या नावाची चर्चा असल्याने स्वत: सचिन अहिर बाजूच्या भायखळा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचेही बोलले जात आहे.

आदित्य ठाकरे यांच्या विकासाच्या कामांच्या संकल्पनांमुळे आपण प्रभावित झालो आहोत. आता पर्यंत माझ्या भागात मी विकासकामे करत आलो आहे. या पुढील काळातही अधिक जोमाने आपण जनतेची कामे करू, असा विश्वासही अहिर यांनी व्यक्त केला.

पवार यांचे स्थान माझ्या हृदयात

मी एका विचारधारेच्या प्रवाहातून एका नव्या प्रवाहात जात आहे. याबाबत आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी माझ्या पक्षप्रवेशाबाबत बोलणे होऊ शकले नाही. शरद पवार यांचे स्थान माझ्या हृदयात कायम आहे, अशा शब्दात सचिन अहिर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझ्या मतदारसंघातील वस्तुस्थिती आपण शरद पवार यांच्या कानावर घातलेली असल्याचेही ते म्हणाले.