नागपूर : लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वीज बिलात सूट देण्यासंदर्भातील घोषणा हवेत विरणार आहे. त्यामुळे महावितरणने आपली बाजू सावरण्यासाठी व थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी ग्राहकांना तीन समान हप्त्यात वीज बिल भरण्याचे लॉलीपॉप दिले आहे.
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दावा केला होता की, राज्य सरकार लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलात सूट देऊन जनतेला दिवाळीची भेट देईल. परंतु असे होताना दिसत नाही. कारण आज राऊत यांनी मुंबईत स्पष्ट केले की, वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. कंपनीवर कर्जाचा डोंगर वाढला आहे. केंद्र सरकारकडून मदत नाही, त्यामुळे राज्य सरकार वीज बिलात सुट देऊ शकणार नाही. राऊत यांच्या घोषणेमुळे ग्राहकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे. अशात महावितरणने मंगळवारपासून थकीत वीज बिल वसुलीची मोहीम सुरू केली आहे. कंपनीने कोरोना काळात लोकांची आर्थिक स्थिती बिघडल्याचा हवाला देत तीन समान हप्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. हप्त्याला मंजुरी मिळाल्याच्या ७ दिवसांच्या आत ३० टक्के बिलाची रक्कम डाऊन पेमेंटच्या रूपात भरायची आहे. ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा, बिल न भरल्यामुळे कट केला आहे, त्यांनासुद्धा सुविधा हप्त्याची मिळणार आहे.
विशेष डेस्क लावण्यात येईल, शिबिरांचे आयोजन
ग्राहकांना हप्त्याची सुविधा देण्यासाठी उपविभागीय कार्यालयात विशेष डेस्क लावण्यात येईल. तर काही भागात शिबिरसुद्धा लावण्यात येणार आहे. हप्त्याची सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचाही दावा केला आहे. अद्यापपर्यंत पोर्टलवर यासंदर्भात कुठलीच लिंक तयार नाही.