मुसळधार पावसाने वस्त्या जलमय

नागपूर

नागपूर: नागपूर शहरात गुरुवारी सकाळी झालेल्या मुसळधार पाऊस व गारपिटीमुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले, तर अनेक मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिक व वाहनचालकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.

अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले. शहरात कुठे आपत्ती परिस्थिती तर उद्‌भवली नाही ना, याची पाहणी करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी सकाळीच भेट मनपा मुख्यालयातील ‘सिटी ऑपरेशन सेंटर’ गाठले. तेथून संपूर्ण शहरातील परिस्थितीची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. नागपुरात सकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर चांगलाच होता. अनेक भागात पाणी साचण्याची शक्यता बळावली होती. हे लक्षात घेऊन महापौरांनी सकाळी १० वाजताच मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीत असलेले सिटी ऑपरेशन सेंटर गाठले. यावेळी त्यांच्यासोबत ‘नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ चे राजेश दुफारे उपस्थित होते. सिटी ऑपरेशन सेंटरमधून त्यांनी शहरातील सर्व झोनमधील भागांची पाहणी केली. पावसामुळे नेहमी बाधित होत असलेल्या भागांचीही पाहणी केली. पाहणीदरम्यान कुठेही परिस्थिती हाताबाहेर गेले नसल्याचे त्यांना आढळले. तरीही ज्या भागात पाणी साचले आहे त्या भागातून लगेच पाणी काढण्याचे निर्देश त्यांनी संबंधित झोनच्या सहायक आयुक्तांना दिले. पावसाचा जोर लक्षात घेता आणि हवामान खात्याने दिलेला अंदाज बघता महानगरपालिकेच्या आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेने सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. नागरिकांच्या तक्रारी येण्याची वाट न बघता संबंधित कर्मचाऱ्यांना आढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी आवश्यक ती मदत तातडीने पोहचविण्याचे निर्देशही जोशी यांनी दिले.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाला पाणी शिरल्याच्या अनेक तक्रारी आल्या. यात उत्तर नागपुरातील कपिलनगरचा समावेश होता. तर म्हाळगीनगरात एक झाड उन्मळून पडल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले. पाणी शिरलेल्या अनेक भागात पंपाच्या सहाय्याने पाणी काढण्यात आल्याची माहिती आहे.

Comments

comments