नागपूर : धंतोलीतील सिल्व्हर पॅलेस येथील नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील ३८ कोटींच्या घोटाळाप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी तत्कालीन दोन व्यवस्थापकांना अटक केली आहे. राजेश बांते व राजेश बोगुल, अशी अटकेतील व्यवस्थापकांची नावे आहेत. दोघांची २४ जूनपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.
२०१० ते २०१५ या कालावधीत बँकेचे तत्कालीन संचालक मंडळ, पदाधिकाऱ्यांनी बँकेच्या ठराविक कर्जदारांना विनाकारण कर्ज दिले. तसेच काही कर्जदारांकडे थकबाकी असतानाही त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊन तारण ठेवलेल्या मालमत्तेचे दस्तऐवज परत करण्यात आले होते. संचालक व पदाधिकाऱ्यांनी बँकेतून पैशांची उचल केली. तसेच रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्यानंतरही पदधिकारऱ्यांनी बँकेचे आर्थिक व्यवहार सुरूच ठेवले होते.
संचालक मंडळ, पदाधिकारी व काही कर्जदारांनी या कालावधीत ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयांचा घोटाळा केला. सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष परीक्षक (भंडारा) श्रीकांत सुपे यांनी केलेल्या अंकेक्षणानंतर हा घोटाळा उघडकीस आला होता. सुपे यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी मे महिन्यात बँकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ, पदाधिकारी व काही कर्जदारांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
काँग्रेसचे नेते माजी आ. अशोक धवड या कालावधीत बँकेचे अध्यक्ष होते. पोलिसांनी बांते व बोगुल या दोघांना मंगळवारी अटक केली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांची २४ जूनपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
अधिक वाचा : Nagpur : Mumbai Police Arrests Nagpur Man for Possession of Whale Vomit Worth Rs 1.7 Crore