महिला दिनानिमित्त महापालिकेत विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार

सर्व भूमिकांना स्त्रियांनी न्याय दिला : महापौर

नागपूर

नागपूर : महिला ही सर्वच भूमिका यथोचितपणे पार पाडत असते. आता व्यावसायिक क्षेत्रातही महिलांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. संस्कार घडविणारी आई, सांभाळ करणारी बहीण, नोकरी आणि उद्योग करून संसाराला हातभार लावणारी पत्नी अशा प्रत्येक भूमिकांना स्त्रियांनी न्याय दिला आहे, या शब्दात महापौर नंदा जिचकार यांनी महिलांचा गौरव केला.

जागतिक महिला दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्या समिती आणि समाजकल्याण विभागातर्फे सिव्हील लाईन्स स्थित मनपा मुख्यालयातील हिरवळीवर आयोजित कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील, मनपातील उपनेत्या वर्षा ठाकरे, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती विशाखा मोहोड, प्रतोद दिव्या धुरडे, प्रमुख मार्गदशिका पीसीपीएनडीटीच्या नोडल ऑफिसर डॉ. भावना सोनकुसळे, प्रमुख अतिथी म्हणून विविध भारतीवरील निवेदिका श्रद्धा भारद्वाज उपस्थित होत्या. धंतोली झोन सभापती विशाखा बांते, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, आशीनगर झोन सभापती वंदना चांदेकर, नगरसेविका पल्लवी शामकुळे, सोनाली कडू, जयश्री वाडीभस्मे, भारती बुंदे, ॲड. मिनाक्षी तेलगोटे, कांता रारोकर, मनिषा धावडे, वैशाली रोहणकर, अभिरुची राजगिरे, वैशाली नारनवरे, मंगला लांजेवार, विरंका भिवगडे, मनिषा कोठे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपअभियंता तथा राष्ट्रीय महानगरपालिका महिला कर्मचारी संघाच्या अध्यक्षा कल्पना मेश्राम उपस्थित होत्या.

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, महिला आज सर्वच क्षेत्रात आपले स्थान बळकट करीत आहे. राजकारण असो की प्रशासन असो, महिला कणखरपणे निर्णय घेतात. महिलांना संधी दिली तर त्या काय करू शकतात, याची अनेक उदाहरणे आपल्या देशात आहेत. सर्व श्रृंखला तोडून सर्वच क्षेत्रात आज स्त्री नाव कमावते आहे. अशा या स्त्री शक्तीचा गौरव करण्याचा हा दिवस असल्याचे त्या म्हणाल्या.

महिला व बालकल्याण समिती सभापती प्रगती पाटील यांनी महिला शक्तीची महती आपल्या भाषणातून विषद केली. स्त्री ही मुळातच सबला आहे. तिने आपली शक्ती ओळखण्याची गरज आहे. महिला व बालकल्याण समितीने वर्षभर महिलांच्या आर्थिक उत्थानासाठी कार्य केले. रिसायकलिंग सेंटर, पोटोबा ही त्यातील अधोरेखित करण्यासारखी कामे आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात बाळासाठी किल्ल्याची तटबंदी भेदून बुरुज उतरणाऱ्या हिरकणीचा संदर्भ देत महिलांनी मनात आणले तर काहीही शक्य आहे, असा मंत्र दिला.

प्रमुख अतिथी म्हणून बोलताना श्रद्धा भारद्वाज यांनी स्त्री पात्र असलेल्या पाच कथांच्या माध्यमातून स्त्रीने कसे असायला हवे, याबाबत विवेचन केले. महिलांनी आंतरिक शक्ती वाढवावी, असा मंत्र उपस्थित महिलांना दिला.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. भावना सोनकुसळे यांनी स्त्री आरोग्य सांभाळण्यासाठी आवश्यक असलेल्या टिप्स्‌ उपस्थित महिलांना दिल्या. महिलांनी शिळं खाण्याची सवय तोडावी. ताजं अन्न आणि सात्विक आहार घ्यावा. वरण, भात, भाजी, पोळी अशा आहारातून आवश्यक सर्व विटामिन्स मिळतात. आहारातून स्वत:ला फिट करा. नियमित व्यायाम करा. तणाव सोडून कार्य करा, असा महत्त्वाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

महिला कर्तृत्वाचा सन्मान

यावेळी नागपूर शहरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये दीप्ती कुशवाह, वर्षा शामकुळे, शबाना डोके, नितू मिश्रा, रंजना पंचबुद्धे, प्रिया सार्वे, ज्योती हुकरे, भारती इटनकर, लतिका माडे-लेकुरवाळे, लता शिरपूरकर, संगीता नरवाडे, रमा माहुरे, डॉ. सुनीता धोटे, सुषमा मानकर, गौरी शर्मा, रंजना पंचबुद्धे यांचा समावेश होता.

आरोग्य शिबिर आणि स्वच्छता मोहीम

महानगरपालिका समाजकल्याण विभागाच्या वतीने महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमस्थळी आरोग्य विभागाच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमानंतर परिसरात महिलांद्वारे स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली.

अधिक वाचा: मुख्यमंत्री व ना. गडकरी यांच्या हस्ते संविधान उद्देशिका शिलालेख कार्याचे भूमिपूजन

Comments

comments