वाघांचे पुतळे उभारून त्यांचे संवर्धन होत नाही : राज ठाकरे

अध्यक्ष राज ठाकरे

मुंबई : अवनी या वाघिणीच्या शिकारीच्या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. ‘वाघाचे पुतळे उभे करून वाघ वाचत नाहीत. जी गोष्ट वाचवली जाऊ शकते, ती मारायची नसते. अवनीला मारण्यापूर्वी तिला बेशुद्ध करायला हवे होते’, असं सांगतानाच ‘अनिल अंबानींच्या उद्योगांसाठी वाघाला मारण्यात आल्याचं समोर येतंय. या अंबानींसाठी भाजपनं अख्खा देश विकायला काढला आहे’, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.

राज ठाकरे यांनी अवनीच्या मृत्यूवरून राज्यसरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘एक तर वाघ दुर्मिळ होत चालले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी त्यांचे पुतळे उभारले जात आहेत. केवळ पुतळे उभारून वाघ वाचत नाहीत. जी गोष्ट वाचवता येते तिला मारायची गरजच काय?’ असा सवाल राज यांनी केला. ‘वाघिणीच्या हल्ल्यात जे दहा-बाराजण गेले त्याचे मला वाईट वाटते. मात्र असले प्रकार जगभर घडत असतात. वाघांच्या वस्त्यात माणसांनी आक्रमण केलं की या घटना घडतात. बोरिवलीच्या राष्ट्रीय उद्यानातही इमारती उभ्या राहत आहेत. वाघांच्या वस्तींवर अतिक्रमण होत आहे, त्याकडे सरकारनं लक्ष द्यावं’, असा सल्लाही त्यांनी दिला. गुजरातमध्ये सिंह मारला गेला असता तर किती बोंब झाली असती, असा सवालही त्यांनी केला.

राज यांनी यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही हल्ला चढवला. ‘मुनगंटीवार बेफिकीरपणे उत्तरे देत आहेत. ते वनमंत्री आहेत म्हणून त्यांना सर्व कळतं असं नाही. त्यांनी काही जंगलाचं संशोधन केलेलं नाही. उद्या त्यांचं मंत्रीपदही जाऊ शकतं. त्यांनी जबाबदारीनं बोलावं’, असा टोला त्यांनी मुनगंटीवार यांना हाणला.

अधिक वाचा : ‘अवनी’ला ठार करायचे नव्हते, स्वरक्षणासाठी गोळी झाडली: नवाब अजगरअली