सॅनिटायझरची बाटली असलेला कचरा जाळताना स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यु

सॅनिटायझरची बाटली असलेला कचरा जाळताना स्फोट होऊन एका महिलेचा मृत्यु

कोल्हापूर : कोरोनाव्हायरसने धडक दिल्यापासून सॅनिटायझरची बातमी आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनली आहे. मात्र सॅनिटायझर संपल्यानंतर त्या बाटलीची विल्हेवाट लावताना थोडी काळजी घ्या. कारण सॅनिटायझरची बाटली असलेला कचरा जाळताना स्फोट होऊन एका महिलेला आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोल्हापुरातील बोरवडे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. सुनीता काशिद असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे.

सुनीता काशिद आज (4 जानेवारी) सकाळी घरातील केरकचरा गोळा करुन तो घरासमोर पेटवत होत्या. या कचऱ्यात सॅनिटायझरची बाटलीही होती. त्यावेळी कचऱ्यातील सॅनिटायझरच्या बाटलीचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की सुनीता काशिद त्यात 80 टक्के भाजल्या होत्या. आग विझवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु त्यात अपयश आलं. रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान कोरोना महामारीचं संकट आल्यापासून सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. प्रत्येकाच्या घरात सॅनिटायझर दिसू लागलं. परंतु सॅनिटायझर हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ आहे. त्यामुळे सॅनिटायझर लावून गॅस किंवा स्टोव्हच्या जवळ जाऊ नये, असं वारंवार सांगितलं जातं. त्यामुळे कोल्हापुरातील या धक्कादायक प्रकारानंतर सॅनिटायझर वापरताना योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.