नागपुरात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

नोकरी

नागपूर : नोकरी लावून देण्याच्या नावाखाली एका भामट्याने शिक्षकाचे सव्वाआठ लाख रुपये हडपले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. चंद्रशेखर हरिभाऊ भेदे (वय ४९) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करताच तो फरार झाला.

आरोपी भेदे मानेवाड्यातील म. फुले नगरात राहतो. तो एका खासगी कंपनीत काम करतो. जुना सुभेदार ले-आऊटमध्ये राहणारे भरत अंकुश नरुले यांच्यासोबत भेदेची ओळख आहे. नरुले शिक्षक असून शिक्षित पत्नीला नोकरी मिळावी यासाठी ते प्रयत्नशिल आहे. आरोपी भेदेने नरुलेंना आपली इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये वरिष्ठांसोबत चांगली ओळख असल्याची थाप मारली. नरुले यांच्या पत्नीला नोकरी लावून देतो, अशी बतावणी केली. आणखी कुणी असेल तर सांगा, असेही तो म्हणाला. त्याच्यावर विश्वास ठेवून नरुले यांनी आरोपीला ७ सप्टेंबर २०१८ ते २६ जानेवारी २०१९ या कालावधीत ८ लाख, २७ हजार रुपये दिले. त्यानंतर आरोपीने नरुले यांना नियुक्तिपत्र तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र दिले. ते घेऊन नरुले इंडियन ऑईलच्या अधिकाऱ्यांकडे गेले असता भेदेची बनवाबनवी उघड झाली. हे नियुक्तिपत्र बनावट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नरुले यांनी आरोपीला जाब विचारला आणि आपली रक्कम परत मागितली. तेव्हापासून तो काही ना काही कारण सांगून नरुले यांना टाळू लागला. तो रक्कम परत करणार नाही आणि त्याने फसवणूक केल्याची खात्री झाल्यामुळे नरुले यांनी हुडकेश्वर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्याची कुणकुण लागताच भेदे फरार झाला.

किडनीच्या उपचाराचा बहाणा

आरोपी भेदे याने नोकरीच्या आमिषाने नरुले यांची फसवणूक केल्याची चर्चा सुरू असतानाच त्याने किडनी खराब झाली व उपचार करायचे आहे, असे सांगून प्रवीण डोमले नामक व्यक्तीकडून ५ लाख ५० हजार घेतल्याचेही उजेडात आले. त्याने अशाप्रकारे आणखी काही जणांची फसवणूक केली असावी, असा संशय असून हुडकेश्वर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.