नागपुरात व्यापाऱ्याला आठ लाखांचा गंडा

नागपूर

नागपूर : पेंट खरेदी करून दोघांनी हार्डवेअर व्यापाऱ्याची सुमारे आठ लाख रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशालकुमार मेसर्स क्रिएटिव्ह मार्केटिंगचा व्यवस्थापक व सुरेश सी. देसाई अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. राजू मधुकरराव नानोटकर (वय ४२, रा. दत्तात्रयनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला.

नानोटकर यांचे बिडीपेठ येथे मेसर्स शैला सेल्स कॉर्पोरेशन अॅण्ड हार्डवेअर नावाचे दुकान आहे. धंतोलीतील यशवंत स्टेडियममध्ये क्रिएटिव्ह कंपनीचे कार्यालय असल्याचे सांगून मी संचालक व शासकीय कंत्राटदार आहे. शासकीय कार्यालयांना रंगरंगोटी करण्याचे कंत्राट मिळाले आहे, त्यासाठी पेंटची आवश्यकता आहे, असे विशालकुमारने नानोटकर यांना मोबाइलवर सांगितले.

१७ डिसेंबरला नानोटकर यांनी सुरेश देसाई याला दरपत्रक दिले. त्यानंतर देसाईने त्यांना एशियन पेंटचे ७५ डबे आणि डिलक्स पेंटचे १०५ डबे वाडी भागात पोहोचविण्यास सांगितले. नानोटकर यांनी आठ लाख रुपये किमतीचा पेंट व अन्य साहित्य वाडी भागात पोहोचविले. या मोबदल्यात दोघांनी नानोटकर यांना काही रक्कम व धनादेश दिले. मात्र ते वटले नाहीत.

नानोटकर यांनी चौकशी केली असता कंपनीचे कोणतेही गोदाम व कार्यालय नसल्याचे समोर आले. नानोटकर यांनी सक्करदरा पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अधिक वाचा : महापौर नंदा जिचकार जाणार फ्रान्सला