नागपूर : नागपूर येथिल गोरेवाडा बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातील वाघीण ‘ली’ने बछड्याला जन्म दिला. थोड्या वेळाने त्याला पुन्हा उचलले. त्याचवेळी बछड्याच्या डोक्याला मार लागला आणि तो मृत पावल्याने वन्यप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
नागपुरातील गोरेवाडा बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातील ‘ली’ वाघिणीने बछड्याला जन्म दिला. पिल्लाला उचलताना वाघिणीचा दात लागून पिल्लाचा दुर्देवी मृत्यू झाला. बुधवारी दुपारी ‘ली’ला प्रसूती वेदना सुरू झाल्या. चार वाजता तिने बछड्याला जन्म दिला. त्याला चाटल्यानंतर तिने बछड्याची शेपूट पकडून त्याला गवतात झाकले. थोड्या वेळाने त्याला पुन्हा उचलले आणि त्याच वेळी बछड्याच्या डोक्याला मार लागला आणि तो मृत पावला. ‘ली’ पुन्हा दुसऱ्या बछड्याला जन्म देईल म्हणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाट पाहिली, मात्र तसे काही झाले नाही. या घटनेमुळे वन्यप्रेमींकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
यावेळी प्राणीसंग्रहालयाचे पशुवैद्यकांसह महाराष्ट्र मत्स्य आणि पशू विज्ञान विद्यापिठातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक प्राणिसंग्रहालयात उपस्थित होते. रात्री उशिरा तिच्या प्रसववेदना थांबल्यानंतर तिच्या गर्भात आणखी पिल्ले आहेत किंवा असल्यास त्याबाबत पुढील उपचार या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे. ‘ली’ आणि ‘राजकुमार’ या गोरेवाडा प्राणी उद्यानातील वाघाच्या जोडीला पिल्ले होण्यासाठी गेल्या २ वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. ११ वर्षांच्या ली वाघिणीचे वय जास्त असल्याने सदर प्रयत्नांना अपेक्षित यश मिळण्यास अडचणी होत्या. वाघाचे नैसर्गिक आयुष्य १२ ते १४ वर्षे असते. गेले महिनाभर आधीपासून ली वाघिणीला राजकुमार वाघापासून स्वतंत्र ठेवून तिच्या गर्भारपणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तिच्या नैसर्गिक पद्धतीने प्रसव होण्यासाठी तिच्या रात्र निवाऱ्यात विशेष बाळंतगुफा तयार करण्यात आलेली होती. या गुफेत तापमान आणि प्रकाश नियंत्रण व्यवस्थेव्यतिरिक्त रबरी मॅट, गवताच्या गाद्या याशिवाय कुलरची सोय करण्यात आली होती. वाघिणीच्या नैसर्गिक वर्तवणुकीत बदल न होता लक्ष देण्यासाठी विशेष CCTV कॅमेरे बसविण्यात आले होते.