मुलांच्या मदतीने पतीला संपविले

नागपूर : मुलांच्या मदतीने पत्नीने पतीची हत्या केली. ही थरारक घटना गुरुवारी सायंकाळी महालमधील झेंडा चौक भागात उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

रवींद्र अडुळकर (वय ५३) असे मृताचे नाव आहे. कोतवाली पोलिसांनी रवीना ऊर्फ उषा (४५), तिची मुले अभिषेक (वय २५) व अक्षय (२१) या तिघांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र यांची झेंडा चौकात इमारत आहे. त्यामध्ये दहा गाळे आहेत. काही गाड्यांमध्ये भाडेकरू असून, एका गाळ्यात अभिषेक हा टॅटूचे दुकान चालवितो. रवींद्र यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय रवीना यांना होता. यावरून दोघांमध्ये वाद होत होते.

२०१५ मध्ये रवीनाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रवींद्रविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला. याचा खटला न्यायालयात सुरू आहे. तीन वर्षांपासून रवींद्र हे हिंगणा भागात एका महिलेसह भाड्याने राहायचे. गुरुवारी या खटल्याची सुनावणी झाली. सायंकाळी रवींद्र हे झेंडा चौक येथे आले. ते रवीनाला शिवीगाळ करायला लागले. त्याचवेळी अभिषेक तेथे आला. त्याने रवींद्र यांच्या डोळ्यात स्प्रे मारला. यातून त्यांच्यात वाद झाला व सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास एका मुलाने त्यांच्या डोळयात पेपर स्प्रे टाकला. त्यानंतर रवीना, अक्षय व अभिषेकने विटा, दगड, काठीने रवींद्र यांच्या डोक्यावर वार केले. बचावासाठी रवींद्र घराबाहेर आले. त्यानंतरही तिघांनी त्यांच्या डोक्यावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात ते खाली पडले. यातच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

गाळे विकायला काढले होते…

रवींद्र यांनी गाळे विकायला काढले होते. या संपत्तीतून ते पत्नी व मुलांना वाटा देणार नव्हते. त्यामुळे तिघेही संतापले होते. संपत्तीच्या वादातून तिघांनी रवींद्रची हत्या केल्याची चर्चाही परिसरात आहे.

अधिक वाचा : पतीच्या निधनानंतर पुनर्विवाहितांना मिळणार पेन्शन