नितीन गडकरींना सोलापूर विद्यापीठाच्या जाहीर कार्यक्रमात भोवळ

Nitin Jayram Gadkari
Nitin Jayram Gadkari

नागपूर : सोलापूर – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना सोलापूर विद्यापीठाच्या जाहीर कार्यक्रमात भोवळ आल्याची माहिती समोर आली आहे. गडकरी यांना जाहीर कार्यक्रमावेळी भोवळ आल्याची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात आज नितीन गडकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपावेळी राष्ट्रगीत सुरू असताना गडकरींना भोवळ आली आणि ते खुर्चीवर बसले. राष्ट्रगीत सुरु असल्याने त्यांनी पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न देखील केला. खुर्चीवर बसल्यानंतर त्यांना औषध देण्यात आलं व काहीवेळाने त्यांना बरं वाटलं. यावेळी मंचावर सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते. सध्या गडकरी यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं असून ते कार्यक्रम स्थळाहून रवाना झाले आहेत.

याआधी नगरमधील राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान भोवळ आल्याने गडकरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ८ डिसेंबर २०१८ रोजी राहुरीत त्यांना भोवळ आली होती. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांना सावरले होते. त्यानंतर शिर्डीत २७ एप्रिल २०१९ रोजी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेत भाषणादरम्यान ते तीन वेळा सरबत प्यायले. मात्र तब्येत जास्त बिघडत असल्याचा अंदाज आल्यानंतर त्यांनी भाषण आटोपलं. त्यानंतर ते आपल्या जागेवर बसायला जाणार तेव्हा अचानक त्यांना भोवळ आली होती.

अधिक वाचा : उमरेड तालुक्यातील एका फार्म हाऊसमध्ये पावसात अडकलेल्या ( जलवेढ्यातून ) २२ जणांची सुटका