नागपूर : रेल्वे स्थानकावर वडिलांच्या बाजूलाच झोपलेल्या एका अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यास जबलपूर-अमरावती एक्स्प्रेसमध्ये पकडण्यात आले. मनोजकुमार महतो (३७, खरगिया बिहार) असे आरोपीचे नाव आहे.
मध्यप्रदेशातील ही पीडित बालिका १३ वर्षांची आहे. सोमवारी सकाळी उपचारांसाठी तिचे वडील तिला घेऊन नागपूरला आले होते. रामदासपेठ परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर रात्रीच्या अमरावती-जबलपूर पॅसेंजरने घरी जाण्यासाठी वडील मुलीला घेऊन नागपूर रेल्वे स्थानकावर गेले.
गाडीला वेळ असल्याने वडील व मुलगी दोघेही प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर झोपले. रात्री ११ च्या सुमारास वडिलांना जाग आली तेव्हा मुलगी बाजूला नव्हती. ते घाबरले. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे ते आरपीएफ ठाण्यात गेले. तेथे उपनिरीक्षक होतीलाल मीना आणि उपनिरीक्षक गौरीशंकर एडले यांनी लगेच सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात आरोपी मुलीला घेऊन जात असल्याचे स्पष्ट झाले. ही मुलगी गतिमंद आहे. त्याचा फायदा आरोपीने घेतला.
१२१५९ जबलपूर- अमरावती एक्स्प्रेसमध्ये आरोपी मुलीसह चढत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये आढळले. त्यामुळे या गाडीत तैनात आरपीएफ जवानांना लगेच कळविण्यात आले. आरपीएफ जवानांनी या गाडीची तपासणी केली असता जनरल बोगीमध्ये आरोपी मुलीसह बसलेला आढळला. त्याला इटारसीला उतरविण्यात आले. मंगळवारी आरोपीला मुलीसह नागपूरला आणण्यात आले. आरपीएफने आवश्यक कार्यवाही करून आरोपीला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले. लोहमार्ग पोलिसांनी त्याला ‘पोक्सा’अंतर्गत अटक केली आहे.
अपहरणकर्ता मनोजकुमारला ३ मुली आणि दोन मुले आहेत. तो यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे बारदाण्याचे काम करतो. पगार मिळाल्याने तो घरी जाण्यासाठी सोमवारी नागपूर रेल्वे स्थानकावर आला. त्याला पीडित मुलगी दिसली. दारूच्या नशेत तिला पळविल्याचे तो पोलिसांना सांगतो.
अधिक वाचा : नागपूर – बिल्डर्सवर आयकर विभागाच्या धाडी