आरोग्यवर्धक जीवन जगण्यासाठी पार्क, उद्यानांचे संरक्षण आवश्यक

पार्क

नागपूर : माणसांसह सर्व प्रकारच्या जीवांना आरोग्यवर्धक जीवन जगता यावे याकरिता पार्क, उद्यान व अन्य हिरवळीच्या क्षेत्रांचे संरक्षण करणे काळाची गरज आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांनी नोंदवले.

चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्कच्या संचालनाकरिता खासगी ऑपरेटर नियुक्तीचे टेंडर उच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केले. त्या निर्णयात न्यायालयाने हिरवळीच्या महत्त्वावर भूमिका मांडली. नागरिक मोठ्या संख्येत शहरात स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे शहरे सतत फुगत आहेत. त्यांचे झपाट्याने सिमेंटच्या जंगलांमध्ये परिवर्तन होत आहेत. आधी हिरवेगार असणारे परिसर नाहिसे होत चालले आहेत. सध्या नागरिकांना शरीर व मनावरचा ताण हलका करण्यासाठी मोकळी जागा शोधावी लागत आहे. याशिवाय लोकसंख्या वेगात वाढत आहे. लोकसंख्येसोबत वाहने वाढत आहे आणि वाहनांसोबत प्रदूषणामध्ये भर पडत आहे. आधी मुलांना खेळण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध होती. आता मुलांना घराबाहेर खेळण्यासाठी मैदाने नाहीत. नागरिक जास्तीतजास्त वेळ घरात व कामाच्या ठिकाणी राहतात. त्यानंतर त्यांना काही क्षणाकरिता मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी, फिरण्यासाठी, एकत्र होण्यासाठी, मन ताजे करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात राहायचे असते. त्यामुळे पार्क व उद्यानांचे संरक्षण अत्यंत आवश्यक झाले आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

अन्य महत्त्वाचे मुद्दे
१ – पार्क व उद्याने मानवी वस्तीची फुफ्फुसे असतात. ती सुदृढ आरोग्य प्रदान करतात. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवतात. शहराला सौंदर्य प्रदान करतात.
२ – नैसर्गिक साधने देशाची संपत्ती असतात. ही संपत्ती नवीन पिढीला कमी करून नाही तर, वाढवून दिली गेली पाहिजे. ही संपत्ती सर्वात मौल्यवान आहे.