Home Blog Page 109

९३ वर्षांच्या व्यक्तीने कोरोनाला यशस्वीरित्या मात दिले

कोरोना

नागपूर : महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगरमधून शुक्रवारी ९३ वर्षाचे पद्माकर चवडे कोरोनावर मात करून सुखरूप घरी परतले. मागील काही दिवसापासून ते इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचार घेत होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव नागपुरात नियंत्रणात येत आहे तसेच मृत्यू संख्यासुध्दा कमी झाली आहे. कोरोनावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सहज मात करता येते, असे पद्माकर चवडे यांनी दाखवून दिले आहे. पद्माकर चवडे यांना कोविड – १९ ची लक्षणे दिसल्यानंतर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

मेयो रुग्णालयामध्ये ७ दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली आणि त्यांना मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर येथे भरती करण्यात आले. आई.जी.आर मध्ये त्यांना डॉ. अजय हरदास यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. डॉ. हरदास यांनी सांगितले की, त्यांना आॅक्सिजन सपोर्ट देण्यात आला होता. नंतर त्यांची प्रकृती एकदम ठणठणीत झाली आणि त्यांना शुक्रवारी सुटी देण्यात आली.

मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांसाठी १०० हून अधिक बेडसची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे कमी लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना भरती केला जात आहे. सध्या ४१ रुग्णांना उपचार घेत आहे. अतिरिक्त आयुक्त श्री राम जोशी यांनी आई.जी.आर चे डॉक्टर व स्टाफचे अभिनंदन केले आहे.

भंडारा-गोंदियातही तांदळाचे काळाबाजारी

तांदूळ

नागपूर : सरकारी धान्याची काळाबाजारी करणारा कुख्यात चेतन अर्जुन मदान आणि त्याच्या साथीदारांचे तार भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील अनेक राईस मिल मालकांशी जुळले आहेत. त्यांच्या माध्यमातून ही मंडळी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात सरकारी तांदळाची गैरमार्गाने मोठी खेप पोहचवत असतात, अशीही माहिती पुढे आली आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने चेतन मदान याच्या फ्री ऑक्ट्रॉय झोनमधील गोदामावर गुरुवारी छापा घालून ४० टन तांदूळ जप्त केला. तेथून चार वाहनांसह सात आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने हे प्रकरण लकडगंज पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर करून एक दिवसाचा पीसीआर मिळवला.

गुरुवारी हा गोरखधंदा पोलिसांनी उघड केला. लॉकडाऊनच्या कालावधीत गोरगरिबांना सरकारकडून अल्प किमतीत आणि मोफत दिला जाणारा तांदूळ मदान, गुनीयानी, जुनेजासारखे भ्रष्ट दलालाच्या माध्यमातून सात ते आठ रुपये किलोने विकत घेतात. त्या तांदळाला पॉलिश केल्यानंतर नामांकित ब्रॅण्डच्या पोत्यात हा तांदूळ भरला जातो. त्यानंतर हा तांदूळ भंडारा, गोंदिया व तेथून छत्तीसगड, मध्यप्रदेशात पाठविला जातो.

अशा प्रकारे सरकारने गरिबांना वाटलेल्या तांदळाची पद्धतशीर खुल्या बाजारात विक्री करून लाखो रुपये कमविले जाते. हे रॅकेट नागपुरात अनेक महिन्यांपासून सक्रिय असून अन्नधान्य वितरण प्रणालीतील काही भ्रष्ट मंडळींची त्यांना साथ आहे. त्यामुळे हे रॅकेट दरदिवशी लाखोंचे वारेन्यारे करते. पहिल्यांदाच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अशा प्रकारची कारवाई केली. आरोपी चेतन अर्जुन मदान, श्रीकांत रजनीकांत कक्कड, उमेश बितेलाल शाहू, मोहम्मद रियाज मोहम्मद कदिर, अक्रम खान अहमद खान, प्रदीप प्रभाकर काजवे आणि विक्की गणेश जगदाळे अशा सात जणांना अटक केली. या कारवाईमुळे संबंधितात खळबळ निर्माण झाली. मात्र, अनेक बडे मासे निसटून जाण्यात यशस्वी ठरल्यामुळे ही खळबळ तात्पुरतीच ठरली आहे.

… तर हाती लागेल आंतरराज्यीय रॅकेट
अशाप्रकारे तांदळाची तस्करी करणारे आणि त्यांना पाठबळ देणारे काही अधिकारी अजून मोकाट आहेत. त्यांचा हा गोरखधंदा लगेच पुन्हा सुरू होणार आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची कसून चौकशी केल्यास कोट्यवधींच्या धान्याची काळाबाजारी करणारे आंतरराज्यीय रॅकेट पोलिसांच्या हाती लागू शकते.

२०१४ ते २०१९ या ६ वर्षांच्या कालावधीत ‘पायरसी’चा हेतू ठेवल्या प्रकरणी केवळ १४ गुन्हे

पायरसी

नागपूर : मागील काही काळापासून तंत्रज्ञानासोबतच ‘पायरसी’चे प्रमाणदेखील वाढत असल्याचे दिसून येत आहेत. मात्र तक्रारी करण्यासंदर्भात राज्यातील प्रशासकीय यंत्रणा व नागरिक या दोहोंमध्येदेखील उदासीनता दिसून येते. २०१४ ते २०१९ या ६ वर्षांच्या कालावधीत ‘पायरसी’चा हेतू ठेवल्या प्रकरणी केवळ १४ गुन्हे दाखल करण्यात आले.
प्रदर्शनाअगोदरच ‘लीक’ होणारे चित्रपट, सहजपणे ‘ऑनलाईन’ उपलब्ध होणारी ‘पायरेटेड कॉपी’ इत्यादी प्रकारच्या ‘सायबर’ गुन्ह्यांची चित्रपट उद्योगाने धास्ती घेतली आहे. परंतु ‘पायरसी’ थांबविण्यासाठी पावले उचलण्यासंदर्भात अद्यापही फारशी पावले उचलण्यात आलेली नाहीत. शेकडो संकेतस्थळे आणि शहरांपासून ते ग्रामीण भागांत हा उद्योग खुलेआमपणे सुरू असल्याचे दिसून येते. मात्र कारवाईचे प्रमाण नाममात्र असल्यामुळे कुणावरही वचक राहिलेला नाही. ‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार २०१९ साली राज्यभरात ‘सायबर क्राईम’अंतर्गत एकूण ४ हजार ९६७ हुन्हे दाखल झाले. यातील अवघा एक गुन्हा हा ‘पायरसी’च्या हेतूने झाला. २०१६ साली हीच संख्या तीन तर २०१८ मध्ये सर्वाधिक सहा इतकी होती.
राज्यात अगदी खेडापाड्यांपर्यंत ‘पायरेटेड’ चित्रपट, ‘सॉफ्टवेअर्स’, ‘गेम्स’ अगदी सहजपणे उपलब्ध होतात. मात्र तरीदेखील दाखल गुन्ह्यांचे इतके कमी प्रमाण विविध प्रश्न उपस्थित करणारे आहे.

तक्रारींसाठी पुढाकारच नाही
मागील काही वर्षापासून ‘पायरसी’मुळे चित्रपट उद्योग तसेच ‘सॉफ्टवेअर्स कंपन्या’ हैराण आहेत. अनेकदा सर्वसामान्यांकडूनदेखील कळत-नकळतपणे ‘पायरसी’ केली जाते. मात्र ‘पायरसी’च्या प्रकरणांत जोपर्यंत तक्रार येत नाही, तोपर्यंत पोलिसांकडून कारवाई करण्यात येत नाही. तक्रारकर्त्यांचे प्रमाण नगण्य असते. त्यामुळे ‘पायरसी’अंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी असते. याचा अर्थ ‘पायरसी’चे प्रमाण कमी असते असे नाही, असे मत ‘सायबर’ तज्ज्ञांनी व्यक्त केले.

‘कॉपीराईट’ भंग प्रकरणी तीन गुन्हे
इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर ‘कॉपीराईट अ‍ॅक्ट १९५७’चादेखील भंग होताना दिसतो. विविध संकेतस्थळांवर ‘कॉपीराईट’च्या कायद्याअंतर्गत संरक्षित असलेले साहित्य अगदी सहजपणे ‘पीडीएफ’मध्ये उपलब्ध होते. परंतु तक्रारीचे प्रमाण कमी आहे. २०१९ मध्ये संपूर्ण राज्यात ‘कॉपीराईट’ कायदा भंग केल्याप्रकरणी तीन गुन्हे नोंदविण्यात आले. यातील एक गुन्हा ‘जीआरपी’ने नोंदविला होता.

नागपुरात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

नोकरी

नागपूर : नोकरी लावून देण्याच्या नावाखाली एका भामट्याने शिक्षकाचे सव्वाआठ लाख रुपये हडपले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. चंद्रशेखर हरिभाऊ भेदे (वय ४९) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करताच तो फरार झाला.

आरोपी भेदे मानेवाड्यातील म. फुले नगरात राहतो. तो एका खासगी कंपनीत काम करतो. जुना सुभेदार ले-आऊटमध्ये राहणारे भरत अंकुश नरुले यांच्यासोबत भेदेची ओळख आहे. नरुले शिक्षक असून शिक्षित पत्नीला नोकरी मिळावी यासाठी ते प्रयत्नशिल आहे. आरोपी भेदेने नरुलेंना आपली इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये वरिष्ठांसोबत चांगली ओळख असल्याची थाप मारली. नरुले यांच्या पत्नीला नोकरी लावून देतो, अशी बतावणी केली. आणखी कुणी असेल तर सांगा, असेही तो म्हणाला. त्याच्यावर विश्वास ठेवून नरुले यांनी आरोपीला ७ सप्टेंबर २०१८ ते २६ जानेवारी २०१९ या कालावधीत ८ लाख, २७ हजार रुपये दिले. त्यानंतर आरोपीने नरुले यांना नियुक्तिपत्र तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र दिले. ते घेऊन नरुले इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्यांकडे गेले असता भेदेची बनवाबनवी उघड झाली. हे नियुक्तिपत्र बनावट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नरुले यांनी आरोपीला जाब विचारला आणि आपली रक्कम परत मागितली. तेव्हापासून तो काही ना काही कारण सांगून नरुले यांना टाळू लागला. तो रक्कम परत करणार नाही आणि त्याने फसवणूक केल्याची खात्री झाल्यामुळे नरुले यांनी हुडकेश्वर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याची कुणकुण लागताच भेदे फरार झाला.

