नागपूर – कळमन्यात लुटारुंचा हैदोस

Nagpur

नागपूर : कळमन्यातील बावनगावमधील झाडे ले-आऊट येथे सशस्त्र लुटारुंनी हैदोस घालून तीन घरांमध्ये लुटपाट केली. प्रतिकार केल्याने लुटारुने चाकूने वार करून एका नागरिकाला जखमी केले. ही घटना मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरातील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण असून पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. शेख सलीम शेख चांदमिया (वय ४८), असे जखमीचे नाव आहे. लता रंगलाल नागपुरे (वय ४५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

कळमन्यातील रेल्वे रुळाच्या बाजूला झाडे ले-आऊट आहे. तेथे चार ते पाच घरे आहेत. मंगळवारी रात्री चेहऱ्याला दुपट्टा बांधून चार लुटारु लता यांच्या घरात शिरले. त्यांनी अशोक नावाच्या व्यक्तीचा पत्ता विचारला. तो गावाला गेल्याचे लता यांनी सांगितले. त्यानंतर लुटारुंनी लता यांना शिविगाळ केली. शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील मंगळसूत्र तर त्यांच्या पतीकडील मोबाइल हिसकावला. त्यानंतर लुटारु बाजूलाच असलेल्या शेख सलीम शेख चांदमिया यांच्या घरात घुसले. त्यांनाही शस्त्राचा धाक दाखविला. त्यांनी प्रतिकार केला. लुटारुने त्यांच्यावर चाकूने वार केला. त्यांच्याकडून आठ हजारांची रोख हिसकावली. तसेच अशोक यांच्या घराचा दरवाजा तोडून साहित्याची तोडफोड केली. लता व चांदमिया यांना ठार मारण्याची धमकी देऊन लुटारु पसार झाले. लता यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून लुटारुंचा शोध सुरू केला आहे.

अशोकचा वाद कारणीभूत ?

काही दिवसांपूर्वी अशोक यांचा युवकांसोबत वाद झाला होता. त्यांनी अशोक यांना मारहाण केली होती. त्यानंतर अशोक घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले. या वादातूनच ही लुटामार करण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अधिक वाचा : नागपूर : आईचा मुलाला ठार मारण्याचा प्रयत्न