Nagpur Covid-19 updates: रुग्णालयांत दाखल रुग्ण संख्या तीन हजारांखाली

CORONA VIRUS
Nagpur announces the addition of 72 Corona instances on the Sunday. active cases total 329

नागपूर : जिल्ह्यात २४ तासांत २५ करोना रुग्णांचा मृत्यू तर ४७० नवीन रुग्णांची भर पडली. सलग दुसऱ्या दिवशी पाचशेहून कमी करोनाग्रस्त आढळल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय रुग्णालयांत दाखल रुग्ण संख्या ही तीन हजारांखाली आली आहे.

उपचाराधीन रुग्णांमध्ये शहरातील ५ हजार ८३७, ग्रामीणचे ५ हजार ११ अशा एकूण १० हजार ८४८ रुग्णांचा समावेश आहे. त्यातील ७ हजार ९८२ रुग्ण गृह विलगीकरणात तर गंभीर संवर्गातील २ हजार ८६६ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. २४ तासांत शहरात २१३, ग्रामीण २४६, जिल्ह्याबाहेरील ११ असे एकूण ४७० रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ३ लाख २९ हजार ६०३, ग्रामीण १ लाख ४० हजार ८७९, जिल्ह्याबाहेरील १ हजार ५२९ अशी एकूण ४ लाख ७२ हजार ११ रुग्णांवर पोहोचली आहे. दिवसभरात शहरात ४, ग्रामीण १०, जिल्ह्याबाहेरील ११ असे एकूण २५ मृत्यू झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूंची संख्या ५ हजार २०९, ग्रामीण २ हजार २६६, जिल्ह्याबाहेरील १ हजार ३४७ अशी एकूण ८ हजार ८२२ रुग्णांवर पोहोचली आहे. शहरात बऱ्याच महिन्यानंतर दिवसभरात ४ एवढे कमी मृत्यू नोंदवले गेले, हे विशेष.

विदर्भात करोनाग्रस्तांची संख्या पुन्हा तीन हजारांवर

विदर्भाच्या अकरा जिल्ह्यात सोमवारी नवीन करोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन हजाराखाली गेली होती. परंतु दुसऱ्याच दिवशी मंगळवारी पुन्हा येथे २४ तासांत १०४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू तर ३ हजार ८० नवीन रुग्णांची भर पडली आहे. विदर्भात २४ मे रोजी १०८ रुग्णांचा मृत्यू तर २ हजार ७८७ नवीन रुग्ण नोंदवले गेले होते. तर मंगळवारी दुसऱ्याच दिवशी पुन्हा नवीन रुग्णांत किंचित वाढ नोंदवली गेली. दरम्यान, दिवसभरात नागपूर जिल्ह्यात ४७० नवीन रुग्ण आढळले आहे. तर नागपूर शहरात दिवसभरात ४, ग्रामीण ९, जिल्ह्याबाहेरील ११, अशा एकूण २५ रुग्णांचा मृत्यू झाला. विदर्भातील एकूण मृत्यूत नागपूर जिल्ह्यातील २४.०३ टक्केमृत्यूंचा समावेश आहे. अमरावतीत ८ मृत्यू तर ५२५ नवीन रुग्ण आढळले, चंद्रपूरला १३ मृत्यू तर २३४ रुग्ण, गडचिरोलीत २ मृत्यू तर १४३ रुग्ण, यवतमाळला १२ मृत्यू तर १६७ रुग्ण, भंडाऱ्यात १ मृत्यू तर ११९ रुग्ण, गोंदियात ६ मृत्यू तर ७४ रुग्ण, वाशीमला १० मृत्यू तर ३३५ रुग्ण, अकोल्यात १३ मृत्यू तर २८८ रुग्ण, बुलढाण्यात ६ मृत्यू तर ४७८ रुग्ण, वर्धा जिल्ह्यात ८ मृत्यू तर २४७ नवीन रुग्ण आढळले.

एका महिन्यात ६५ हजार ‘सुपर स्प्रेडर’ची चाचणी

करोनाची साखळी खंडित व्हावी, यासाठी महापालिकेच्या वतीने बाजारपेठा, बँक, ऑटोचालक, डिलिव्हरी बॉय, पेपर हॉकर्स, शासकीय आणि खाजगी कार्यालये, दुकाने इत्यादी ठिकाणी ‘सुपर स्प्रेडर’ची करोना चाचणी करण्यात आली. आरोग्य विभागातर्फे एक महिन्यात आतापर्यंत ६५ हजारावर नागरिकांची चाचणी करण्यात आली. अशी चाचणी दहाही झोनमध्ये करण्यात येत आहे. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा आणि सुपरस्प्रेडर असलेल्या लोकांची शहरातील विविध भागात आणि चौकाचौकात सकाळी ६ ते रात्री ८ दरम्यान चाचणी केली जात आहे. महापालिका प्रशासनाकडून विविध भागात चाचणी करणाऱ्यांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे. एका महिन्यात ३१ हजार ८१० आरटीपीसीआर चाचणी, ३३ हजार ४०५ अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या. या कार्यात पोलिसांचेही सहकार्य मिळत आहे. यासाठी ११ मोबाईल व्हॅन आणि ४५ चाचणी केंद्रांचा उपयोग करण्यात आला.

करोनामुक्तांचे प्रमाण ९५.५१ टक्के

शहरात दिवसभरात ७८१, ग्रामीणला १ हजार २०० असे एकूण १ हजार ९८१ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख १९ हजार १४३, ग्रामीण १ लाख ४० हजार ८७९ अशी एकूण जिल्ह्यात ४ लाख ५२ हजार ३४१ व्यक्तींवर पोहोचली आहे. आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांच्या तुलनेत हे प्रमाण ९५.५१ टक्के आहे.

१४ हजारांवर चाचण्या

शहरात दिवसभरात ८ हजार ४६५, ग्रामीणला ५ हजार ६८० अशा एकूण १४ हजार १४५ चाचण्या झाल्या. ही संख्या सोमवारी १३ हजार १२९ अशी होती.