नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंग यांनी दाखल केलेली क्युरेटिव्ह अर्थात फेरविचार याचिका कोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. निर्भयावर सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही नराधमांच्या फाशीचा ‘मुहूर्त’ ठरला आहे. 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता तिहार तुरुंगात या चौघांना फासावर लटकावले जाईल, असा आदेश पतियाळा हाऊस कोर्टाने मंगळवारी दिले. दोषी मुकेश, विनय, पवन आणि अक्षयविरुद्ध डेथ वॉरंट बजावले आहेत.
पहिली क्युरेटिव्ह अर्थात फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. अॅड. ए.पी.सिंह यांच्यामार्फत नराधम विनय शर्मा याने क्युरेटिव्ह याचिका दाखल केली होती. मुकेश व विनयचे वकील ए. पी. सिंह यांनी आपण सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल केल्याचं माध्यामांना सांगितले होते.
दुसरीकडे, तिहार तुरुंग प्रशासनाने उत्तर प्रदेश सरकारला पत्र पाठवून मेरठहून जल्लाद मागवला आहे. सन 2012 मध्ये 16 डिसेंबरच्या रात्री धावत्या बसमध्ये सहा जणांनी पॅरामेडिकलच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला होता. 29 डिसेंबरला तिचा मृत्यू झाला. सहापैकी एक अल्पवयीन असल्याने तो तीन वर्षांनंतर सुटला.
एक दोषी रामसिंह याने तुरुंगात आत्महत्या केली होती. आरोपी अक्षय याने 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये बलात्कार करून तिला मारहाणही केली होती. पवन यानेही निर्भयावर बलात्कार करून तिच्या मित्राला बेदम मारहाण केली होती. मुकेश ही बस चालवत होता. त्यानेही निर्भयासोबत कुकृत्य केले होते. विनय याने निर्भयाचा छळ, बलात्कार, नंतर तिला बसबाहेर फेकले होते.