नागपूर : तलावात बुडून दोन एलआयसी एजंट्सचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी हिंगण्यातील कुप्रसिद्ध तलाव मोहगाव झिल्पी येथे उघडकीस आली.
देबोजित कल्याणजी बॅनर्जी (वय ३८, रा. खंतेनगर, महेंद्रनगर) व कमलेश रमेश शहाकार (वय ३६, रा. नरसाळा), अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही एलआयसी एजंट होते. विम्याच्या कामानिमित्त शुक्रवारी दोघेही हिंगणा येथे गेले. काम आटोपून ते मोहगाव झिल्पी येथे गेले. याचदरम्यान एकजण कपडे काढून तलावात आंघोळीला गेला. तो बुडत होता. मदतीसाठी त्याने आरडाओरड केली. त्याचा मित्र मदतीसाठी तलावात गेला. दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, रात्र झाल्यानंतरही हे दोघे घरी परतले नाहीत. दोघेही बेपत्ता झाल्याने नातेवाइकांनी शोध सुरू केला. दोघांचेही मोबाइल बंद होते. दोघांच्याही नातेवाइकांनी बेपत्ता असल्याची तक्रार पाचपावली व हुडकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये दिली.
शनिवारी दुपारी एका नागरिकाला तलावात मृतदेह तरंगताना दिसले. त्याने हिंगणा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच हिंगणा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आर. तिवारी यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. मोटरसायकल व दस्तऐवजांवरून दोघांची ओळख पटली. पोलिसांनी नातेवाइकांना माहिती देत मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केले. दोघांच्या मृत्यूने बॅनर्जी व शाहकार कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
अधिक वाचा : “War” Teaser Release : Hrithik Roshan Vs Tiger Shroff