नागपूर : स्वस्त घरांसाठी अखेरची संधी

NIT

नागपूर : स्वस्त घरांसाठी ७ हजारांपेक्षा अधिक नागरिकांचे अर्ज नागपूर सुधार प्रन्यासकडे प्राप्त झाले. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ४ हजार ३४५ घरे बांधण्यात येत असून, अधिकाधिक नागरिकांना या योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी २९ जूनपर्यंत ही मुदत वाढविण्यात आली असल्याचे नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती शीतल उगले यांनी सांगितले.

प्रत्येकाला घर मिळावे, यासाठी शासनाकडून पंतप्रधान आवास योजनेंतर्गत स्वस्त घर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. एका घरकुलाचे क्षेत्र सुमारे ३२० चौरस फूट आहे. नागपुरात मौजा वाठोडा, तरोडी (खुर्द) मौजा वांजरी, वाठोडा या भागात स्वस्त घर बांधण्यात येत आहेत. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ४ हजार ३४५ घरे बांधण्यात येत आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत ही घरे पूर्ण बांधण्याचे उद्दिष्ट नासुप्रकडून ठेवण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरुवातीला ७ एप्रिल ही मुदत देण्यात आली होती. सुरुवातीला कमी अर्ज प्राप्त झाल्याने नागपूर सुधार प्रन्यासने ही मुदत ७ मे पर्यंत वाढविली. आता ७ मे ही मुदत संपायला अवघे दोन दिवस शिल्लक असताना नासुप्रने पुन्हा ७ जूनपर्यंत ही मुदत वाढविली. आता अंतिम मुदत २९ जून असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करता येणार असल्याचे उगले यांनी सांगितले.

ऑनलाइन करा अर्ज

प्रधानमंत्री आवासयोजनेंतर्गत आर्थिक दृष्टया दुर्बल घटकातील लोकांना स्वतःच्या हक्काची घरे मिळावी यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे शहरातील विविध भागात घरकुल निर्मितीचे प्रकल्प राबविण्यात येत आहे. नामप्रविप्रा’तर्फे लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी www.pmay.nitnagpur.org संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागपूर महानगर पालिकेमध्ये प्रधानमंत्री आवासयोजनेंतर्गत नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना सुद्धा पुन्हा www.pmay.nitnagpur.org या संकेतस्थळ अर्ज करण्याच्या सूचना नासुप्रकडून करण्यात आल्या आहेत. नासुप्रच्या विभागीय कार्यालयांतही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे नासुप्रकडून सांगण्यात आले.

आवश्यक कागदपत्र

अर्जदाराचा स्वतःचा पासपोर्ट फोटो, आधार कार्ड आणि स्वतःचे बँक खाते असलेल्या बँकेचा कॅन्सल चेक अनिवार्य आहे. १०० रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर स्वतःचे पक्के घर नसल्याचे शपथपत्र, १० हजार रुपये अनामत रक्कम (बुकिंग चार्जेस-ईएमडी) आणि आवदेन शुल्क (जीएसटी’सह) ५६० रुपये लाभार्थ्यांना द्यावे लागणार आहे.

अडीच लाखांची सूट

तरोडी या भागात ९ लाख १५ हजार रुपयांत घर उपलब्ध होणार आहे. तर वांजरी या भागात याच घरांची किंमत ११ लाखांच्या घरात आहे. वाठोडा येथील घरांची किंमत ११ लाख ४० हजारांच्या घरात आहे. या घरांसाठी केंद्र सरकारकडून दीड लाख आणि राज्याकडून १ लाख रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक घरकुलामागे अडीच लाख रुपये कमी होणार आहे. मात्र उर्वरित पैसा नागरिकांनाच भरावा लागणार असल्याचे नासुप्रकडून सांगण्यात आले.

लॉटरी जुलैमध्ये

स्वस्त घरांसाठी नासुप्रकडे प्राप्त अर्जदारांना घरकुल मिळवून देण्यासाठी २६ जून रोजी लॉटरी काढण्यात येणार होती. मात्र आता अर्ज करण्याची मुदत वाढविली असल्याने लॉटरी जुलै महिन्यात काढण्यात येणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ही लॉटरी काढण्यात येणार असल्याचे उगले यांनी सांगितले.

अधिक वाचा : नागपूर : नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा, दोघांना अटक