‘अवनी’ला ठार करायचे नव्हते, स्वरक्षणासाठी गोळी झाडली: नवाब अजगरअली

अवनी T1 tigress WII

‘अवनी’ वाघिणीला आम्हाला ठार मारायचे नव्हते. पण जेव्हा वन खात्याच्या अधिकाऱ्याने तिच्यावर ट्रँक्विलाइज़र डार्टने निशाणा साधला. त्यावेळी ती उत्तेजित झाली आणि आमच्या वाहनाकडे झेपावली. त्यावेळी मी स्वसंरक्षणार्थ तिच्यावर गोळी झाडली, असे शिकारी शआफतअली खान यांचा मुलगा नवाब अजगरअलीने स्पष्ट केले. अवनी वाघिणीला गोळ्या झाडून ठार मारल्यानंतर सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या मालिकेत शआफतअली खान आणि त्यांचा मुलगा नवाब अजगरअली वादाचा केंद्रबिंदू होते. त्यानंतर प्रथमच या पिता-पुत्रांनी आपली बाजू मांडली. याप्रकरणी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी महाराष्ट्र सरकार तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर आरोप केले होते. तसेच शआफतअली खानवर त्यांनी गंभीर आरोपही केले होते.

नवाब अजगरअली म्हणाला, मागील २ वर्षांत अवनीला ५ वेळा ट्रँक्विलाइज़ करण्यात आले. पण ती शांत झाली नाही. ग्रामस्थांना ती दिसली. वाघिणीच्या हल्ल्यात कोणताही व्यक्ती मारला जाऊ नये म्हणून आम्ही लगेच त्या ठिकाणी गेलो. वनअधिकाऱ्यांनी तिच्या दिशेने ट्रँक्विलाइज डार्टने निशाणा साधला. परंतु, यामुळे ती आणखीनच उत्तेजित झाली आणि आमच्या वाहनावर ती झेपावली. मी स्वरक्षणार्थ तिच्यावर गोळी झाडली.

महाराष्ट्रात वाघांची संख्या अधिक आहे. तेथील जंगलांची क्षमता संपली आहे. जंगलात काही नसल्याने ते बाहेर पडत आहेत. या वाघिणीने १३ जणांचा जीव घेतला होता. मागील २ वर्षांपासून वन खाते तिला जेरबंद करण्याचा प्रयत्न करत होते, अशी माहिती शआफतअली खान यांनी दिली.

दरम्यान, मनेका गांधी यांनी शआफ़तअली खानवर गंभीर आरोप केले होते. खानने आतापर्यंत ३ वाघिणी किमान १० बिबटे, काही हत्ती आणि ३०० हून अधिक जंगलातील प्राण्यांना मारले. देशद्रोही लोकांना शस्त्रे पुरवणे आणि हैदराबाद येथील एका खून प्रकरणातील तो संशयित आरोपी आहे. तरीही सरकार त्यालाच नेहमी हे काम का देते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

तर दुसरीकडे, सुधीर मुनगंटीवार यांनीही मनेका गांधी यांना प्रत्युत्तर दिले होते. मनेका गांधींनी केलेली टीका माहितीच्या अभावी असून वाघिणीला ठार करण्याचा निर्णय मंत्री किंवा सचिव घेत नाही. राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या (एनटीसीए) मार्गदर्शिकेनुसार याबाबत निर्णय घेतल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले होते. मनेका गांधी यांचे वन्य प्राण्यांवर प्रेम आहे. त्या स्वत: महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आहेत. वाघिणीच्या हल्ल्यात मृत झालेल्या महिलांचाही विचार मला करावा लागतो, अशा शब्दांत त्यांनी मनेका गांधी यांना टोला लगावला होता.

अधिक वाचा : NTCA takes cognisance of shooting of T1 tigress Avni