नागपूर : एमबीबीएस आणि बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या (एनटीए) वतीने गेल्या महिन्यात घेण्यात आलेल्या नीट (नॅशनल इलिजीबिलिटी कम एन्टरन्स टेस्ट) या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, राजस्थानचा नलिन खंडेलवाल देशात प्रथम आला आहे. तर मुलींमध्ये तेलंगणची माधुरी रेड्डी पहिली आली आहे. नलिन खंडेलवाल याला ७२० पैकी ७०१ गुण मिळाले आहेत. तर महाराष्ट्राच्या सार्थक भटने ७२० पैकी ६९५ गुण मिळवत राज्यात पहिला, तर देशात सहावा येण्याचा मान मिळवला आहे.
नीट परीक्षेत दिल्लीचा भाविक बंसल दुसरा, उत्तर प्रदेशचा अक्षत कौशिक तिसरा आला आहे. मुलींमध्ये माधुरी रेड्डी हिने पहिला क्रमांक पटकावला असून, देशात तिचा सातवा क्रमांक आहे. माधुरी रेड्डी हिला ७२० पैकी ६९५ गुण मिळाले. पहिल्या १०० जणांमध्ये २० मुलींचा समावेश आहे. दिव्यांग श्रेणीमध्ये उत्तर प्रदेशची सभ्यता सिंग कुशवा हिला प्रथम क्रमांक मिळाला आहे. तिला ६१० गुण मिळाले आहेत.
महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आलेला सार्थक भट हा नाशिकचा रहिवासी असून, दुसऱ्या क्रमांकावर येण्याचा मान सांगलीच्या साईराज मानेला मिळाला आहे. साईराज देशात ३४ व्या क्रमांकावर आहे. तर देशात ५० व्या क्रमांकावर असलेला जुन्नरचा सिद्धांत दाते राज्यात तिसरा आला आहे.
नीट-२०१९ परीक्षेसाठी १५,१९,३७५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ७,९७,०४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ५ मे रोजी नीट परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना आपले निकाल ntaneet.nic.in किंवा nta.ac.in वर पाहता येणार आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर आता गुणांच्या आधारावर कौन्सिलिंग आणि अंडरग्रेजुएट मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन होणार आहे.
अधिक वाचा : Super 30 Trailer : Hrithik Roshan As Anand Kumar Is A Superhero Without A Cape