बुलडाणा : ग्रामपंचायत निवडणूकीचा एक अध्याय पूर्ण झाला आहे. अर्ज दाखल नंतर महत्वपूर्ण भाग अर्ज मागे घेतल्यानंतर त्याच दिवशी चिन्हांचे वाटप होणार आहे. यंदा बाजारातील विविध वस्तू व खाद्य पदार्थांची रेलचेल निवडणूक चिन्हांमध्ये आहे. मटरच्या शेंगा, हिरवी मिरची, भेंडी, ढोबळी मिरची अशी 190 चिन्हे ठेवली आहे. पारंपारिक चिन्हांमध्ये यंदा काही नव्याने भर देखील घातली आहे. सोमवारी (आज) कोण कोण उमेदवार काय काय चिन्हे घेऊन गावात परततो हे पाहणे मनोरंजक आहे.
ग्रामपंचायत निवडणुका स्थानीय पातळीवरील असल्याने त्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या अधिकृत चिन्हांवर लढविल्या जात नाही. यामुळे अश्या निवडणूकसाठी निवडणूक आयोगाने मुक्त चिन्हे उपलब्ध करून दिली आहे. यंदा पन्नास, साठ नव्हे तब्बल 190 मुक्त चिन्हाचे भरमसाठ पर्याय उमेदवारांना राहणार आहे. या मुक्त चिन्हांतून आवडीचे निवडून उमेदवारांनी नामांकन अर्जात चिन्हांचे पसंतिक्रम द्यावे असे प्रावधान आहे. यंदाची मुक्त चिन्हांची भलीमोठी यादी व त्यातील चिन्हे पहिली तर कोणीही चक्रावून जाईल!
त्यात अगदी हेलीकॉप्टर, लॅपटॉप, संगणक पासून ते पांगुळ गाडा(वॉकर) कंगवा, कोबी मटरच्या शेंगा, धान्य पाखडायचे सूप अशी अफाट रेंज आहे. आधुनिक काळाशी सुसंगत अश्या संगणक, माउस, हेडफोन, चार्जर, पेनड्राईव्ह, सीसीटीव्ही, हेल्मेट, टॉय, कोट, कॅलकुलेटर अशी चिन्हे उमेदवारांना निवडता येतील, खाद्यप्रेमींसाठी बिस्कीट, पाव, केक, भुईमूग, मका, ऊस, फणस, अक्रोड, टरबूज, आईस्क्रीम, नारळच काय ढोबळी मिरची, वाटाणे, द्राक्ष, हिरवी मिरची, भेंडी, ही चिन्हे पण मिळू शकतात. क्रीडाप्रेमींसाठी ब्याट, फलंदाज, बॅडमिंटनचे शटल, रॅकेट, हॉकी, कॅरमबोर्ड, बुद्धिबळ, ल्युडो, फुटबॉलसह व्यायामाचे डंबेल्स सुद्धा उपलब्ध आहेत.
ही यादी यावरच थांबत नाही. चिन्हामध्ये टोपली, सूप, पोळपाट लाटणे, कंगवा, ब्रश, टूथपेस्ट, पेट्रोल पंप, विटा, उशी, टायर, इंजेक्शन, स्टेथोस्कोप, ड्रिल मशीन, चावी एवढेच काय कानाचे दागिने, जेवणाची थाळी, डिश अँटिना, टीव्ही रिमोट, ही चिन्हे पण आहे. याशिवाय संगीतप्रेमींसाठी हार्मोनियम, बासरी, नगारा, व्हायोलिन, व वाहनप्रेमींसाठी ऑटो, बस, रोड रोलर, खटारा, टॅक्सी, होडी, स्कुटर, हेलिकॉप्टर मद्यपे्रमींसाठी काचेचा ग्लास आदी मिळून तब्बल 190 बहुरंगी बहुढंगी चिन्हांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. आता ठरवा मग काय पाहिजे ते?