वीर सावरकर हे राष्ट्रभक्त नव्हते का? कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांचा सवाल

रविशंकर प्रसाद

नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकर व महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न देण्याचे आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले आहे. तो देशाचा गौरव आहे. परंतु सावरकर यांना भारतरत्न देण्यास काँग्रेसचा विरोध आहे. हा विरोध कशासाठी, वीर सावरकर हे राष्ट्रभक्त नव्हते का? की केवळ गांधी घराण्यातच भारतरत्न दिले पाहिजे, असा सवाल केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला.

राज्य सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न मिळावा, अशी मागणी यापूर्वी केली होती आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला होता. भाजपच्या जाहीरनाम्यातही त्याचा समावेश आहे. काँग्रेसने सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मौलाना आजाद यांना भारतरत्न देण्यास उशीर केला. प्रचारात भाजप नेते अनुच्छेद ३७०चा मुद्दा मांडतात. मात्र त्यालाही आता विरोध होत आहे असा आरोप प्रसाद यांनी केला.

ओवेसींकडून समाज तोडण्याचे काम – शहनवाझ हुसेन

एमआयएम ही काँग्रेसची बी टीम असून त्यांच्या पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी सभांमधून समाज तोडण्याचे काम करत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात त्यांचे अस्तित्व उरणार नाही, असे मत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाझ हुसेन यांनी व्यक्त केले. हुसेन म्हणाले, राज्यात एमआयएमची ताकद कमी होत आहे. त्यांच्यावर समाजाचा विश्वास राहिलेला नाही.