नागपूर : शहर पोलिसमधील एका हवालदाराचा बुधवारी मृत्यू झाला. कोराडी रोडवरील एका खासगी रुग्णालयात ही घटना घडली. या घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये रोष आहे. मृत ५२ वर्षीय विजय श्रीवास्तव आहेत. श्रीवास्तव पोलीस मुख्यालयात ग्रील इन्स्ट्रक्टर होते. ते बºयाच दिवसांपासून गॅँगरीनने त्रस्त होते. त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने कुटुंबीयानी बुधवारी सकाळी त्यांना खासगी रुग्णालयात आणले. त्यांना भरती करावे, अशी विनंती नातेवाईकांनी केली. परंतु डॉक्टरांनी त्यांना बेड उपलब्ध नसल्याचे सांगत त्यांना आपात्कालीन कक्षातच ठेवले. श्रीवास्तव यांची पूर्वीही दोन ते तीन वेळा प्रकृती अत्यवस्थ झाली होती. त्यांची अवस्था लक्षात घेता, सहकाऱ्यांनी पोलीस रुग्णालयाचे डॉक्टर व वरिष्ठ अधिकाºयांना माहिती दिली.
नातेवाईकांचे म्हणणे आहे की पोलीस रुग्णालयातील डॉक्टर खानापूर्ती करण्यासाठी खासगी रुग्णालयात आले. श्रीवास्तव यांची माहिती घेऊन ते परतले. घटनेची माहिती मिळताच मानकापूरचे पोलीस निरीक्षक गणेश ठाकरे, हवालदार प्रमोद दिघोरे रुग्णालयात पोहचले. सायंकाळी ५.३० वाजता श्रीवास्तव यांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की त्यांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. कोरोना रुग्णासाठी आरक्षित सर्व बेडवर रुग्ण असल्यामुळे श्रीवास्तव यांना बेड उपलब्ध करणे शक्य नव्हते. कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत शहरातील ९ व ग्रामीण पोलीस विभागातील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.