किराणा व्यावसयिकाच्या मागे शस्त्र घेऊन धावणारा गुंड जमावाच्या तावडीत सापडला असता, तर जमावाने केला असता खात्मा

crime

नागपूर : दुकानावर बळबजरीने अतिक्रमण करून किराणा व्यावसयिकाच्या मागे शस्त्र घेऊन धावणारा बंटी नावाचा तो गुंड जमावाच्या तावडीत सापडला असता, तर लोकक्षोभाचा उद्रेक होऊन त्याचा सामूहिक खात्मा झाला असता. वेळीच पळ काढल्याने बंटी थोडक्यात बचावला अन्यथा अक्कू यादव हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली असती. ही थरारक घटना भांडे प्लॉट चौकात घडली. सक्करदरा पोलिसांनी गुंड बटी ऊर्फ शेर खानविरुद्ध अतिक्रमण तसेच शस्त्र घेऊन ठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. रविवारी या भागात तणावपूर्ण शांतता होती.

मिळालेल्या माहितीनुसार, भांडे प्लॉट चौकात लक्ष्मी कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्सच्या तळ मजल्यावर गत अनेक वर्षांपासून जयंतीलाल जैन यांचे जय मेवाड किराणा दुकान होते. याच कॉम्प्लेक्ससमोर बंटीने पानठेला सुरू केला होता. त्याला कॉम्प्लेक्समधील दुकानदारांचा विरोध होता. काही महिन्यांपूर्वी त्याने किराणा दुकानाच्या बाजूला असलेल्या पीठ गिरणीचा गाळा खरेदीचा व्यवहार मालकासोबत केला. मात्र, या व्यवहारातील दस्तावेजावर पीठ गिरणीच्या गाळ्याऐवजी किराणा दुकानाच्या गाळ्याचा क्रमांक लिहिण्यात आला. बंटीने पीठगिरणीवर ताबा मिळवून तेथे चिकन सेंटर सुरू केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होऊ लागला. त्यांनी याबाबत अनेकदा पोलिस व महापालिकेत तक्रारही केली होती.

मात्र, कारवाई करण्यात आली नाही. गत काही दिवसांपासून तो किराणा दुकानावरही ताबा मिळविण्याचा प्रयत्न करीत होता. याला जैन यांचा विरोध होता. शुक्रवारी रात्री त्याने किराणा दुकानाचे कुलूप तोडले व आपले साहित्य ठेवून कुलूप लावले. शनिवारी सकाळी जैन किराणा दुकान उघडायला आले असता त्यांना दुसरेच कुलूप दिसले. याचदरम्यान बंटी तेथे आला. ‘दुकान माझे आहे, यावर आता माझा ताबा आहे,’असे तो जैन यांना म्हणाला. ‘बळजबरीने कुलूप कशाला लावले,’ असे जैन यांनी त्याला म्हटले. त्यामुळे बंटी संतापला. तो चिकन सेंटरमध्ये गेला. हातात चाकू घेऊन बाहेर आला. शस्त्रासह बंटीला बघताच जैन हे जीव मुठीत घेऊन पळाले. बंटीने त्यांचा पाठलाग केला. जैन यांनी आरडाओरड केल्याने नागरिक जमले. जैन यांचा पाठलाग करणाऱ्या बंटीच्या मागे जमावही धावू लागला. ते पाहून बंटी तेथून पळाला. या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला.

घटनेची माहिती मिळताच दंगल नियंत्रण पथकासह सक्करदरा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जमावाला शांत केले. जैन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बंटीविरुद्ध भादंविच्या कलम ४५२, ५०६ ब व ५३४ अन्वये गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. अतिक्रमण केल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कॉम्प्लेक्समधील चार गाळ्यांवरील पक्के बांधकाम असलेले अतिक्रमण तोडले. यात जैन यांच्या दुकानाचाही समावेश आहे. या भागात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सक्करदरा पोलिस व दंगल नियंत्रण पथकाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. रविवारी येथे तणावपूर्ण शांतता होती.

साहेब, बंटीपासून जीवाची भीती !

बंटी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध अनेकदा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. मात्र त्याच्याविरुद्ध ठोस कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळेच त्याची हिंमत वाढली. शनिवारच्या घटनेने त्याचे दुकान जमीनदोस्त झाले. त्यामुळे तो आता आम्हाला सोडणार नाही. त्याच्यापासून जीवाचा धोका आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक व दुकानदारांनी केली.

अतिक्रमणविरोधी पथक करते काय ?

भांडे प्लॉट चौकासह उमरेड मार्गावर अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अनेकांनी रस्त्यालगत दुकाने थाटली आहेत. याकडे मात्र महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाचे लक्ष नाही. बंटीने आधी कॉम्प्लेक्सच्या मागे रस्त्यालगत पानठेला लावला होता. मात्र त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली नाही. एखादी मोठी घटना घडल्यानंतरच अतिक्रमण विरोधी पथकाला जाग येते का? हे पथक करते तरी काय? असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

अधिक वाचा : नागपूर : प्रियकराचा प्रेयसीवर गोळीबार