नागपूर: सीताबर्डी मुख्य मार्गावरील फ्रेण्ड्स शोरूममधील नोकराने आणखीही काही महिला ग्राहकांचे मोबाइलद्वारे चित्रीकरण केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलिस कोठडी संपल्याने नोकराला पोलिसांनी सोमवारी न्यायालयात हजर केले. त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. युक्तिवादानंतर न्यायालयाने नोकराच्या कोठडीत एक दिवसाची वाढ केली.
निखिल ऊर्फ पिंटू दीपक चौथमल (वय २७, रा. आंबेडकरनगर, पाचपावली), असे अटकेतील नोकराचे नाव आहे. शुक्रवारी सतरावर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी फ्रेण्ड्सच्या ट्रायल रूममध्ये कॉलेजचा ड्रेस घालून बघत होती. यावेळी तिला मोबाइल दिसला. तिने मोबाइलसह सीताबर्डी पोलिस स्टेशन गाठले. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. नोकर निखिल व मालक किसन इंदरचंद अग्रवाल (वय ५४, रा. वर्धमाननगर) यांना अटक केली. दोघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने किसन यांची जामिनावर सुटका केली तर निखिलची दोन दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली. सोमवारी पोलिस कोठडी संपल्याने निखिलला पोलिसांनी न्यायालयात हजर केले.
शोरूमध्ये काम करताना त्याने आणखी कोणाकोणाचे मोबाइलद्वारे चित्रीकरण केले, त्याने हे चित्रीकरण व्हायरल केले आहे का, कम्प्युटरमध्ये ते साठवून ठेवले आहे का, याचा तपास करायचा आहे. घराची झडती घ्यायची असल्याने निखिलच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी विनंती सीताबर्डी पोलिसांनी न्यायालयाला केली. युक्तिवादानंतर न्यायालयाने निखिलच्या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ केली. याप्रकरणाचा तपास सीताबर्डी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत हे करीत आहेत.
अधिक वाचा: कोल्हापूर, साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा; पूरबळींची संख्या ४३ वर