पतीच्या निधनानंतर पुनर्विवाहितांना मिळणार पेन्शन

Date:

नागपूर : सरकारी सेवेत असणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याचे कर्तव्यावर असताना निधन झाले, तर दिवंगत कर्मचाऱ्यावर अवलंबून असलेल्या विधवा पत्नीला सरकार निर्वाह भत्ता म्हणून अर्धे निवृत्तीवेतन अदा करते. मात्र, कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीने आयुष्याची नवी सुरुवात करीत जर पूनर्विवाह केला, तर यापूर्वी तिला दिला जाणाऱ्या निवृत्तीवेतनाचा लाभ काढून घेतला जायचा. मात्र, सरकारने या धोरणात सुधारणा करीत कर्मचाऱ्याची विधवा पत्नी फेरविवाह करीत असेल तरीही ती निवृत्तीवेतनास पात्र ठरेल, असा अध्यादेश जारी केला आहे. त्यामुळे जोडीदाराच्या निधनानंतर फेरविवार करणाऱ्या विधवांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

वित्त विभागाने या संदर्भात ७ फेब्रुवारीला जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ११ जून २०१५ पूर्वी पुनर्विवाह केला असेल आणि ज्याचे कुटुंब निवृत्ती वेतन बंद झाले असेल अशांनादेखील हा नियम लागू राहणार आहे. सरकारने महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ मधील नियम ११६ (५)(एक) मध्ये सुधारणा करीत हा नवा अध्यादेश जारी केला आहे.

ज्या विधवांचे कुटुंबनिवृत्ती वेतन २०१५ ला बंद झाले असेल त्यांना या पुढच्या काळातील थकबाकी अनुज्ञेय राहणार आहे. त्यापूर्वीच्या काळातील निवृत्ती वेतनाची थकबाकी मात्र अनुज्ञेय राहणार नाही, असेही अध्यादेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. दिवंगत कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला सामोरे जावे लागणाऱ्या आर्थिक संकटांचा विचार करता धोरणात सुधारणा करण्याची बाब सरकारच्या विचाराधीन होती. मात्र त्यासाठी संबंधितांना कार्यालयाकडे रितसर अर्ज करून कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यानंतरच हा लाभ मिळणार आहे.

अधिक वाचा : ‘समता’ घोटाळ्यात एमपीआयडीचा गुन्हा

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related