गरिबांना एक महिन्याचे मोफत धान्य, ३२ लाखांवर लोकांना मिळणार याचा लाभ

गरिबांना एक महिन्याचे मोफत धान्य, ३२ लाखांवर लोकांना मिळणार याचा लाभ

करोनाचे संकट निवारण्यासाठी राज्य शासनाकडून कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. १ मेपर्यंतच्या या निर्बंधांमुळे हातावर पोट असणाऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले. कुणीही उपाशी राहू नये, यासाठी गरिबांना एक महिन्याचे मोफत धान्य मिळणार असून नागपूर जिल्ह्यातील ३२ लाख ५७ हजार १३१ लोकांना यांचा लाभ मिळणार आहे.

राज्यातील अंत्योदय अन्न योजनेच्या व प्राधान्य कुटुंबातील सुमारे ७ कोटी लाभार्थ्यांना महिनाभरासाठी मोफत धान्यपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांना २ रुपये किलो दराने गहू आणि ३ रुपये किलो दराने तांदूळ दिला जातो. मात्र, एका महिन्यासाठी आता हे धान्य पूर्ण मोफत दिले जाणार आहे. या धान्याचे तत्काळ वितरण सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

‘त्यांना’ही मे महिन्यात लाभ…                                                                                                    राज्य शासनाने मोफत धान्य देण्याची घोषणा आता लागू केली. मात्र, काही लाभार्थ्यांनी एप्रिलचे धान्य आधीच खरेदी केले आहे. या लाभार्थ्यांनाही या मोफत धान्य योजनेचा लाभ मिळावा, यासाठी मे महिन्यातील धान्य मोफत देण्यात यावे, अशी सूचनाही पुरवठा विभागाला करण्यात आली आहे.

 

कुणाला किती?                                                                                                           

अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी : एका शिधापत्रिकेवर ३५ किलो

प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी : प्रतिव्यक्ती ५ किलो

दोन महिन्यांचे एकत्रित                                                                                                              एप्रिल आणि मे महिन्याचे धान्य एकाच वेळी वितरित करण्याच्या सूचनाही पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे संगणक कक्षाने रास्त भाव दुकानातील पॉस (पीओएस) मशिनवर एप्रिल आणि मे या दोन्ही महिन्यांसाठी एकत्रितरीत्या अन्नधान्य विक्री करण्याची व्यवस्था केली असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे आणि नायब तहसीलदार प्रशांत शेंडे यांनी सांगितले. यात एका महिन्याचे धान्य मोफत मिळेल. तर दुसऱ्या महिन्याचे धान्य खरेदी करावे लागेल.

या कुटुंबांना मिळणार लाभ                                                                                                        ग्रामीण : अंत्योदय रेशनकार्ड : ७७, १४३, कुटुंबातील सदस्य ३ लाख २० हजार ३२१, प्राधान्य गट रेशनकार्ड : ३ लाख १५ हजार २११, कुटुंबातील सदस्य : १३ लाख ३६ हजार ४१४

शहर : अंत्योदय रेशनकार्ड : ४४,६८८, कुटुंबातील सदस्य : १ लाख ८९ हजार ३७६, प्राधान्य गट रेशनकार्ड ३ लाख ३१ हजार ७७५, कुटुंबातील सदस्य : १४ लाख ११ हजार ०२०