नागपूर : नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग, समग्र शिक्षा-समावेशित शिक्षण व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था रवीनगर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता.७) धंतोली येथील समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण थेरेपी सेंटर क्रीडा प्रबोधिनी सभागृहामध्ये स्वमग्न दिव्यांग मुलांच्या पालकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, डीआयईसीपीडीचे प्राचार्य रवींद्र रमतकर, डीआयईसीपीडीच्या माधुरी दलाल, मनपा समन्वयक अभिजीत राउत, प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. शिवलकर, डॉ. दिनेश सरोज, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मनिष ठाकरे, ॲक्यूप्रेशर थेरपिस्ट डॉ. सोफीया आझाद, रिहॅबिलीटेशन सायकॉलॉजिस्ट किरण बिनकर, ऑक्यूप्रेशर थेरपिस्ट डॉ. मिनल नागदीवे, रिहॅबिलीटेशन सायकॉलॉजिस्ट संजय काकडे, रितेश दिवे, अंजी शिखरे, करूणा वंजारी, अतुल नाकाडे, सारिका दहापुते, अमोल अंभोरे, मनिषा वंजारी उपस्थित होते.
विशेष गरजा असणा-या सर्व मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या शासन अधिनियमानुसार अंध, कर्णबधिर, मतिमंद, बहुविकलांग, स्वमग्न या दिव्यांग बालकांना समाजात समान संधी उपलब्ध करून देणे महत्वाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार स्वमग्न दिव्यांगाना चालना व प्रोत्साहन देणे, सामाजिक सुरक्षा व संपूर्ण अधिकार मिळावा व त्यांना कमी लेखण्यात येऊ नये, अपशब्द काढू नये, त्यांना शैक्षणिक सहाय्यभूत सेवा मिळण्याबाबत कोणतेही मतभिन्नता किंवा दिरंगाई होऊ नये, पालक, समाजामध्ये या बालकांबाबत असलेली असुरक्षिततेची भावना असू नये, दर्जेदार शिक्षणाबरोबरच त्यांच्यामध्ये असणा-या सुप्त गुणांचा विकास व्हावा, त्यांनाही इतरांप्रमाणे विविध खेळ खेळता यावे, गाणे गाता यावे, अभिनय करता यावा, याबाबत आवड निर्माण करणे. यासह स्पर्धेबाबतच्या नियमांचे आकलन होण्याच्या दृष्टीने क्रीडा, संगीत, नाट्य, अभिनय आदी बाबीमध्ये समान संधी उपलब्ध करुन दिल्यास सर्व मुले एकत्रित शिक्षण घेऊ शकतील, या उद्देशाने पालकांना प्रशिक्षण देउन त्यांना बालकांप्रति वागणूक व शिक्षणात बजावता येणा-या भूमिकेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
महापौर नंदा जिचकार, आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांच्या मार्गदर्शनात हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
अधिक वाचा : महिला दिनानिमित्त महापालिकेत विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार