गडकरी प्रवास करत असलेले इंडिगोचे विमान रोखले

indigo
indigo

नागपूर: तांत्रिक बिघाडांमुळे आज सकाळी नागपूरहून दिल्लीला जाणारे इंडिगोएअरलाइन्सचे विमान रनवेवरूनच परतले आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाला असल्याचं लक्षात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. या विमानात केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इंडिगोचे ६ ई ६३६ हे विमान आज सकाळी नागपूरहून दिल्लीसाठी रवाना होणार होते. नितीन गडकरीदेखील या विमानात उपस्थित होते. विमान रनवेवर धावायला लागल्यावर काही क्षणातच पायलटला विमानात गंभीर तांत्रिक बिघाड झाल्याचं लक्षात आलं. त्याने लगेच विमान रोखले आणि शेडच्या दिशेने वळवले. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असून नागपूर विमानतळावरील अभियंते विमानाची चाचपणी करत आहेत.

आज सकाळी दिल्ली विमानतळावरही बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरली होती. यामुळे विमान वाहतूक सुमारे तीन तास विस्कळीत झाली होती. कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांमध्ये हाय अॅलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामुळे विमानतळांवर सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात आहे.

अधिक वाचा: कोल्हापूर, साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा; पूरबळींची संख्या ४३ वर