किडनीच्या उपचाराचा बहाणा

आरोपी भेदे याने नोकरीच्या आमिषाने नरुले यांची फसवणूक केल्याची चर्चा सुरू असतानाच त्याने किडनी खराब झाली व उपचार करायचे आहे, असे सांगून प्रवीण डोमले नामक व्यक्तीकडून ५ लाख ५० हजार घेतल्याचेही उजेडात आले. त्याने अशाप्रकारे आणखी काही जणांची फसवणूक केली असावी, असा संशय असून हुडकेश्वर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

नागपुरात यादवनगर च्या पेट्रोलपंप तलवारीच्या धाकावर लुटला

पेट्रोलपंप

नागपूर : तलवारीच्या धाकावर तीन लुटारूंनी पेट्रोलपंप लुटला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी रात्री १०.३० च्या सुमारास ही घटना घडली.

यादवनगरात हा पेट्रोलपंप आहे. दिवसभराच्या पेट्रोल विक्रीची रक्कम मोजल्यानंतर स्रेहा अजय साखरे ही महिला कर्मचारी पंपाच्या कॅबिनमध्ये रक्कम जमा करायला जात असताना अचानक तीन लुटारू पेट्रोल पंपावर आले. त्यातील एकाने साखरे यांना तलवार लावून त्यांच्याजवळचे १६ हजार, ४२० रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर शिवीगाळ करीत आरोपी त्यांच्या होंडा अ‍ॅक्टिव्हावर बसून सुसाट वेगाने पळून गेले. अचानक झालेल्या या घटनेमुळे पंपावरील कर्मचारी गोंधळले. त्यांनी आरडाओरड केली. नंतर यशोधरानगर पोलिसांना कळविले. पोलिसांनी पंपावरच्या सीसीटीव्हीमधून आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न चालविले आहेत. दरम्यान, स्रेहा साखरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.

बाबा लंगड्याची टोळी जेरबंद
यशोधरानगर पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने शोधमोहीम राबविली.
मोहम्मद जिशान उर्फ बाबा लंगड्या मोहम्मद खलील शेख (वय २१), आरिफ अली लियाकत अली (वय २७)आणि सूर्या बाबूराव जांभूळकर (वय १९) या तिघांनी हा गुन्हा केल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्यांना वनदेवीनगरातील रेल्वेपुलाखाली पकडले.

दारूत उडवली रक्कम
आरोपींनी पेट्रोल पंप लुटल्यानंतर ओली पार्टी केली. दारू आणि जेवणात आठ हजार रुपये उडवले. पोलिसांनी त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी ८,०४० रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली. पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमाकांत दुर्गे, सहायक निरीक्षक श्रीनिवास दराडे, प्रकाश काळे, विनोद सोलव, नायक मधुकर निखाडे, विजय लांजेवार, आफताब शेख, रत्नाकर सोनटक्के यांनी ही कामगिरी बजावली.

नागपूर विद्यापीठ सामाजिक अंतर नियमांचे पालन करीत नाही

नागपूर विद्यापीठ

नागपूर : प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया संपल्यानंतर आता महाविद्यालयांमध्ये द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेशाची लगबग सुरू आहे. काही महाविद्यालये सोडली तर बहुतांश ठिकाणी ऑनलाईन प्रवेशाची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयांत बोलविले जात आहे व त्यामुळे प्रवेशासाठी गर्दी होत आहे. ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडत असल्याने विद्यार्थ्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे. खुलेआम महाविद्यालयांकडून ‘कोरोना’च्या नियमांचे उल्लंघन होत असताना प्रशासनाने मौन साधले आहे.

केंद्र व राज्य शासनाने कोरोना संक्रमणापासून लोकांचा जीव वाचविण्यासाठी गाईडलाईन जारी केल्या आहेत. मात्र अनेक महाविद्यालयांत त्यांचे पालनच होत नसल्याचे चित्र आहे. कॉंग्रेसनगर स्थित धनवटे नॅशनल कॉलेज येथे गुरुवारी प्रचंड गर्दी होती. विद्यार्थ्यांना दाटीवाटीने उभे राहावे लागत होते. सकाळी १० वाजल्यापासून विद्यार्थ्यांची लांब रांग दिसून आली. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला तर त्याला जबाबदार कोण असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाविद्यालयांत प्रवेशासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी येणार आहेत याची माहिती महाविद्यालय प्रशासनाला अगोदरपासूनच होती. तरीदेखील काहीच काळजी घेण्यात आली नाही.शहरातील इतरही काही महाविद्यालयांत असेच चित्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महाविद्यालयाचा दावा, १०० विद्यार्थ्यांना बोलविले
यासंदर्भात धनवटे नॅशनल कॉलेजच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी केवळ १०० विद्यार्थ्यांनाच बोलविले व ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चेदेखील पालन करण्यात आले असा दावा केला. मात्र ‘लोकमत’कडे असलेल्या छायाचित्रांत वेगळेच चित्र दिसून येत आहे. कोणत्या १०० विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले हे स्पष्ट होऊ शकले नाही. इतर महविद्यालयांना विचारणा केली असता त्यांनी विद्यापीठाकडे अंगुलीनिर्देश केला. विद्यापीठाने प्रवेशप्रक्रियेची स्पष्ट माहिती दिलेली नाही. प्रवेशाची मुदत संपण्याच्या काही दिवसअगोदर माहिती पुरविण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे असे त्यांनी सांगितले.

तुकाराम मुंडे गेले पण विकास ठप्पच , विकास कधी होईल ?

तुकाराम मुंढे

नागपूर : स्थायी समितीने मंजुरी दिलेली व कार्यादेश झालेल्या विकास कामांना मनपाचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ब्रेक लावल्याचा आरोप सत्तापक्षासह विरोधी पक्षातील काही नगरसेवक करीत होते. मॅरेथॉन चाललेल्या सभागृहात प्रभागातील विकास कामे रोखल्यावरून नगरसेवकांनी संताप व्यक्त करून मुंढे यांना धारेवर धरले होते. परंतु मुंढे यांची बदली होऊन एक महिना उलटला पण विकास कामे तर दूरच प्रभागातील अत्यावश्यक कामेही सुरू झालेली नाहीत.

राज्य सरकारने जीएसटी अनुदानात १०० कोटीपर्यंत वाढ केली आहे. जुनी थकबाकी दिली. परंतु प्रभागातील गडरलाईन, चेंबर व नाल्या दुरुस्ती अशा लहानसहान कामांसाठी लाख-दोन लाखांचा निधी उपलब्ध होत नसल्याने नगरसेवक हतबल आहेत. जीएसटी अनुदान व मालमत्ता कर, पाणी कर, नगररचना शुल्क, बाजारशुल्क यासह विविध मार्गांनी होणारे उत्पन्न गृहीत धरता दर महिन्याला मनपा तिजोरीत १३० ते १३५ कोटीचा महसूल जमा होतो. तर दर महिन्याचा आस्थापना खर्च ११५ ते १२० कोटी आहे. याचा विचार करता अत्यावश्यक कामासाठी निधी उपलब्ध करण्याला कोणतीही अडचण दिसत नाही. मनपाची आर्थिक स्थिती बिकट असली तरी अत्यावश्यक कामांसाठी निधी उपलब्ध करणे शक्य नाही, इतकी वाईट निश्चितच नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नगरसेवक व्यक्त करीत आहेत.

वित्तीय मंजुरी न घेताच कोट्यवधींची कामे
महापालिकेत वित्तीय मंजुरी न घेता १५० ते २०० कोटींची कामे गेल्या वर्षात करण्यात आली. कामे केल्यानंतर बिलाची मागणी केल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. असे प्रकार मनपात सर्रास होतात. दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या गडरलाईन व चेंबर दुरुस्तीसाठी लाख-दोन लाखांचा निधी मिळत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

आठ महिन्यापासून कामे ठप्प
आर्थिक परिस्थितीचे कारण पुढे करून प्रभागातील अत्यावश्यक कामांसाठी मागील आठ महिन्यापासून निधी दिला जात नाही. मनपाचे आर्थिक स्रोत तेच आहेत. जीएसटी अनुदानही वाढले. असे असतानाही नगरसेवकांना प्रभागातील विकास कामांसाठी निधी मिळत नाही.
संजय महाकाळकर, नगरसेवक

बजेटची प्रतीक्षा
ऑक्टोबर सुरू झाला पण मनपाचे बजेट सादर झालेले नाही. बजेट सादर झाले असते तर तररतुदीनुसार नगरसेवकांना प्रभागातील अत्यावश्यक कामांसाठी निधी उपलब्ध झाला असता. त्यामुळे बजेटची प्रतीक्षा आहे.
तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते.

बजेटमध्ये आवश्यक तरतूद करू
मनपाचे बजेट लवकरच सादर केले जाणार आहे. यात आवश्यक निधीची तरतूद करून विकास कामांना गती दिली जाईल. माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुधारित बजेटमध्ये आवश्यक कामासाठी निधीची तरतूदच केली नव्हती. त्यामुळे प्रभागातील लहानसहान कामे रखडली.
पिंटू झलके, अध्यक्ष स्थायी समिती

विदर्भ एक्स्प्रेस विदर्भ एक्स्प्रेस १० ऑक्टोबरपासून प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून सुटणार

विदर्भ

नागपूर : गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस नेहमी प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरून सोडण्यात येते. परंतु १० ऑक्टोबरपासून प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून नियमित सोडण्यात येणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०२१८९ मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस ११ ऑक्टोबरला आपल्या नियोजित वेळेनुसार सकाळी ७.२० वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वर येणार आहे. तर रेल्वेगाडी क्रमांक ०२१९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस रात्री ८.४० वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून सोडण्यात येणार आहे. परंतु परतीच्या प्रवासात रेल्वेगाडी क्रमांक ०२१०५ मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस सकाळी ८.५५ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर येणार आहे. प्रवाशांना दुरांतो आणि विदर्भ एक्स्प्रेसमध्ये पूर्वेकडील संत्रा मार्केट परिसरातील आरक्षण कार्यालयाच्या बाजूने असलेल्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश देण्यात येणार आहे. कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वेस्थानकात प्रवेश देण्यात येणार असून प्रवासात मास्क, फेस कव्हर घालणे, थर्मल स्क्रिनिंगसाठी प्रवासाच्या दोन तास आधी रेल्वेस्थानकावर येणे बंधनकारक आहे. प्रकृती ठीक असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे.

नागपुरात 237 लोकांना मास्क न घातल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला

कारवाई

नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी मास्कशिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार २३७ नागरिकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे १ लाख १८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी १०,७८४ नागरिकांविरुद्ध कारवाई करून ३७ लाख ५१ हजाराचा दंड वसूल केला आहे.
गुरुवारी लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ४२, धरमपेठ ४५, हनुमाननगर २९, धंतोली १४, नेहरुनगर १२, गांधीबाग १६, सतरंजीपूरा १८, लकडगंज १२, आशीनगर २३, मंगळवारी २० आणि मनपा मुख्यालयात ६ जणांविरुध्द कारवाई करण्यात आली. पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये याप्रमाणे आतापर्यंत ५,३१४ बेजबाबदार नागरिकांकडून २६ लाख ५७ हजार दंड वसूल करण्यात आला.
नागपुरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहाही झोनमधील मास्कशिवाय फिरणाºया बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. .

आतापर्यंत झोननिहाय दंड आकारलेल्यांची संख्या
लक्ष्मीनगर १,५१८
धरमपेठ १,९६७
हनुमाननगर १,००६
धंतोली १,०१८
नेहरूनगर ६०१
गांधीबाग ७०४
सतरंजीपुरा ७३९
लकडगंज ६४२
आशीनगर ११६३
मंगळवारी १३३३
मनपा मुख्यालय ९३

तूरडलच्या किंमतीत वाढ

तूरडाळ

नागपूर : दरवर्षी तूरीच्या आयातीसाठी दालमिलला केंद्र सरकारतर्फे देण्यात येणारे परवाने कोरोना काळात तीन महिने थांबवून ठेवल्याने बाजारात तूरडाळीचा तुटवडा निर्माण झाला. पुरवठा आणि मागणीत बरीच तफावत निर्माण झाल्याने मंगळवारी तूरडाळीचे भाव दीड महिन्यात किरकोळमध्ये ८५ ते ९० रुपयांवरून १३० ते १३५ रुपयांवर पोहोचले. भाववाढीवर नियंत्रण आणण्यासाठी बुधवारी केंद्र सरकारने तुरीची आयात आणि नाफेडच्या साठ्यातून ३.५ लाख टन तूर खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतल्यानंतर तुरीच्या भावात ५०० रुपयांची घसरण होऊन ९,५०० रुपयांवर स्थिरावले.

सरकारच्या चुकीमुळे तूरडाळीचे भाव आकाशाला भिडले आहेत. १५ दिवसात तूरडाळ तब्बल ३० रुपये किलोने वाढली आहे. दरदिवशी होणारी भाववाढ आणि ओरड झाल्यानंतर सरकारचे डोळे उघडले आणि बुधवारी तात्काळ दोन निर्णय घेतले. सरकार ३ लाख तुरीच्या आयातीसाठी परवाने जारी करणार आहे. परवाने जारी केल्यानंतर आयातीसाठी जवळपास दीड ते दोन महिने लागतील, तोपर्यंत डिसेंबरअखेरपर्यंत नवीन तूर बाजारात येईल. सरकारच्या निर्णयानंतर भाववाढीवर लगाम लागला, पण वाढलेले भाव कमी होण्याची काहीच शक्यता नाही. यावर्षी तुरीचे पीक चांगले आहे. तूर बाजारात आल्यानंतर डाळीचे भाव पुन्हा ८,५०० रुपयांवर खाली येऊ शकतात. पण त्याकरिता तीन महिने वाट पाहावी लागेल, असे होलसेल ग्रेन अ‍ॅण्ड सीड्स असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी स्पष्ट केले.

तुरीची साठेबाजी होऊ नये म्हणून सरकारने व्यापाऱ्यांऐवजी दालमिल मालकांना आयातीचा परवाना देण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी घेतला. यंदाच्या मोसमात सरकारने तीन महिन्यांपूर्वीच परवाने जारी केले असते तर ग्राहकांवर जास्त भावात डाळ खरेदीची वेळ आली नसती. शेतकऱ्यांना तुरीला जास्त भाव मिळावा म्हणून सरकार आयातीकडे दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम ग्राहकांना सोसावा लागत आहे. ज्या दुकानदारांकडे तूर डाळीचा जुना माल आहे, तेसुद्धा आता बाजाराचा कल पाहून जास्त भावात तूर डाळीची विक्री करीत आहेत. त्यामुळे किरकोळ दुकानांमध्ये १३० ते १३५ रुपये किलो भावात विक्री होत असल्याचे मोटवानी यांनी स्पष्ट केले.

चन्यावरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय
दीड महिन्यात चना डाळीचे भाव क्विंटलमागे २ हजार रुपयांनी वाढून ७५ ते ८० रुपये किलोवर पोहोचले आहेत. आता आयातील प्रोत्साहन देण्यासाठी आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याशिवाय उडीद आणि मूग डाळीचे भाव प्रति किलो १० ते १२ रुपयांनी वाढले आहेत. उडीद डाळ ९० ते ११० रुपये आणि मूग डाळ ९५ ते ११५ रुपये किलो भाव आहेत. सरकारने उडीद २ लाख टन आणि मूग २ लाख टन आयातीला परवानगी दिली आहे. पण यंदाच्या मोसमात दोन्ही मिळून अडीच लाख टन आयात झाली. त्याचाही परिणाम भाववाढीवर झाला आहे. पावसाळ्यात भाज्यांचे भाव वाढून डाळींना मागणी वाढते, हा दरवर्षीचा अनुभव आहे. याकडेही यंदा सरकारने कानाडोळा केल्याचे दिसून येते.

मोठे व्यापारी करताहेत साठेबाजी
मागणी आणि पुरवठ्यातील विसंगती, प्रतिकूल हवामान, उत्पादनाची कमतरता, वाहतुकीचा वाढलेला खर्च, साठवण सुविधांचा अभाव, साठेबाज आणि काळा बाजार करणाऱ्यांनी निर्माण केलेला कृत्रिम तुटवडा आदी कारणांमुळेही सर्वच डाळींच्या किमतीत वाढल्या आहेत. याकरिता व्यापारीही जबाबदार आहे. यंदा तुरीची कमतरता पाहून व्यापाऱ्यांनी डाळीची साठेबाजी केली. याही कारणामुळे डाळींच्या किमती वाढल्या आहेत. सरकारने साठ्यावरील नियंत्रण काढल्याने व्यापाऱ्यांचे फावत आहे. आता साठ्यावर नियंत्रण आणण्याची मागणी पुढे आली आहे.

लैंगिक छळ करण्याबाबत भारतातील कायदे

कायदे

नागपूर : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे देशाला धक्का बसला. लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणांना कसे हाताळायचे, कायदे कसे समजून घ्यायचे याबद्दल वेगवेगळी मते व्यक्त होत आहेत. अनेक सार्वजनिक हित याचिकांत बाजू मांडलेले वकील फिरदोस मिर्झा यांनी याबाबतच्या प्रश्नांना दिलेली उत्तरे.

प्रश्न : भारतात लैंगिक छळाच्या प्रकरणांशी संबंधित कोणते कायदे आहेत?
उत्तर : भारतीय दंड संहिता, लहान मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा, २०१२, (पोक्सो) महिलांचा कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ (प्रतिबंध, निषेध आणि निवारण) कायदा, २०१३ आणि अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, १९८९ हे सध्या अस्तित्वात आहेत. १८ वर्षांखालील मुलांबाबतचे गुन्हे पोक्सो अंतर्गत येतात. कामाच्या ठिकाणाशी संबंधित येणारा कायदा हा विशाखा कायदा म्हणून परिचित आहे.

प्रश्न : या कायद्यांखाली कोणते गुन्हे येतात?
उत्तर : जी कृत्ये भारतीय दंड संहितेनुसार गुन्हे आहेत त्यात महिलेचा विनयभंग करण्यासाठी बळाचा वापर करणे किंवा इच्छेविरुद्ध तिच्या शरीराशी संबंध येऊ देणे, सूचक शब्दांत किंवा हातवारे करून लैंगिक संबंधांची मागणी करणे, तिच्यावर पाळत ठेवणे आदींचा समावेश आहे. लहान मुलांच्या खासगी अवयवांना स्पर्श करणे हा पोक्सानुसार गुन्हा आहे.

प्रश्न : तक्रार कुठे आणि केव्हा करावी?
उत्तर : वरील प्रकारचे सगळे गुन्हे हे दखलपात्र असतात व त्यांची तक्रार कोणत्याही पोलीस ठाण्यात किंवा पोलिसांच्या संकेतस्थळावर करता येते. तात्काळ तक्रार नोंदवून घेणे ही पोलीस अधिकाऱ्याची जबाबदारी/कर्तव्य आहे. त्याला अपयश आल्यास दोन वर्षांपर्यंतची सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते.

प्रश्न : अहवाल घ्यायला पोलिसांनी नकार दिल्यास?
उत्तर : लेखी तक्रार पोलीस अधीक्षक किंवा आयुक्तांकडे करावी. त्यांनी गुन्हा न नोंदवल्यास तक्रार न्यायदंडाधिकाऱ्यांकडे (प्रथम श्रेणी) द्यावी.

प्रश्न : चौकशी अधिकारी कोण असू शकतो?
उत्तर : तपासाची जबाबदारी ही पोलीस ठाण्याच्या प्रभारीची असते. परंतु, पीडितेची तपासणी फक्त महिला पोलीस अधिकाºयानेच करावी.
पोक्सोअंतर्गत अधिकारी हा उप निरीक्षकाच्या दर्जाच्या खालचा नसावा. पीडित जर एससी/एसटी वर्गातील असेल तर तपास पोलीस उप अधीक्षकाच्या दर्जाच्या खालच्या अधिकाºयाने करायचा नाही.

प्रश्न : कोणते न्यायालय खटला चालवू शकेल?
उत्तर : भारतीय दंड संहितेखालील गुन्हे हे प्राधान्याने महिला न्यायाधीशांपुढे चालावेत आणि पीडित जर एससी/एसटी (अत्याचार प्रतिबंध) कायदा लागू असणारी असेल तर कायद्यानुसार स्थापन झालेल्या विशेष न्यायालयात चालेल.

प्रश्न : पोलीस जर योग्य पुरावा गोळा करत नसतील तर?
उत्तर : त्या परिस्थितीत पीडित स्वतंंत्र तक्रार करू शकते किंवा योग्य पुराव्यांसह सक्षम न्यायालयात आक्षेप दाखल करू शकते.

प्रश्न : पीडितेचे नाव आणि ओळख जाहीर करता येते का?
उत्तर : अजिबात नाही. भारतीय दंडसंहिता आणि पोक्सोअंतर्गत पीडितेचे नाव छापणे किंवा प्रकाशित करणे हा दोन वर्षे दंडनीय शिक्षा होणारा गुन्हा आहे.

प्रश्न : ज्या अधिकाºयांकडे तक्रार करता येईल असे इतर कोण आहेत?
उत्तर : राष्ट्रीय किंवा राज्य महिला आयोग, मुलांचे हक्क संरक्षण करणारा राष्ट्रीय किंवा राज्य आयोग आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती राष्ट्रीय किंवा राज्य आयोगाकडे या तक्रारी करता येतात.

बलात्कार म्हणजे काय?
उत्तर : भारतीय दंडसंहितेनुसार महिलेच्या इच्छेविरुद्ध, तिच्या परवानगीशिवाय,तिला फसवून किंवा भीती दाखवून किंवा तिला अमली पदार्थदेऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे. जर ती १८ वर्षांच्या आतील असेल किंवा संमती देण्यास सक्षम नसेल तर तो बलात्कार समजला जाईल.

गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांकडून काय अपेक्षित आहे?
उत्तर : पीडितेला ताबडतोब वैद्यकीय तपासणीसह वैद्यकीय साह्य दिले गेले पाहिजे. आरोपीला अटक होऊन त्याची वैद्यकीय तपासणी लवकरात लवकर झाली पाहिजे. पीडितेचे म्हणणे न्यायदंडाधिकाºयाने नोंदवून घ्यावे. कोणत्याही प्रकरणात तपास लवकरात लवकर म्हणजे दोन महिन्यांत पूर्ण करावा व आरोपपत्र न्यायालयात दाखल करावे.

शिक्षा कोणती?
उत्तर : भारतीय दंड संहितेनुसार या गुन्ह्यासाठी एक वर्षापासून ते मृत्यूदंडापर्यंत शिक्षा आहे. त्रास देणे, पाळत ठेवणे यासारख्या कमी स्वरुपाच्या गुन्ह्यांना वगळून बलात्कारासारख्या गुन्ह्यांना १० वर्षांपेक्षा कमी शिक्षा नाही. बलात्कारात तिचा मृत्यू झाला तर किंवा ती परावलंबी झाली तर मृत्यूदंडाची शिक्षा आहे. १२ वर्षांखालील महिलेवर बलात्कार झाल्यास २० वर्षांपेक्षा कमी शिक्षा होणार नाही, मृत्यूदंडही असू शकेल. पोक्सोअंतर्गत ही शिक्षा तीन वर्षांपासून जन्मठेपेपर्यंत होऊ शकते.

मुंबई-नागपूर दुरांतो, मुंबई-गोंदिया विशेष रेल्वेगाड्या शुक्रवारपासून

रेल्वे

अकोला : मिशन बिगीन अंतर्गत लॉकडाऊनचे नियम शिथिल होत असताना प्रवाशांच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेनेमुंबई ते नागपूर दुरांतो व मुंबई ते गोंदिया एक्स्प्रेस या दोन विशेष रेल्वेगाड्यांसह पाच एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, ९ व १० सप्टेंबरपासून या गाड्या सुरु होणार असून, या गाड्या पूर्णपणे आरक्षीत असून, ८ आॅक्टोबर पासून आरक्षण सुविधा उपलब्ध असणार आहे.

आगामी सणा-सुदीचे दिवस लक्षात घेता मध्य रेल्वेने नऊ आॅक्टोबरपासून पाच एक्स्प्रेस गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मुंबई ते नागपूर दुरांतो व मुंबई ते गोंदिया , डेक्कन क्वीन, इंद्रायणी आणि सिद्धेश्वर एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

गाड़ी क्रमांक ०२१९० अप मुंबई ते नागपूर दुरंतो ही विशेष गाडी ९ आॅक्टोबर पासून नागपूर रेल्वेस्थानक येथून दररोज रात्री ८. २० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ८.०५ वाजता मुंबई स्थानकावर पोहचेल. गाड़ी क्रमांक ०२१८९ डाउन मुंबई ते नागपुर दुरंतो ही विशेष गाडी १०आॅक्टोबर पासून मुंबई स्टेशन येथून दररोज रात्री ८.१५ वाजता रवाना होऊन दिवशी सकाळी ७.२० वाजता नागपूर स्थानकावर पोहचेल. या गाडीला फक्त भूसावळ येथे पाच मिनिटांचा थांबा असणार आहे.

गाड़ी क्रमांक ०२१०५ डाउन मुंबई – गोंदिया ही विशेष गाडी ९ आॅक्टोबरपासून दररोज सायंकाळी ७.०५ वाजता मुंबई स्थानकावरून रवाना होऊन दुसºया दिवशी सकाळी ११.२० वाजता गोंदिया स्थानकावर पोहचेल. ही गाडी दररोज पहाटे ४.१५ वाजता अकोला स्थानकावर येईल. गाड़ी क्रमांक ०२१०६ अप गोंदिया ते मुंबई ही विशेष गाडी १० आॅक्टोबरपासून दररोज दुपारी ३ वाजता गोंदीया रेल्वेस्थानकावरून रवाना होऊन दुसºया दिवशी सकाळी ७ वाजता मुंबई स्थानकावर पोहचेल. ही गाडी दररोज रात्री ८.५५ वाजता अकोला स्थानकावर येईल.
या गाड्यांना नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव,भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मुर्तीजापूर,बडनेरा स्थानकावंर थांबा असणार आहे.

नागपूर महापालिकेला स्टार म्युनिसिपल लिडरशीप पुरस्कार

महापालिके

नागपूर : पोर्णिमा दिनानिमित्त नागपूरकरांना ऊर्जा बचतीचा संदेश देणाऱ्या नागपूर महापालिकेचा ‘अर्थ डे नेटवर्क इंडिया’कडून ऊर्जा बचत गटातील यंदाचा ‘स्टार म्युनिसिपल लिडरशीप’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मनपाने पोर्णिमा दिनी ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकार्याने सुरू केलेल्या उपक्रमाची अर्थ डे नेटवर्क इंडियाने दखल घेतल्याने देशात नावलौकीक झाला आहे.

मनपा आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनतर्फे २०१४ पासून ऊर्जा बचतीच्या दृष्टीने पोर्णिमा दिवस हा विधायक उपक्रम तत्कालीन महापौर व आमदार प्रा. अनिल सोले यांच्या मार्गदर्शनात सुरू केला होता. या उपक्रमांतर्गत प्रत्येक पोर्णिमेच्या रात्री ८ ते ९ या वेळात अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन केलेजाते. यातून आतापर्यंत २ लाख ५३ हजार २०१ किलो कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण आणण्यात आले. एलइडी पथदिवे प्रकल्पांतर्गत नागपूर महानगरपालिकेने १ लाख ३९ हजार ६९५ पारंपरिक पथदिव्यांचे रुपांतर एलइडी पथदिव्यांमध्ये केले. यामुळे वषार्ला २ लाख २७ हजार यूनिट्स एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्बन फुटप्रिंट्समध्ये बचत झाली आहे.

अर्थ डे नेटवर्क इंडियाद्वारे देशातील महापालिकांसाठी १० वेगवेगळ्या श्रेणीतील स्टार म्युनिसिपल लिडरशीप पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनात ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे संचालक कौस्तभ चॅटजी व सुरभी जायस्वाल यांनी ऊर्जा बचत आणि हरीत आच्छादनाचा वाढता वापर या दोन श्रेणींमध्ये नागपूर महापालिकेचा नामांकन प्रस्ताव दाखल केला होता. अर्थ डे नेटवर्क इंडियाच्या भारतीय संचालक करुणा सिंग, महापौर संदीप जोशी व आयुक्त राधाकृष्ण बी.यांनी यांनी अभिनंदन केले आहे.

वेगवेगळ्या श्रेणींमध्ये देशातील पुरी, महाबळेश्वर, अहमदाबाद, थिरूअनंतपुरम आणि करीमनगर या महापालिकांनाही स्टार म्युनिसिपल लिडरशीप पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

सर्वांची जबाबदारी वाढली : संदीप जोशी
या यशामागे नागरिकांनी दाखविलेला पुढाकार, समंजसपणा आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या स्वयंसेवकांद्वारे करण्यात येणारी जनजागृतीची सुद्धा मोठी भूमिका आहे. या यशासह शहरातील नागरिक म्हणून प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. वीज बचतीसाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्र या महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केली.

कोरोना रूग्णाच्या संख्येत वाढ पण मृत्यू कमी

चीनमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचा फैलाव प्रचंड वेगाने

नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येणार केव्हा, असा प्रश्न सर्वांनाच पडला असताना कमी होणाऱ्या मृत्यूच्या संख्येने काहीसा दिलासदायक चित्र निर्माण झाले आहे. मंगळवारी २३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर रुग्णसंख्येत किंचित वाढ होऊन ८९८ वर पोहचली. आतापर्यंत ७०,७६७ रुग्णांनी कोविडवर मात केली. विशेष म्हणजे, उपचार घेत असलेल्या म्हणजे अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही १० हजारांच्या खाली आली आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ८३,१०५ व मृतांची संख्या २,६८२ झाली आहे.

कोरोनाला अटकाव करण्यासाठी जास्तीत जास्त चाचणी होण्याची गरज आहे. परंतु मागील काही दिवसांत चाचण्यांची संख्या मंदावली होती. परंतु आज पुन्हा चाचण्यांचा वेग वाढला. शहरात २९३४ तर ग्रामीणमध्ये २९५ असे एकूण ३२२९ रुग्णांच्या आरटीपीसीआर चाचण्या झाल्या. शिवाय, रॅपिड अँटिजेन चाचण्या शहरात १,५७९ तर ग्रामीणमध्ये २,९७७ असे एकूण ४,५५६ रुग्णांच्या चाचण्या झाल्या. एकूण ७,७८५ चाचण्या झाल्या. अँटिजेन चाचणीतून ३४२ बाधित रुग्ण आढळून आले. आरटीपीसीआर चाचणीत ५५६ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

-बाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक
मागील दोन आठवड्यांपासून बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहिली आहे. आज १४२५ रुग्ण बरे झाले. बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते ८५.१५ टक्क्यांवर पोहचले आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला हे प्रमाण ४१ टक्क्यांवर आले होते. सध्या शहरातील ५६,८९८ तर ग्रामीणमधील १३,८६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ९,६५६ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

-पुन्हा मेडिकलमध्ये एकच रुग्ण बाधित
मेडिकलच्या प्रयोगशाळेत आज ५११ रुग्णांच्या चाचण्यांमधून केवळ एक रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले, तर ५१० रुग्ण निगेटिव्ह आले. मागील चार दिवसांपासून हेच चित्र आहे. या सोबतच एम्समध्ये ३१९ चाचण्यांमधून ३९, मेयोत ७०७ चाचण्यांमधून ६७, माफसूमध्ये ७५ चाचण्यांमधून १९, नीरीमध्ये १९६ चाचण्यांमधून ३५ तर खासगी लॅबमधून १४२१ चाचण्यांमधून ३९५ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

नागपूर ते मुंबई: सकाळी आणखी एक उड्डाण

Sri Lanka to resume flights from Jaffna to Chennai next week
Sri Lanka to resume flights from Jaffna to Chennai next week

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १६ ऑक्टोबरपासून इंडिगो एअरलाईन्स मुंबई-नागपूर ही नवीन विमानसेवा सुरु करीत आहे. ६ ई ५३४ हे विमान मुंबईवरून नागपूरला सायंकाळी ५ वाजता पोहोचेल. यानंतर नागपूर विमानतळावर नाईट पार्किंग करीत दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता मुंबईसाठी रवाना होईल. या सेवेसाठी एअरबस ३२० चा उपयोग केला जाईल. याची प्रवासी क्षमता १८० इतकी आहे. यापूर्वी १६ सप्टेंबरपासून दिल्लीसाठी उडणाऱ्या एका विमानाचे नागपुरात नाईट पार्किंग होत आहे.

आता मुंबईसाठी आणखी एक विमान सुरू होत असल्याने एकूण चार उड्डाणे होतील. सध्या नागपूर-मुंबईसाठी गो एअरची जी ८ -१४१ सकाळी ८ वाजता, इंडिगोची ६ ई २९७ दुपारी १२.१५ वाजता आणि ६ ई ६४०४ रात्री ९.०५ वाजता उपलब्ध आहे. १६ आॅक्टोबरपासून सुरू होत असलेल्या इंडिगोचे विमान शेड्यूलमध्ये दाखविले जात आहे.

नागपुरात हत्या : घरात घुसून हत्या

हत्या

नागपूर : शेजाऱ्यांशी सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान एकाच्या हत्येत झाले. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांढराबोडी परिसरात रविवारी रात्री हा थरार घडला. अशोक संतराम नहारकर (वय ४०) असे मृताचे नाव असून त्यांची हत्या करणाऱ्या आरोपीची नावे मुन्ना महातो, रामू ऊर्फ चुन्नी महातो आणि चेतन महातो आहेत. या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

मृत अशोक नहारकर आणि आरोपी मुन्ना हे एकमेकाच्या शेजारी राहतात. त्यांच्यात अनेक दिवसांपासून कुरबुरी सुरू होत्या. या पार्श्वभूमीवर, आरोपी मुन्ना, चुन्नी आणि चेतन महातो हे तिघे रविवारी रात्री १० च्या सुमारास दिनेश संतराम नहारकर यांच्या घरावर चालून गेले. त्यांनी दिनेशला अश्लील शिवीगाळ केली. तेरा भतिजा इतना बडा बदमाश हो गया क्या, असे म्हणून ते मोठमोठ्याने अश्लील शिवीगाळ करू लागले. दिनेशने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्याला बेदम मारहाण केली. वाद वाढू नये म्हणून दिनेश आपल्या घरात गेले आणि त्यांच्या घरच्यांनी आतून दार लावून घेतले.

आरोपींनी त्यांच्या दारावर लाथा मारून दार तोडले आणि आत गेले. आरोपी घरात तोडफोड करत असल्याचे पाहून दिनेश यांचे मोठे भाऊ अशोक नहारकर यांनी आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी जवळचा चाकू काढून अशोक यांच्या छातीवर, पोटावर आणि हातावर घाव घातले. ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही आरोपी इतरांना धमकावत होते. आजूबाजूची मंडळी धावली. त्यानंतर आरोपी बाहेर निघाले. माहिती कळताच अंबाझरी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी तीनही आरोपींना ताब्यात घेतले.

दिवसा पूर्ण वेळ २५ हजार शेतकऱ्यांना वीजपुरवठा

वीज

नागपूर : रात्रीच्या वेळेस कृषिपंपांना देण्यात येणाऱ्या वीजपुरवठ्यामध्ये येणाऱ्या अडचणी, शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेद्वारे उपकेंद्राजवळ सौर ऊर्जा प्रकल्प उभारून निर्माण होणारी वीज कृषी वाहिनीद्वारे शेतकऱ्यांना दिवसा देण्यात येणार आहे, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील किमान ५० वीजवाहिन्यांवरील सुमारे २५ हजार शेतकºयांना दिवसा वीज उपलब्ध करून देत ही योजना सुरू करण्यात आली आहे.

राज्यातील कृषिपंपाच्या थकबाकीचा आकडा हा व्याज व दंडासहित सुमारे ४२००० कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. कृषीपंपाच्या थकबाकीसंबंधाने स्वतंत्र धोरण करण्याची बाब महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन आहे. तथापि सध्याची महावितरणची आर्थिक परिस्थिती बघता वरील योजनेची अंमलबजावणी करतेवेळेस त्या वीजवाहिन्यांवरील किमान ८० टक्के कृषी ग्राहकांनी चालू वीजबिलांचा भरणा करणे अपेक्षित आहे.
सद्यस्थितीत महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या मान्यतेनुसार राज्यातील कृषिपंपांना दिवसा ८ तास व रात्री १० तास आठवड्यात चक्राकार पध्दतीने तीन फेज वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त प्रवेशास परवानगी नाही : उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

नागपूर : राज्य सरकारच्या परवानगीशिवाय अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची कृती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवली. तसेच, संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रवेशांना मान्यता मिळण्यासाठी महाविद्यालयाने दाखल केलेली रिट याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदुरकर व नितीन सूर्यवंशी यांनी हा निर्णय दिला. विसापूर, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर येथील राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालयाला ३० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची मान्यता आहे. या महाविद्यालयाने ही क्षमता वाढवून १५० विद्यार्थी करण्यासाठी सरकारला प्रस्ताव सादर केला होता. तसेच, त्यावर निर्णय होण्यापूर्वीच २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता. त्यानंतर गोंडवाना विद्यापीठाने सरकारी परवानगी नसल्यामुळे या प्रवेशांना मान्यता दिली नाही. त्यामुळे महाविद्यालयाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका प्रलंबित असताना सरकारने १६ मार्च रोजी महाविद्यालयाचा प्रस्ताव खारीज केला. तसेच, न्यायालयानेही विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता महाविद्यालयाला दिलासा देण्यास नकार दिला.

विद्यार्थ्यांची याचिकाही खारीज
गोंडवाना विद्यापीठाला एनरॉलमेंट फॉर्म स्वीकारण्याचे निर्देश देण्यात यावे अशा विनंतीसह या महाविद्यालयातील ६४ विद्यार्थ्यांनी दाखल केलेली याचिकाही न्यायालयाने खारीज केली. तसेच, हे विद्यार्थी नुकसान भरपाईसाठी कायद्यात उपलब्ध मार्गाचा अवलंब करू शकतात असे स्पष्ट केले. याशिवाय न्यायालयाने सदर महाविद्यालयात सर्वप्रथम प्रवेश घेतलेले ३० विद्यार्थी शिक्षण सुरू ठेवण्यास पात्र असतील, असेदेखील घोषित केले.

नागपूर विद्यापीठ ; नेटवर्क नसेल तर ‘ई-मेल’वर पाठवा पेपर!

नागपूर विद्यापीठ

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षांची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. विद्यापीठाने परीक्षेसाठी मोबाईल अ‍ॅप तयार केले असून इंटरनेटच्या नेटवर्कअभावी विद्यार्थ्यांना पेपर अपलोड करता आला नाही तरी आता घाबरण्याची आवश्यकता राहिलेली नाही. अशा स्थितीत थेट विद्यापीठाने दिलेल्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक किंवा ई-मेलवर सोडविलेला पेपर पाठवता येणार आहे. विद्यार्थ्यांना पडणाऱ्या प्रश्नांसंबंधात विद्यापीठाने उत्तरसूची जारी केली असून त्यात ही बाब स्पष्ट करण्यात आली आहे.

परीक्षेदरम्यान नेटवर्क गेले तरी प्रश्नपत्रिका सोडविणे शक्य होणार आहे. नेटवर्क आल्यानंतर उत्तरे दोन तासांच्या आत सबमिट करता येणार आहे. मात्र या कालावधीनंतरदेखील नेटवर्क येत नसेल तर विद्यार्थ्यांना कागदावर रोल नंबर, विषय, अभ्यासक्रम व मोबाईल क्रमांक लिहून एकाखालोखाल प्रश्न व बरोबर पर्याय लिहिता येणार आहे. हा पेपर ई-मेलवर पाठविता येईल. यादरम्यान, अ‍ॅप विद्यार्थ्यांच्या हालचाली, आवाज रेकॉर्ड करत राहील. गैरप्रकार करणाºया विद्यार्थ्यांची नावे थेट व्हिजिलेन्स समितीकडे पाठविण्यात येतील, असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.
संबंधित अ‍ॅप हे ‘गुगल प्लेस्टोअर’वर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप विद्यार्थ्यांनी नियमितपणे अपडेट करावे, असेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.

प्राचार्यांशी संपर्क साधावा
काही विद्यार्थ्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट होऊ शकतो. अशा स्थितीत प्रवेशपत्र डाऊनलोड झाले नाही तर महाविद्यालयांतील प्राचार्यांशी संपर्क साधावा. प्राचार्य विद्यापीठ यंत्रणेशी संपर्क साधतील व समस्येचे निराकरण होईल, असे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले आहे.

अ‍ॅपमध्ये अडचण आली तर हे करा
विद्यार्थ्यांना अ‍ॅपसंदर्भात अडचणी येत असल्यास अगोदर ते अनइन्स्टॉल करावे व त्यानंतर नवीन अ‍ॅप डाऊनलोड करावे. महाविद्यालयातून मिळालेल्या हॉल तिकीटमध्ये आणि परीक्षेसंदर्भातील अ‍ॅपमध्ये प्रत्येकाने आपले नाव, रोल नंबर, मोबाईल नंबर तसेच विषय बरोबर आहेत काय ते तपासून घ्यावे. यासंदर्भात काही अडचणी असल्यास त्वरित महाविद्यालयाशी संपर्क साधावा. महाविद्यालयातून मोबाईल नंबर तसेच नावांमधील असलेला बदल करता येईल. कारण महाविद्यालयातील लॉगिनवरून हे त्वरित करणे शक्य आहे.

लॉकडाऊनदरम्यान चॅटिंगमुळे पती-पत्नीचे अनैतिक संबंध उघडकीस, नागपुरात सहा महिन्यात 600 तक्रारी

चॅटिंग

नागपूर : लॉकडाऊनमध्ये चॅटिंगमुळे अनेक जोडप्यांमधील अनैतिक संबंध समोर आले आहेत . नागपूरमध्ये गेल्या सहा महिन्यात पोलिसांकडे 600 पेक्षा अधिक तक्रारी याबाबत आल्या आहेत. एप्रिल, मे आणि जून महिन्यात सर्वाधिक तक्रारी आल्या आहेत .

लॉकडाऊनमध्ये पती-पत्नी 24 तास घरात राहत होते. याच काळात बाहेर ये-जा बंद असल्याने सोशल मिडियावर पती-पत्नीच्या चॅटिंगचं प्रमाण वाढलं आहे. पण यात अति चॅटिंगमुळे नागपुरात अनेक संसाराची सेटिंगच बिघडलेली आहे. अति चॅटिंगमुळे एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात पती-पत्नीकडून 600 पेक्षा जास्त तक्रारी नागपूर पोलिसांच्या भरोसा सेलकडे पोहोचल्या आहेत.

यातल्या काही केसेस घटस्फोटापर्यंतही पोहोचल्या आहेत. कोरोनाच्या काळात पती-पत्नीचे अनैतीक संबंधंही समोर आल्याच्या तक्रारी पोलीसांपर्यंत पोहोचल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात बाहेर जाणं बंद असल्याने बाहेरील मित्र मैत्रीणी किंवा सहकाऱ्यांच्या संपर्कासाठी सोशल माध्यम हेच प्रभावी साधन ठरलं. पण याच सोशल मीडियावर अति चॅटिंगमुळे अनेकांचे अनैतीक संबंध समोर आलेत. याबाबतच्या तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे सोशल माध्यमांवर अति चॅटिंग सुखी संसारात विष कालवत असल्याची बाब लक्षात आली आहे.

दरम्याम, लॉकडाऊनमुळे चीनमध्येही अनेक पती-पत्नींच्या भांडणात वाढ झाली आहे आणि घटस्फोटाच्या प्रमाणातही मोठ्या संख्येने अर्ज करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक पती-पत्नी घरात बंदिस्त आहेत. त्यामुळे सतत त्यांच्यात वाद होत असल्याने घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ झाल्याचे वृत्त तेथील स्थानिक वृत्तांनी दिले आहे.

राज्यात ‘अ‍ॅट्रॉसिटी’चे नागपुरात सर्वाधिक गुन्हे

अत्याचार

नागपूर : मागील तीन वर्षांत उपराजधानीमध्ये ‘अ‍ॅट्रॉसिटी’च्या गुन्ह्यांची संख्या वाढतच असल्याचे चित्र आहे. २०१७ च्या तुलनेत २०१९ मध्ये दुप्पट गुन्हे दाखल झाले. दुर्दैवाची बाब म्हणजे यातदेखील महिला अत्याचाराचेच सर्वात जास्त गुन्हे आहेत.
‘एनसीआरबी’च्या २०१९ सालच्या अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

शिक्षेचे प्रमाण शून्य
पोलिसांकडून २०१९ मध्ये एकूण ८८ गुन्ह्यांची चौकशी झाली. यात २०१८ च्या प्रलंबित असलेल्या ३३ प्रकरणांचा समावेश होता. न्यायालयात ‘अ‍ॅट्रॉसिटी’अंतर्गत ३६ खटले दाखल करण्यात आले. या कालावधीत जुन्या तसेच तत्कालीन दाखल अशा १६४ खटल्यांवर सुनावणी झाली. यात एकालाही शिक्षा झाली नाही तर ३३ प्रकरणांत ७७ जणांची निर्दोष मुक्तता झाली.

राज्यात वृद्धही असुरक्षित
158 वृद्धांंची हत्या
10दरोडे घालण्याच्या
घटना समोर आल्या.
2051गुन्हे हे वृद्धांंना
लक्ष्य करून चोरी केल्याप्रकरणी दाखल झाले.
325जबरी चोरीच्या
गुन्ह्यांची नोंद झाली.
43विनयभंग व ज्येष्ठ महिलांवर बलात्काराचे २ गुन्हे घडले.

२०१९ साली नागपुरात ‘अ‍ॅट्रॉसिटी’चे एकूण ५६ गुन्हे दाखल करण्यात आले. २०१७ मध्ये हीच संख्या २८ तर २०१८ मध्ये २४ इतकी होती. तीन वर्षांत दाखल गुन्ह्यांमध्ये तब्बल १०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. मोठ्या शहरांत नागपूरचा राज्यात पहिला तर देशात नववा क्रमांक आहे.

संतापजनक! महिलेला विकलं; अल्पवयीन मुलीला स्वत:च्या घरी ठेवून वारंवार बलात्कार

कायदे

नागपूर : मानवी तस्करीत गुंतलेल्या एका नराधमाने साडेतीन महिन्यांपूर्वी निराधार महिलेला नोकरीचे आमिष दाखवून मध्य प्रदेशात विकले. तिची अल्पवयीन मुलगी स्वत:च्या घरी ठेवून घेतली आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला. प्रचंड संतापजनक अशी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना झाली आहेत.

सुशील पैसाडील असे या आरोपीचे नाव असून तो अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. घटस्फोटित, निराधार आणि गरीब महिला, मुलींना आपल्या जाळ्यात ओढून तो त्यांना प्रारंभी मदत करतो. नंतर नोकरीचे आमिष दाखवतो. त्याच्या जाळ्यात अडकलेल्या महिला, मुलीला परप्रांतात नेऊन विकतो. अजनीतील एक पतीपासून विभक्त झालेली विवाहित महिला जूनमध्ये त्याच्या संपर्कात आली होती. तिला १४ वर्षांची मुलगी आणि १० वर्षांचा मुलगा आहे. दोघांचा सांभाळ करतो असे सांगून मुलगी आणि मुलाला स्वत:च्या घरी ठेवले, तर महिलेला त्याने मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे नेले. त्या महिलेची मुलगी सातवीत शिकते. आरोपीची पत्नी घराबाहेर गेल्याची संधी साधून तो या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करायचा. तीन महिन्यात त्याने तिच्यावर अनेकदा पाशवी बलात्कार केला. आई-वडील कोणीच जवळ नसल्यामुळे पीडित मुलगी जीवाच्या धाकाने अत्याचार सहन करत होती. आरोपीची पत्नीही त्याबाबत काही बोलत नव्हती.

असा झाला उलगडा
गिट्टी खदानमधील दोन तरुणींना एका टोळीने मध्य प्रदेशात नेऊन विकले. या घटनेचा बोभाटा झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना शोधणे सुरू केले. त्यात आरोपी सुशील पैसाडील याचेही नाव आले. त्यामुळे पोलीस रविवारी त्याच्या अजनीतील घरी पोहोचले. त्याच्या घराची झडती घेतली असता अत्याचारग्रस्त मुलगी आणि तिचा लहान भाऊ आढळले. ती त्याची मुले नसतानादेखील त्याच्या घरी राहत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आरोपीने त्या अल्पवयीन मुलीवर स्वत: बलात्कार करतानाच तिला आपल्या मित्राच्याही हवाली केले. त्यामुळे त्याच्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केल्याचा दुसरा संतापजनक पैलू उघड झाला आहे.

नागपूर पोलिसांची ऑनलाईन तक्रार सेवा बंद

ऑनलाईन

नागपूर : सामान्य माणूस पोलीस ठाण्याची पायरी चढण्यास अडखळतो. ठाण्यामध्ये पोलिसांकडून मिळणाऱ्या वागणुकीमुळे अनेक लोक तक्रार देण्यासही धजावत नाहीत. अशा लोकांसाठी पोलीस स्टेशन न गाठता, ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा पोलीस विभागाने उपलब्ध करून दिली होती. पण ही सेवा गेल्या काही महिन्यांपासून बंद पडली आहे. नागपूर पोलीसच नाही तर महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रारच होत नसल्याची तक्रारकर्त्यांची ओरड आहे.

ऑनलाईन तक्रार करणे ही सुविधा फार सोपी आहे. ऑनलाईन तक्रारीची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घ्यावी लागत असल्याने, कारवाई झपाट्याने होत असल्याचेही ऑनलाईन तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे. नागपुरातील हेमंत गांजरे यांनी या सेवेचा लाभही घेतला आहे. पण ही सेवा गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याचे गांजरे यांचे म्हणणे आहे. नागपूर पोलिसांच्या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार दाखल करण्याचे ऑप्शन आहे. परंतु तक्रार दाखल करण्यास हे वेबपेज उघडले तर समोर जात नाही. त्यामुळे तक्रार दाखल केली जाऊ शकत नाही. गांजरे यांनी यासंदर्भात पोलीस महासंचालकांना ई-मेलवर तक्रार दाखल केली होती. महासंचालकांनी तक्रारीची दखल घेऊन पोलीस आयुक्त आणि डीसीपी इकॉनॉमिक यांना सूचना दिल्या होत्या. डीसीपी इकॉनॉमिक यांनी गांजरे यांना ऑनलाईन तक्रार सेवा सुरळीत झाल्याचे ई-मेलद्वारे कळविले होते. मात्र ही सुविधा अजूनही सुरळीत झालेली नाही.

– जनतेसाठी सुविधाजनक
एखाद्या पीडितावर दबाव वाढत असेल, पोलीस ठाण्यास जाण्यास त्याला भीती वाटत असेल तर घरबसल्या ऑनलाईन तक्रार करता येते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार जात असल्याने त्याची दखल तात्काळ होते. ऑनलाईन तक्रार सेवा सुरू ठेवणे ही जनतेसाठी सुविधा आहे, असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे.

विदर्भात मृत्यूचा दर २.६८ टक्के

रुग्ण

नागपूर : विदर्भात दोन आठवड्यांपूर्वी रुग्णसंख्या तीन हजारांवर गेली होती, तर मृत्यूच्या संख्येने शंभरी गाठली होती, परंतु आता ती निम्म्यावर आली आहे. रविवारी १५८९ रुग्ण व ५१ मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या १५६६६९ तर मृत्यूची संख्या ४२१२ झाली आहे. मृत्यूचे प्रमाण २.६८वर आले आहे.

नागपूर जिल्ह्यातही रुग्णसंख्या मंदावली आहे. ६१७ रुग्णांची नोंद झाली असून २७ रुग्णांचे बळी गेले. रुग्णांची एकूण संख्या ८१४६१ तर मृतांची संख्या २६२३ झाली आहे. विशेष म्हणजे, नव्या रुग्णांच्या तुलनेत दुप्पट रुग्ण बरे होऊ लागले आहेत. नागपुरनंतर अमरावती जिल्ह्यात आज सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली. १० रुग्णांचे मृत्यू झाले. मृतांची संख्या ३११वर पोहचली. जिल्ह्यात १३९ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून रुग्णसंख्या १४००६ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १५९ रुग्ण बाधित असल्याचे आढळून आले. रुग्णसंख्या ११०२६ झाली आहे.

चार रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या १६७ वर गेली आहे. बुलढाणा जिल्ह्यात आज १३९ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या ७६४८ झाली. गडचिरोली जिल्ह्यात १११ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या ३१९७वर पोहचली. गोंदिया जिल्ह्यात १२० रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या ७४६७ झाली आहे. भंडारा जिल्ह्यात १०६ रुग्ण व तीन रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णसंख्या ५९९० तर मृतांची संख्या १३६ वर गेली आहे.

वर्धा जिल्ह्यात सहा रुग्णांचे मृत्यूने बळींची संख्या १४० झाली. ८४ नव्या रुग्णांची भर पडली असून रुग्णसंख्या ४९३६ वर गेली आहे. वाशिम जिल्ह्यात ६८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. अकोल्यात २५ रुग्ण व एकाचा मृत्यूची नोंद झाली. सर्वात कमी रुग्णाची नोंद यवतमाळ जिल्ह्यात झाली. २२ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

नागपूर विद्यापीठ; एकाच महाविद्यालयातील ४२ विद्यार्थ्यांच्या आईचे नाव एकसारखेच

नागपूर विद्यापीठ

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे पहिल्यांदाच ऑनलाईन परीक्षा घेण्यात येत आहेत. यासाठी विशेष मोबाईल अ‍ॅपदेखील विकसित केले आहे. यासाठी आवश्यक असलेल्या परीक्षा प्रवेशपत्राबाबत घडलेली अजबच बाब समोर आली आहे. प्रवेशपत्रावर एकाच महाविद्यालयातील ४२ विद्यार्थ्यांच्या आईचे नाव ज्योती असे आले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना धक्का बसला होता. सर्व्हरवरील ताणामुळे प्रवेशपत्रातील हा घोळ झाला होता व आता ही त्रुटी दूर करण्यात आली असल्याचा दावा विद्यापीठातर्फे करण्यात आला आहे.

विद्यापीठाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले व ते महाविद्यालयांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे होते. मात्र कर्मचारी आंदोलनामुळे १ ऑक्टोबरपासून परीक्षा सुरूच झाली नाही. दरम्यान, २८ सप्टेंबर रोजी एका महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड केले व ते विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन माध्यमातून पोहोचवले. यातील तब्बल ४२ विद्यार्थ्यांच्या आईचे नाव ज्योती असे नमूद करण्यात आले होते. ही बाब महाविद्यालयाने विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली. याची चौकशी केली असता सर्व्हरवरील ताणामुळे २८ व २९ सप्टेंबर रोजी काही विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्राचा डाटा मिसमॅच झाल्याची माहिती मिळाली. परीक्षेचे मोबाईल अ‍ॅप हे विद्यार्थ्यांसाठीच होते. मात्र आवश्यकता नसतानादेखील विद्यार्थी सोडून अनेकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यामुळे सर्व्हरवरील ताण वाढला होता. आता ही त्रुटी दूर करण्यात आली असून विद्यार्थ्यांना सुधारित ओळखपत्रे पोहोचली आहेत, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना डाऊनलोड करता येणार प्रवेशपत्र
अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालये प्रवेशपत्रे देण्यासंदर्भात सहकार्य करत नसल्याची बाब मांडली होती. विद्यार्थ्याना प्रवेशपत्र मिळण्यास अडचणी येऊ नये यासाठी विद्यापीठाने नवीन लिंक तयार केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वत:चे प्रवेशपत्र घरबसल्या डाऊनलोड करता येणार आहे, असे डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले.

वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर आता ५ ऑक्टोबरला निर्णय

वीज

नागपूर : एसएनडीएलमधून महावितरणमध्ये आलेल्या ३५० कर्मचाऱ्यांनी दुपारी ४ वाजता सामूहिक संपावर जाण्याचा इशारा दिल्याने वीज वितरण व्यवस्था डगमगली होती. परंतु रात्री ९ वाजता आंदोलन ५ ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ४० कर्मचाऱ्यांना अचानक नोकरीतून काढण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी सामूहिक संपाचा निर्णय घेतला होता. हा संप जर कायम राहिला असता तर महावितरणला पुरवठा सुरळीत ठेवणे अवघड झाले असते.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एसएनडीएलची सेवा बरखास्त करून शहरातील ३ डिव्हिजन महाल, गांधीबाग व सिव्हिल लाईन्सचे कामकाज महावितरणने सांभाळले. एसएनडीएलचे ऑपरेटर, लाईनमन यांना आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून कायम ठेवले. आता महावितरण त्यांच्या जागी परमनंट कर्मचाºयांना त्यांच्या जागी नियुक्त करीत आहे. जवळपास ४० ऑपरेटर व लाईनमनला काढण्यात आले आहे.

एसएनडीएलच्या या कर्मचाऱ्यांनी आज महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या बॅनरखाली अधीक्षक अभियंता यांना पत्र पाठवून दुपारी ४ वाजता सामूहिक संपावर जात असल्याची माहिती दिली. झोन सचिव नितीन शेंद्रे यांनी पत्रात स्पष्ट लिहिले की, शहरातील विजेचे संकट टाळण्यासाठी या कर्मचाऱ्यांचा महावितरणमध्ये समावेश करण्यात यावा. महावितरणने एका वर्षातच या कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप संघटनेने केला आहे. कर्मचाऱ्यांनी ऊर्जामंत्री व मुख्य अभियंता यांना पत्र लिहिले आहे. परंतु कु णीच दखल घेतली नाही. हे कर्मचारी अनेक वर्षापासून शहरातील सब स्टेशन बरोबरच वितरण प्रणालीची जबाबदारी सांभाळत आहे. मोठ्या संख्येने कर्मचारी संपावर गेल्यास वीज वितरण व्यवस्था अडचणीत येण्याची शक्यता आहे.

