नागपूर : संबंधात वितुष्ट आल्याने प्रियकराने प्रेयसीवर गोळीबार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तरुणी थोडक्यात बचावली. नंदनवनमधील खरबीतील जीजामातानगर भागात शनिवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडलेल्या या थरारक घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. नंदनवन पोलिसांनी हल्लेखोर प्रियकराविरुद्ध विनयभंग व ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. गौरव ऊर्फ पपलू शेंदुर्णीकर (वय ३३,रा. बेलतरोडी),असे फरार प्रियकराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ वर्षीय तरुणी पतीपासून विभक्त राहत असून, ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चे काम करते. गौरव हा खासगी काम करतो. तोही पत्नीपासून विभक्त राहतो. सुमारे दोन वर्षापूर्वी गौरव व तरुणीची ओळख झाली. त्यानंतर दोघे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहायला लागले.
१५ दिवसांपूर्वीपासून दोघांमध्ये वाद सुरू होता. त्यामुळे तरुणीने त्याच्याशी संबंध तोडले. ती माहेरी राहायला आली. त्यानंतर गौरव हा परत येण्यासाठी तिची विनवणी करीत होती. मात्र, ती गौरवला टाळत होती. त्यामुळे गौरव संतापला. शनिवारी रात्री खरबी भागात गौरवने तरुणीला अडविले. धक्का देऊन तिला खाली पाडले. शिवीगाळ करून तिच्या दिशेने पिस्तूल रोखली. तरुणी त्याला समजाविण्याचा प्रयत्न करीत असतानाच गौरवने पिस्तुलातून गोळी झाडली. सुदैवाने ती तरुणीच्या बाजूने गेली. त्यानंतर गौरव फरार झाला. तरुणीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच नंदनवन पोलिसांसह गुन्हेशाखा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी गौरव याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. पोलिस गौरवचा कसून शोध घेत आहेत.
गोळीबाराबाबत संभ्रम
पिस्तुलातून गौरवने गोळी झाडल्याचे बयाण तरुणीने दिले आहे. पोलिसांनी परिसरात चौकशी केली असता गोळीबाराचा आवाज झाला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. घटनास्थळावरून पोलिसांनी रिकामे काडतुस जप्त केले. मात्र जप्त काडतुस हे गोळीबारातील नसल्याचे सांगण्यात येते. गोळीबार झाला किंवा नाही, याबाबत उशिरा रात्रीपर्यंत पोलिस संभ्रमात होते.
अधिक वाचा : नागपूर – झोमॅटोला ५५००० दंड ; उपवासाला पनीर ऐवजी चिकन