नागपूर : प्राप्तीकर विभागाने मंगळवारी शहरातील बांधकाम व्यावसायिकांवर कर चुकवल्याच्या संशयावरून कारवाई केली आहे. या बांधकाम व्यावसायिकांच्या निवासस्थान व कार्यालयांवर ही कारवाई करण्यात आली असून, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कारवाईत अनेक कागदपत्रे व इतर महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, कारवाई करण्यात आलेल्या सर्व बांधकाम व्यावसायिकांची एकमेकांसोबत भागीदारी होती व या माध्यमातून त्यांनी कर चुकवल्याच्या माहितीवरूनच ही कारवाई करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिकांवर अलीकडच्या काळातील ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे बोलल्या जात आहे.
प्राप्तीकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बांधकाम व्यावसायिकांच्या नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ येथील कार्यालये व निवासस्थानी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. एकूण सहा ते सात बांधकाम व्यावसायिकांवर ही कारवाई करण्यात आली असून, यात अतुल यमसनवार, प्रशांत बोंगीरवार, सुधीर कुण्णावर, चंद्रकांत पद्मावार, विश्वास चकनलवार यांच्यासह इतर काही बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, कर चुकवण्यासाठी या बांधकाम व्यावसायिकांची भागीदारी असल्याचेही पुढे आले आहे. भागीदारीच्या माध्यमातून या व्यावसायिकांनी कर चुकवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या सर्व बांधकाम व्यावसायिकांचे नागपूरसह चंद्रपूर व यवतमाळ येथे कार्यालय असून याठिकाणी निवासी संकुलांचे काम सुरू आहे. या बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात कर चुकवल्याच्या संशयावरून विभागातर्फे मंगळवारी सकाळीच या व्यावसायिकांवर धाड टाकण्यात आली. प्राप्तीकर विभागातर्फे एकूण २० ठिकाणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे या क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कारवाई करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकांमध्ये अनेकजण भागीदार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कर चुकवण्याच्या हेतूने या समूहांनी भागिदारी दाखवली आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सकाळपासूनच या व्यावसायिकांच्या कार्यालय व निवासस्थानी कारवाई करण्यात आली. यात अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर या व्यावसायिकांच्या लॉकर्सची तपासणी करण्यात आली आहे. एकाच वेळी तीन शहरांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईत प्राप्तीकर विभागाचे १५० हून अधिक अधिकारी व कर्मचारी होते. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांवर ही कारवाई करण्यात आल्याने पुढील दोन दिवस ही कारवाई सुरूच राहील, अशी शक्यता प्राप्तीकर विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. कारवाई दरम्यान अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याने यात आणखी काही बिल्डर्सही सहभागी आहेत का, हेदेखील स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील बिल्डर्सचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
अधिक वाचा : नागपुरात व्यापाऱ्याला आठ लाखांचा गंडा