अडचण होऊ देणार नाही – महावितरण
महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके म्हणाले की कंपनी नागरिकांना कुठलीही समस्या होऊ देणार नाही. फिल्डवर कंपनीचे २०० ऑपरेटर, लाईनमन तैनात आहेत. अन्य कर्मचाऱ्यांना जॉईन करायचे आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची अडचण राहणार नाही.

नरखेडमधील बलात्कार प्रकरण : आरोपीला १० वर्षे कारावास

बलात्कार

नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने नरखेड येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व १००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्या. बी. पी. क्षीरसागर यांनी हा निर्णय दिला. प्रकाश भैरुराम धरी (२६) असे आरोपीचे नाव असून तो राजस्थान येथील मूळ रहिवासी आहे. ही घटना २०१७ मध्ये घडली. त्यावेळी पीडित मुलगी १६ वर्षे वयाची होती. धरी व्यवसायाने वाहनचालक आहे. तो सावरगाव येथील शेतात ब्लास्टिंगच्या कामासाठी आला होता. दरम्यान, त्याने पीडित मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवले. तिला लग्नाचे आमिष दाखवून राजस्थानला बोलावले. त्यानंतर तिला वेगवेगळ्या नातेवाईकांकडे घेऊन जाऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. परंतु, मुलीसोबत लग्न केले नाही. काही दिवसांनी नरखेड पोलिसांनी राजस्थानमध्ये जाऊन दोघांनाही परत आणले. तसेच, मुलीच्या तक्रारीवरून धरीविरुद्ध बलात्कार, अपहरण इत्यादी गुन्हे नोंदवले. प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सत्र न्यायालयाने मुलीचे बयाण व रेकॉर्डवरील अन्य विविध पुरावे लक्षात घेता आरोपीला सदर शिक्षा सुनावली.

विदर्भात कोरोनाच्या रुग्णांत ६० टक्के वाढ

चीनमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचा फैलाव प्रचंड वेगाने

नागपूर : विदर्भात कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले आहे. मागील सात महिन्याच्या तुलनेत एकट्या सप्टेंबर महिन्यात ६० टक्के नव्या रुग्णांची भर पडली. मृतांची संख्याही ६० टक्क्याने वाढली. दिलासादायक म्हणजे, ७१ टक्के रुग्ण बरे झाले. सप्टेंबर महिन्यात रुग्ण व मृतांच्या संख्येत झालेली वाढ पाहता ऑक्टोबर महिना कसा राहील, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

अकाराही जिल्ह्यात कोरोनाची दहशत आहे. मात्र, अमरावती विभागाच्या तुलनेत नागपूर विभागात अधिक रुग्ण व मृत्यूची नोंद होत आहे. नागपूर विभागात नागपूर जिल्ह्यासह आता चंद्रपूर, गोंदिया, भंडारा व वर्धा जिल्ह्यात रुग्ण झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात ७९ हजार, चंद्रपूर जिल्ह्यात १० हजार, भंडारा जिल्ह्यात पाच हजार, गोंदिया जिल्ह्यात सहा हजार, वर्धा जिल्ह्यात चार हजार तर गडचिरोली जिल्ह्यात अडीच हजारांवर रुग्णांचा आकडा ओलांडला. अमरावती विभागात सर्वाधिक रुग्ण अमरावती विभागात आहेत. या जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येने १३ हजाराचा आकडा पार केला. सोबतच यवतमाळ जिल्ह्याने आठ हजार, अकोला जिल्ह्याने सात हजार, बुलडाणा जिल्हाने सात हजार तर वाशिम जिल्ह्याने चार हजार रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडला आहे.

-८८,७७९ नवे रुग्ण व २,४०८ मृत्यू
३० सप्टेंबर रोजी रुग्णांची एकूण संख्या १,४९,११७ व मृतांची संख्या ३,९९७ वर गेली. या महिन्यात तब्बल ८८,७७९ रुग्णांची व २,४०८ मृत्यूंची भर पडली. आतापर्यंत एकूण १,१४,७२८ रुग्ण बरे झाले. या महिन्यात सर्वाधिक ८१,५६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

-सप्टेंबर महिन्यातील महत्त्वाचे
::१८ आणि २४ तारखेला मृत्यूच्या आकड्याने दोनदा शंभरी गाठली
:: रोजच्या बाधित रुग्णांच्या तुलनेत नऊवेळा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक होती

गांधी जयंती विशेष : चरख्याची सर्वांत लहान प्रतिकृती!

गांधी

नागपूर : नागपुरातील झिंगाबाई टाकळी येथील निवासी व महालेखाकार कार्यालयात वरिष्ठ लेखापाल म्हणून कार्यरत असलेले जयंत तांदूळकर यांनी नखावर मावेल एवढ्या लहान चरख्याची प्रतिकृती साकारली आहे. हा चरखा त्यांनी महात्मा गांधी यांच्या स्वदेशी संकल्पनेला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताला समर्पित केला आहे.

जयंत तांदूळकरांनी सूत कातणाऱ्या चरख्याचे विविध मॉडेल साकारले आहेत. त्यातील सर्वात लहान चरखा ३.२० मि.मी. लांबीचा, २.६८ मि.मी. रुंदीचा अन् ३.०६ मि.मी. उंचीचा आहे. यासाठी त्यांनी अगदी लहान लाकडी स्टिक, स्टील वायर, कॉटनचा धागा यांचा वापर केला आहे. विशेष म्हणजे, हा चरखा केवळ दिखावा किंवा प्रतिरूप नव्हे तर यावर सूत कातता येते. हा चरखा पूर्णपणे कार्यरत असून, गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड व अन्य विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय रेकॉर्डसाठी नामांकित करण्यात आला आहे. हा जगातील सर्वात लहान चरखा असल्याचा तांदूळकर यांचा दावा आहे.

स्वातंत्र्ययुद्धातील प्रमुख शस्त्र म्हणून महात्मा गांधी यांनी चरखा वापरला होता. स्वदेशीचा नारा दिला होता. त्याच नाºयाच्या अनुषंगाने आत्मनिर्भर भारताचे बीजारोपण झाले होते. नव्या युगात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हाच नारा दिला आहे. त्याच संकल्पनेला दृढ करण्यासाठी माझा हा अत्यंत लहान चरखा आहे.
– जयंत तांदूळकर (कलाकार व वरिष्ठ लेखापाल)

नागपुरात घटस्फोटित महिलेचा लैंगिक छळ करणाऱ्या पोलिसाला अटक

पोलिस

नागपूर : घटस्फोटित महिलेशी शरीरसंबंध जोडल्यानंतर त्याची अश्लील क्लिप बनवून ती व्हायरल करण्याची धमकी देत घटस्फोटित महिलेवर अत्याचार करणाऱ्या एका पोलिसाला बेलतरोडी पोलिसांनीअटक केली. विक्रमसिंग बनाफर आरोपी पोलिसाचे नाव आहे. तो पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. पीडित महिला अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुदामनगरात राहते. १४ वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. तिला एक मुलगाही आहे. घरगुती कारणावरून पती पत्नीत वाद झाल्यानंतर पतीने तिच्यापासून घटस्फोट घेतला. तिचा मुलगा तिच्या पतीजवळच राहतो. ती एका बिल्डरकडे काम करते आणि एकटीच राहते.

आरोपी बनाफरसोबत सहा वर्षांपूर्वी तिची ओळख झाली. त्यावेळी तो पोलीस दलात नव्हता. बेसा बेलतरोडीतील एका मित्राकडे कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघे आले असताना त्यांनी येथे मुक्काम केला. महिलेच्या तक्रारीनुसार यावेळी बनाफरने तिला गुंगीचा पदार्थ दिला आणि तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. मोबाईलमध्ये त्याने या संबंधाची अश्लील क्लिप बनविली. ती क्लिप दाखवून तो तिच्यासोबत नंतर वारंवार शरीर संबंध प्रस्थापित करू लागला. तब्बल सहा वर्षांपासून त्यांच्यात शंभरपेक्षा जास्त वेळा शरीरसंबंध प्रस्थापित झाले. तीन वर्षांपूर्वी तो पोलीस मुख्यालयात रुजू झाला. त्यांच्यात अनेकदा लग्न करण्याचाही विचार झाला. मात्र कधी तो तर कधी ती तयार नसल्याने त्यांचे लग्न झाले नाही. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी बनाफरचे लग्न झाले. आता त्यापासून आपली सुटका होईल, असे पीडित महिलेला वाटत होते. मात्र तो लग्नानंतर तिच्याकडे वारंवार यायचा आणि जनावरासारखा वागायचा. तिच्यासोबत तो अनैसर्गिक कृत्यही करायचा. २२ सप्टेंबरला त्याने सगळ्या सीमा ओलांडल्या. त्याच्या किळसवाण्या कृत्याला तिने विरोध केला असता त्याने मारहाणही केली आणि धमकीही दिली. त्याच्याकडून धोका होऊ शकतो, हे लक्षात आल्यामुळे पीडित महिलेने बुधवारी सायंकाळी बेलतरोडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. ठाणेदार विजया आकोत यांनी तिची फिर्याद ऐकून घेतल्यानंतर आरोपी विक्रमसिंग बनाफर याच्याविरुद्ध बलात्कार करून धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला अटक केली.

मैत्रिणीकडे घेतला आधार
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार आरोपी बनाफर तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करताना विकृत कृत्य करायचा.
त्याच्या दहशतीमुळे पीडित महिला तिच्या मैत्रिणीकडे जाऊन लपली होती. मैत्रिणीने आधार दिल्यामुळेच तिने पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

Nagpur Weather

Nagpur
haze
36 ° C
36 °
36 °
20 %
2.6kmh
40 %
Thu
36 °
Fri
38 °
Sat
40 °
Sun
42 °
Mon
42 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...