नागपूर : माजी क्रिकेटपटू रॉबिन सिंहनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला असून, त्यानं विद्यमान मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींवर निशाणा साधला आहे. शास्त्री प्रशिक्षकपदावर असताना, भारतीय संघ दोन विश्वचषक स्पर्धांमधील उपांत्य लढतीत पराभूत झाला आहे. त्यामुळं आताच प्रशिक्षणाच्या रचनेत बदल करणे गरजेचे आहे, असं रॉबिन म्हणाला.
प्रशिक्षकाच्या भूमिकेविषयीही रॉबिन सिंहनं अनेक मते मांडली. ‘तुमची स्वतःची मानसिक तयारी असावी लागते. संघ आणि खेळाडू ज्या परिस्थितीचा सामना करतात, त्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. संघासाठी तयार केलेल्या योजनांमध्ये सहभागी व्हावं लागतं. तांत्रिकदृष्ट्या खेळ समजून घेतला तरच, तुम्ही हे सर्व करू शकता,’ असं रॉबिन म्हणाला.
मीडिया रिपोर्टनुसार, रवी शास्त्री यांच्याकडेच टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सोपवली जाऊ शकते. रॉबिनही प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहे. १३६ एकदिवसीय सामन्यांत रॉबिननं भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. २००७-०८मध्ये त्यानं भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपद सांभाळलं होतं. आयपीएलमध्ये त्यानं मुंबई इंडियन्सचं सहायक प्रशिक्षकपदही भूषवलं आहे.
अधिक वाचा : विधानसभा निवडणूक लढायची झाल्यास दक्षिण पश्चिम नागपुरातूनच लढेल