नागपूर : ग्राहकानं उपवास सोडण्यासाठी मागवलेल्या पनीर बटर ऐवजी बटर चिकन पाठवणाऱ्या झोमॅटो आणि एका हॉटेलला पुण्यातील अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचानं ५५ हजार रुपये दंड ठोठावला आहे. ही दंडाची रक्कम ४५ दिवसांच्या आत ग्राहकाला देण्याचे आदेश मंचानं दिले आहेत. त्यात विलंब केला तर या रकमेवर १० टक्के व्याज आकारला जाईल, असंही आदेशात म्हटलं आहे.
षण्मुख देशमुख हे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठामध्ये वकिली करतात. ३१ मे २०१८ रोजी ते कामानिमित्त पुण्यात आले होते. तेथे त्यांनी झोमॅटो अॅपवरून पनीर बटर मसाला मागवलं होतं. गुरुवारी त्यांचा उपवास होता. संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी त्यांनी जेवण मागवलं होतं. देशमुख ज्या ठिकाणी थांबले होते, तेथे जेवणाचं पार्सल आलं. जेवण वाढल्यानंतर ते पनीर बटर मसाला नसून बटर चिकन असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. देशमुख यांनी पार्सल देणाऱ्या झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला कॉल केला आणि माहिती दिली.
मात्र, यात माझा काही दोष नसून, जे पार्सल दिलं जातं ते न उघडता संबंधित ग्राहकापर्यंत पोहोचवलं जातं, असं उत्तर त्यानं दिलं. त्यानंतर देशमुख यांनी प्रीत पंजाबी स्वाद हॉटेलच्या मॅनेजरशी संपर्क साधला. त्यावेळी दुसरं जेवण पाठवत असल्याचं त्यांनी सांगितलं. दुसऱ्या डिलिव्हरी बॉयनं जेवणाचं पार्सल आणलं. पावतीवर पनीर बटर मसाला लिहिलेलं होतं, पण देशमुख यांनी पार्सल उघडल्यानंतर त्यात पुन्हा बटर चिकन असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
देशमुख यांनी वकील संदेश गुंडगे यांच्याद्वारे झोमॅटो आणि संबंधित हॉटेलला कायदेशीर नोटीस पाठवली. धार्मिक भावना दुखावल्याचं सांगत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. त्यावर दोघांकडूनही उत्तर मिळालं नाही. अखेर देशमुख यांनी ग्राहक तक्रार निवारण मंचात धाव घेतली आणि नुकसान भरपाईपोटी ५ लाख आणि मानसिक त्रासाबद्दल १ लाख रुपये देण्याची मागणी केली. या तक्रारीवर कारवाई करत ग्राहक मंचानं झोमॅटो आणि संबंधित हॉटेलला ५५ हजार रुपये दंड ठोठावला.
४५ दिवसांत पैसे देण्याचे आदेश दिले. त्यात विलंब केल्यास त्यावर १० टक्के व्याज देण्यात यावे, असं नमूद केलं. आम्हाला कोणत्याही प्रकारचे आदेश मिळाले नाहीत, असं झोमॅटोचे व्यवस्थापक (प्रादेशिक) विपुल सिन्हा यांनी सांगितलं. तर झोमॅटोच्या प्रवक्त्यांनी फोन उचलला नाही.
अधिक वाचा : नागपूर : पेट्रोल-डिझेल दर भडकले ; महागाईचा मार