संतापजनक! महिलेला विकलं; अल्पवयीन मुलीला स्वत:च्या घरी ठेवून वारंवार बलात्कार

कायदे

नागपूर : मानवी तस्करीत गुंतलेल्या एका नराधमाने साडेतीन महिन्यांपूर्वी निराधार महिलेला नोकरीचे आमिष दाखवून मध्य प्रदेशात विकले. तिची अल्पवयीन मुलगी स्वत:च्या घरी ठेवून घेतली आणि तिच्यावर वारंवार बलात्कार केला. प्रचंड संतापजनक अशी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना झाली आहेत.

सुशील पैसाडील असे या आरोपीचे नाव असून तो अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. घटस्फोटित, निराधार आणि गरीब महिला, मुलींना आपल्या जाळ्यात ओढून तो त्यांना प्रारंभी मदत करतो. नंतर नोकरीचे आमिष दाखवतो. त्याच्या जाळ्यात अडकलेल्या महिला, मुलीला परप्रांतात नेऊन विकतो. अजनीतील एक पतीपासून विभक्त झालेली विवाहित महिला जूनमध्ये त्याच्या संपर्कात आली होती. तिला १४ वर्षांची मुलगी आणि १० वर्षांचा मुलगा आहे. दोघांचा सांभाळ करतो असे सांगून मुलगी आणि मुलाला स्वत:च्या घरी ठेवले, तर महिलेला त्याने मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे नेले. त्या महिलेची मुलगी सातवीत शिकते. आरोपीची पत्नी घराबाहेर गेल्याची संधी साधून तो या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करायचा. तीन महिन्यात त्याने तिच्यावर अनेकदा पाशवी बलात्कार केला. आई-वडील कोणीच जवळ नसल्यामुळे पीडित मुलगी जीवाच्या धाकाने अत्याचार सहन करत होती. आरोपीची पत्नीही त्याबाबत काही बोलत नव्हती.

असा झाला उलगडा
गिट्टी खदानमधील दोन तरुणींना एका टोळीने मध्य प्रदेशात नेऊन विकले. या घटनेचा बोभाटा झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींना शोधणे सुरू केले. त्यात आरोपी सुशील पैसाडील याचेही नाव आले. त्यामुळे पोलीस रविवारी त्याच्या अजनीतील घरी पोहोचले. त्याच्या घराची झडती घेतली असता अत्याचारग्रस्त मुलगी आणि तिचा लहान भाऊ आढळले. ती त्याची मुले नसतानादेखील त्याच्या घरी राहत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आरोपीने त्या अल्पवयीन मुलीवर स्वत: बलात्कार करतानाच तिला आपल्या मित्राच्याही हवाली केले. त्यामुळे त्याच्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केल्याचा दुसरा संतापजनक पैलू उघड झाला आहे.